राष्ट्रपुरुष कुणा एका जाती वा धर्माचे असू शकत नाहीत. ते देशाचे असतात. भारताचे माजी लष्करप्रमुख जन.अरुणकुमार वैद्य यांच्याबद्दलही असेच म्हणता येईल. तथापी मुंबई येथे २६ जानेवारी १९२६ रोजी चांद्रसेनिय कायस्थ प्रभू घराण्यात त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांचा अभिमान सर्व सी.के.पी. समाजास असणे साहाजिकच आहे.
जन. अरुणकुमार वैद्य यांचा रायगड जिल्ह्याशी जवळचा संबंध आहे. त्यांचा बालपणीचा काही काळ अलिबागमध्ये गेला आणि तारुण्यात पेण ही त्यांची सासुरवाडी ठरली. अलिबागच्या त्यावेळच्या टोपीवाला इंडस्ट्रियल हायस्कूल म्हणजे आताचे जन. अरुणकुमार वैद्य हायस्कूलमध्ये त्यांनी अल्पकाळ प्राथमिक शिक्षण घेतले. तो १९३७ चा कालखंड होता. अरुणकुमार वैद्य यांचे वडील श्रीधर कृष्णाजी वैद्य त्या स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांच्या राजवटीत अलिबागला काही काळ पहिले जिल्हाधिकारी म्हणून काम करीत होते. ते शिस्तप्रिय, स्वावलंबी व कर्तव्यदक्ष होते. त्यांनी पुण्यात शहर फौजदारी न्यायाधीश म्हणूनही काम केले. सुरतलाही त्यांनी जिल्हाधिकारी म्हणून काम केले. श्रीधरपंतांच्या पत्नीचे नांव इंदिरा. या वैद्य दांपत्याचे तेज अरुणकुमारांतही होते. त्यांनी बालपणाचा काही काळ अलिबागला घालवला असल्यामुळे या मातीचे शौर्यगुण त्यांच्या अंगीही भिनले होते. सरखेल कान्होजी आंग्रे यांचा पराक्रम कुलाबा किल्ला येथील समुद्र किनारा हा त्यांच्या रोमारोमात भिनला. त्याचे त्यांच्यावर संस्कार झाले. आणि या संस्कारानेच ते लष्करी पेशाकडे आकृष्ठ झाले.
महाराष्ट्रातील विद्येचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुणे शहरात अरुणकुमार वैद्य यांचे माध्यमिक शिक्षण झाले. पुण्याच्या नारायणपेठेतील रमणबाग न्यू इंग्लिश स्कूल या हायस्कूलमध्ये ते शिकले. या रमणबाग हायस्कूलमध्ये चार वर्षे रमलेले अरुणकुमार बालवीर पथकात साहसी बालवीर होते. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील एलफिस्टन कॉलेजमध्ये झाले. जेव्हा स्वातंत्र्यप्राप्तीची धामधूम सुरु होती. त्याकाळात १९४५ रोजी वयाच्या अठराव्या वर्षी सैन्यात भरती झाले. त्यावेळी त्यांच्या आई अलिबागेतच होत्या. आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना न सांगताच अरुणकुमार लष्करात भरती होण्यासाठी गेले. आणि लष्करात दाखल झाले.
अरुणकुमार वैद्य यांचे लष्करी शिक्षण झाल्यावर त्यांना दुसऱ्या महायुद्धाच्या प्रसंगी ब्रह्मदेशाच्या युद्ध आघाडीवर जावे लागले. त्यांची नेमणूक उप अधिकारी म्हणून झाली. त्यांना डेक्कन हॉर्स रेजिमेंटमध्ये दक्षिण घोडदळ पलटणीत कमिशन मिळाले. त्यावेळी ते रणगाडा पथकाचे नेतृत्व करीत होते. १९६५ च्या भारत-पाक युद्धात खेमकरण येथे शत्रूच्या बलाढ्य रणगाड्यांना अरुणकुमार वैद्य यांच्या झुंजार पथकाने धूळ चारली. सुमारे ६० रणगाड्यांचा धुव्वा उडवला. या १९६५ च्या युद्धात वैद्य यांच्या दिमतीला शेरमन रणगाडे होते. त्यांची संख्या अपुरी होती. पण त्यांच्या फौजेने शौर्याने लढत देऊन पाकिस्तानच्या पॅटन रणगाड्यांची अतोनात हानी केली. खेमराज विभागात पाकिस्तानचे जेवढे पॅटन रणगाडे होते त्यातील निम्मे वैद्य यांच्या तुकडीने नष्ट केले. म्हणून त्यांच्या तुकडीला डेक्कन हॉर्स विक्रम पुरस्कार व महावीर चक्र मिळाले. १९६६ व १९६७ सालच्या आसामातील कामगिरीत त्यांनी दुसऱ्या पर्वतीय चलखती दलाचे व विभागाचे स्वतंत्रपणे नेतृत्व केले. १९६७ च्या सप्टेंबर महिन्यात त्यांनी नेफामध्ये होत्सपुरची सूत्रे हाती घेतली. नंतर ते दिल्लीला आले. तेथे त्यांनी संचालक मिलिटरी ऑपरेशन व मास्टर जनरल ही पदे भूषविली. १९७१ च्या भारत-पाक युद्धा ब्रिगेडियर अरुणकुमार वैद्य सोळाव्या सशस्त्र पलटणीचे प्रमुख होते. १९७१ च्या बांगलादेश मुक्ती युद्धात वैद्यांच्या रणगाड्यांनी तुफान वेगाने आगेकूच करुन शत्रूचे साठ रणगाडे संपूर्ण नष्ट केले व वसंतनगर येथील पाकिस्तानी ब्रिगेडचे ठाणे जिंकले. त्यावेळी अरुणकुमार वैद्यांच्या तुकडीने शत्रूच्या प्रदेशात आतवर २० कि.मी. पर्यंत मजल मारली होती. बासनार नजीकचा महत्वाचा पूल काबीज केला होता.
१९८० मध्ये आसाममधील तेजपूर येथे कॉर्प्स कमांडर म्हणून त्यांनी सूत्रे हाती घेतली होती. २५ जानेवारी १९८० मध्ये त्यांना लेफ्टनंट जनरलपदी बढती मिळाली. त्यानंतर फिल्डमार्शल सॅम माणकेशा आणि लेफ्टनंट जनरल जगजीतसिंग अरोरा या दोन सेनानींनी भूषविलेल्या जागी ३१ मार्च १९८० मध्ये ते पूर्व विभागाचे प्रमुख झाले. ३१ मे १९८१ रोजी ते इस्टर्न कमांडचे प्रमुख म्हणून नियुक्त झाले. १९८३ साली ऑगस्ट महिन्यात ते लष्करप्रमुख झाले.
अरुणकुमार वैद्य भारताचे दहावे सरसेनापती झाले. ही घटना अलिबागकरांसाठी, रायगडकरांसाठी विशेष अभिमानाची, आनंदाची होती. त्यानंतर दोन वर्षांनी अलिबागच्या टोपीवाला इंडस्ट्रियल हायस्कूलला सदिच्छा भेट देण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आणि २८ सप्टेंबर १९८५ साली त्यांचे अलिबागेत आगमनही झाले. अलिबागेत त्यांचे जंगी स्वागत झाले. श्रीमती जानकीबाई रघुनाथ हळदवणेकर कन्याशाळेच्या पटांगणात सुहासिनींनी जनरल अरुणकुमार वैद्य व सौ. भानुमती वैद्य यांचे औक्षण केले. इंडस्ट्रियल हायस्कूलच्या मुलांनी सलामी दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमात चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाच्या वतीने मी स्वतः, दत्तात्रेय केशव प्रधान आणि अशोक शांताराम प्रधान यांनी वैद्य यांचा सत्कार केला. ही हृद्य आठवण आजही मनाच्या कुपीत साठवून ठेवली आहे.
अलिबाग भेटीच्या एक वर्ष आधी ६ जून १९८४ रोजी शीख दहशतवाद्यांना अमृतसरच्या सुवर्णमंदिरातून हुसकावून लावण्यासाठी तत्कालिन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या आदेशावरुन जन. अरुणकुमार वैद्य यांनी ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ मोहिमेअंतर्गत सुवर्णमंदिरात लष्कर घुसवून शीख दहशतवाद्यांना ठार केले.
या घटनेने संतप्त होवून शीख दहशतवाद्यांनी पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या केली. ३१ जानेवारी १९८६ रोजी वयाच्या ६० व्या वर्षी ४२ वर्षांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेतून अरुणकुमार वैद्य सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीचे दिवस पुणे येथे समाधानात घालवत असतांनाच दि. १० ऑगस्ट १९८६ रोजी त्यांची शीख दहशतवाद्यांनी हत्या केली.
शीख दहशतवाद्यांनी भ्याडपणे एका बेसावध योद्धयाची हत्या केली. अरुणकुमार वैद्य यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आता पंजाबातील खलिस्तानचे भूत उतरले आहे आणि शीख दहशतवादही थांबला आहे. शीख युवाशक्ती चुकीच्या दिशेने वळली. पण त्यात अकारण अरुणकुमार वैद्य यांच्यासारख्या योद्धयाचा बळी गेला. अरुणकुमार वैद्य यांचे हौतात्म्य वाया गेले नाही. ते आपल्या कार्याने अमर झाले आहेत. याचा अभिमान समस्त चांद्रसेनिय कायस्थ प्रभू समाजाल कायम वाटत राहणार आहे.
— श्री. नागेश म. कुळकर्णी- अलिबाग
Leave a Reply