असले जरी शिक्षण बेताचे
वागलो नाही कधी विचित्र,
चाळीतील मध्यमवर्गी आम्हीं
राहत होतो एकत्र !
चाळीने आम्हांला शिकविले
भेदभाव विसरायला,
प्रसंग कोणावर बिकट आला
शिकविले प्रथम मदत करायला !
चाळीत कॉमन नळाला
पहाटे पाचला पाणी,
सातवाजता पाणी गेल्यावर
मिळणार नाही थेंब पाणी !
ब्रशने दात घासता घासता
भरभर प्रातर्विधी उरकायचे,
दुधासाठी सेंटरवर धावायचे
मध्येच घुसून दुध आणायचे !
पाण्यासाठी सगळ्यांची लगबग
सकाळी भांडणं कायमची,
पाणी जायच्या आत
सगळी आन्हिके उरकायची !
चाळीतील कॉमन नळाने
शिस्त लावली लौकर उठायची
पाण्याची काटकसर करण्याची
पाणी जपून वापरायची !
थंडीचे दिवस म्हणून
उठलो नाही लौकर,
शाळेला उशीर होईल
म्हणून अंघोळी केली भरभर !
देवापुढे जोडून हात
घाईघाईत नाष्टा केला,
पँटीत शर्ट कोंबून
शाळेचा रास्त घराला !
आदल्या दिवशी विसरलो
दप्तरात पुस्तके भरायला,
पहिला तास गणिताचा
भलताच भारी पडला !
येउदे प्रसंग कोणावर काही
एकजुटीने लढणारच,
आमची चाळ आहे म्हंटल्यावर
त्यात वाचाळ काही असणारच !
चाळीतल्या गमतीजमती वेगळ्या
फॅल्याट सिस्टीम मध्ये कुठे दिसायला !
भांडलो जरी किती तरी
शेजारी येती सोडवायला !
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply