जयपूर-अतरौली घराण्याच्या गायिका गीतिका वर्दे कुरेशी यांचा जन्म २० नोव्हेंबरला मुंबई येथे झाला.
गीतिका वर्दे या गायिका माणिक भिडे यांच्या शिष्या होत. गीतिका वर्दे य अखिल भारतीय रेडिओच्या A श्रेणीतील कलाकारांपैकी एक आहेत. सूर श्रृंगार संसद कडून त्यांना ‘सूरमणी’ या पदवी मिळाली आहे. २००६ मध्ये त्यांनी ट्रफलगर स्क्वेअर फेस्टिव्हल साठी कार्यक्रमात सहभाग घेतला होता. गीतिका यांचे मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये शिक्षण झाले.
गीतिका वर्दे यांनी प्रसिद्ध तालवाद्यवादक तौफिक कुरेशी यांच्याबरोबर लग्न केले. या दोघांची ओळख सेन्ट झेवियर्स कॉलेजमधली.. १९८८-८९ ची! गीतिका या आर्टला, तर तौफिक त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी सीनियर; पण आर्टलाच!. त्यामुळे गायनाची उपजत आवड गानशिक्षणाकडे वळलेली. तर तौफिक हे उस्ताद अल्लारखाँ यांचे चिरंजीव. उस्ताद झाकीर हुसेन यांचे ते बंधू. त्यामुळे त्यांची संगीतावर मास्टरी स्वाभाविकच. कॉलेजमध्ये या दोघांची ओळख झाली. संगीत हा त्यांना जोडणारा समान धागा असल्याने ही ओळख वाढत गेली आणि तौफिक व गीतिका यांच्या या ओळखीचे रूपांतर गाढ विश्वासाच्या मैत्रीत झाले. दोस्तीत संगीताबद्दलची चर्चा, त्यातील आपापला रस, दृष्टिकोन, त्यातल्या नवीन घडामोडींबाबत विचारविनिमय, गप्पा असे करता करता या दोघांत एक सुंदर मैत्री विणली गेली. या मैत्रीच्या नात्याचे रूपांतर आयुष्याचा साथीदार बनण्यात केले तर कसं होईल, असा दोघांनीही खूप चांगला विचार केला आणि आपापल्या माता-पित्यांना तशी कल्पनाही दिली. हे नाते विणताना आपण मुस्लिम वा हिंदू आहोत, ही जाणीव अथवा भेद दोघांच्याही गावी नव्हता. धर्म-पंथ यांच्या पलीकडे जाऊन ते एक व्यक्ती म्हणून एकमेकांकडे पाहत होते. एकमेकांचा आदर करीत होते.गीतिका यांच्या घरून मात्र या लग्नाला काहीसा विरोध होता. त्यांच्या बहिणीने ख्रिश्चन युवकाशी लग्न केले होते. तेव्हा दुसरीने तरी हिंदू जावई घरात आणावा अशी त्यांच्या आई-वडिलांची अपेक्षा होती. तौफिक यांना मात्र वाटत होते की, आपण संगीत क्षेत्रात फार विशेष असे काही केलेले नाही, आपले नावही झालेले नाही म्हणून गीतिकांच्या घरच्यांकडून लग्नाला विरोध होत असावा. तौफिक यांचे वडील उस्ताद अल्लारखाँ यांचा मात्र या लग्नाला मनापासून आशीर्वाद होता.
तौफिक आणि गीतिका यांना मात्र या साऱ्यात महत्त्वाचं वाटत होतं ते एकमेकांशी असलेलं प्रामाणिक नातं व एकमेकांवरचं निस्सीम प्रेम. दोघांनीही कसलाही मुखवटा धारण न करता हे नातं स्वीकारलं होतं. मात्र, लग्न हिंदू की मुस्लिम पद्धतीनं करायचं, या वादात पडण्यापेक्षा नोंदणी पद्धतीने लग्न करण्याचा मार्ग त्यांनी पत्करला आणि १९९३ साली उभयतांनी परस्परांचे आयुष्यभराचे जोडीदार म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात केली.
नझरिया,हम अपने,मीरा,तुम बिन,ले आयिले हे त्यांचे अल्बम गाजलेले आहेत.
तौफिक कुरेशी व गीतिका वर्दे यांचा मुलगा शिखरनाद हा तबला वादक आहे.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply