घर्षण करणाऱ्यांनी कोणते नियम पाळावेत- अर्थात घर्षण नेहमी लाकडाच्या पाटावर, खुर्चीवर किंवा पलंगावर बसून किंवा उभे राहून करावे. मात्र बसण्यासाठी वा उभे राहण्यासाठी वापरलेली वस्तू ही धातूची असू नये. कारण धातू हे विद्युतवाहक असल्याने घर्षणासाठी निर्माण होणारी वीज जमिनीत निघून जाईल व घर्षणाचा फायदा होणार नाही, तसेच घर्षणाच्या वेळी जी वीज निर्माण होते तिचा शरीराच्या आरोग्यसंपन्नतेच्या कामी पुरेपूर फायदा व्हावा यासाठी घर्षण करताना प्रत्यक्ष जमिनीवर बसू किंवा उभे राहू नये. इतकेच नाही तर अप्रत्यक्षरीत्या ही जमिनीशी किंवा भिंतीशी संपर्क येणार नाही, अशी खबरदारी घर्षण करणाऱ्यांनी घ्यावी. घर्षण करण्यासाठी मदतनीस घेतला असल्यास त्याचा संपर्क जमीन, भिंत किंवा धातूच्या आसनाशी येऊ देऊ नये ही खबरदारी घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. घर्षण करणाऱ्यांनी हा नियम पाळलाच पाहिजे. घर्षण चिकित्सा जरी वरदान असली तरी तिचा उपयोग करताना प्रत्येक व्यक्तीने तिचा ‘सुपरिणाम’ प्राप्त करण्यासाठी सांगितलेले सर्व नियम मात्र नेहमीच पाळावेत. घर्षणाची वेळ- घर्षण नेहमी रिकाम्यापोटीच करावे. सकाळी शौचमुखार्जन झाल्यावर घर्षण करावे. अशक्त व्यक्तींनी खाण्यानंतर एक तासाने घर्षण करावे. घर्षण व्यायाम संपल्यानंतर वीस-पंचवीस मिनिटांनी दूध वगैरे प्यावे. जेवणानंतर घर्षण केल्यास पचनक्रियेत अडथळा येतो. त्यामुळे जेवणानंतर घर्षण किंवा इतर कोणताही व्यायाम करू नये. म्हणूनच अजीर्ण झाले असतानाही घर्षण करू नये. घर्षणाचा क्रम- सर्वांग घर्षणाची सुरुवात. १) ओटीपोटाच्या घर्षणाने करावी. त्यानंतर २) मधले पोट ३) वरचे पोट ४) छाती ५) मान ६) गळा ७) चेहरा ८) मस्तक ९) मांड्या १०) पोटऱ्या ११) गुडघे १२ दंड १३) हात १४) पाठ १५) कंबर १६) तळपाय १७) तळहात या क्रमाने सर्वांग घर्षण पूर्ण करावे. सर्वांग घर्षण नियमित रोज करावे. ज्यांच्याकडे अधिक वेळ आहे, त्यांनी सर्वांगाचे घर्षण झाल्यावर शरीराला तेल लावून अभ्यंग करावा व त्यानंतर सुगंधी चुर्णाद्वारे घर्षण करावे. त्यानंतर गरम पाण्याने स्नान करावे, असे केल्याने घर्षण- व्यायाम सर्वांगीण लाभ होतो. त्वचेवर सुरकुत्या पडत नाहीत. म्हातारपण लवकर येत नाही. त्वचा सतेज दिसते व शरीराची प्रतिकारशक्ती
वाढते.
वैद्य शुभदा पटवर्धन
मराठी विज्ञान परिषद,
Leave a Reply