ज्येष्ठत्व ते श्रेष्ठत्व… हा विषय मोठा आहे. श्रेष्ठत्व प्राप्त करण्यासाठी ज्येष्ठांच्या रांगेत समाविष्ट होणे अत्यावश्यक असते असं नाही. तरूण वयातही श्रेष्ठत्व प्राप्त होऊ शकतं. जसं की ज्ञानेश्वर माऊलींनी तरुण वयात ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ‘ज्ञानदेवी’ ही गीताटीका लिहिली. सर्वसामान्यांपर्यंत तत्त्वज्ञान पोचवले.
सकाळचे आठ वाजले तरी अजून तात्या खोलीतून बाहेर आले नव्हते. नातवंडांना बस स्टॉपवर सोडण्याचं काम त्यांच्याकडे. मुलगा ऑफिसला निघून गेलेला. सून काम करता करता ऑफिसला जायच्या तयारीत. मुलांची चुळबूळ. पुन्हा पुन्हा तात्यांच्या खोलीत डोकावत होती. सव्वाआठ झाले. अजूनही तात्या झोपलेले. आता मात्र सुनेची चिडचिड सुरू झाली. वैतागली.
‘तात्या… तात्या उठताय ना? सव्वाआठ झाले. बस स्टॉपवर जायचंय ना?’
आळस देत तात्या उठले….. बर्याच घरात हे दृश्य पहायला मिळतं.
कधी दोघांपैकी एकाने एक्झिट घेतलेली असते. मागे राहिलेला एकटा जीव कशाकशात जीव गुंतवत असतो. मोठ्या छोट्यांशी जमवून घेत असतो. घरात दिवसभर एकटा असतो. नातवंडांना सांभाळण्याची, शाळेत पोहोचवणं आणण्याची जबाबदारी त्यांनी स्वतः अंगावर घेतलेली असते. हळूहळू ते कठीण होऊ लागतं. पण स्पष्टपणे सांगत नाहीत किंवा सांगता येत नाही. मग घुसमट होत राहते. अशावेळी ज्येष्ठांनी मोकळेपणाने तरुणांना समजावून सांगावं. पण आपापसात संवाद नसल्याने अशी कुचंबणा होत राहते. हम दो हमारे दो… अलिकडे हमारा एक… अशा कुटुंबात ज्येष्ठांची पंचाईत होते. यामागे परस्पर मुख्यतः संवादाचा अभाव असतो.
अलिकडे मोबाईल हाती आल्यापासून प्रत्यक्ष शाब्दिक संवाद हरवला आहे. लहान मुलंही तो खेळण्यासारखा वापरतात. खेळण्यासाठी आता मैदानं नाहीत. त्यामुळे मुलं शाळेतून आली की मोबाईल त्यांच्या हाती येतो. अशावेळी आजी-आजोबा घरात असतील तर मुलांना गोष्टी सांगाव्यात, पाढे शिकवावेत. मुलांना पाढे म्हणून पाठ करायचा कंटाळा येतो. मग कॅल्सी असतोच हातात. तोंडी हिशेब जमत नाहीत. ‘आहे की कॅल्सी’. या गोष्टी शिकवल्या तर बुद्धीचा वापर होईल. स्मरणशक्ती वाढेल… हे समजवावे लागते. कधी मुलांसमोर पृथ्वीचा गोल ठेवून आपला भारत देश कुठे आहे ते दाखवावे. मग राज्य, जिल्हे… असं दाखवत आपला जिल्हा, शहर शोधावे… नकाशा वाचायला शिकवावे. त्यातून मुलांची उत्सुकता जागृत होईल. कधी सुट्टीच्या दिवशी जवळपास फिरायला न्यावे. आमराई दाखवावी. माहिती सांगावी. ज्येष्ठ मंडळी एवढं नक्कीच करू शकतात. मधल्या पिढीला चार हिताच्या गोष्टी, अनुभवाचे बोल सांगावेत. रात्रीचे जेवण सर्व मंडळींनी एकत्र घ्यावे. अशा वेळी तीनही पिढ्यांचा आपापसात संवाद, चर्चा होईल. त्याचा मुलांनाही फायदाच होईल. आपले अनुभव भले बुरे सांगावेत. त्यातून स्वतः काय शिकलो हेही स्पष्ट करावे. कधी आपणही कसे चुकलो ते मोकळेपणाने मांडावे.
उतारवयात मित्र, परिवार, परिचित यांच्याकडे समक्ष जायला जमत नाही. अशावेळी मोबाईलचा वापर जरूर करावा आणि संवाद, परस्परसंबंध टिकवून ठेवावेत. नात्यांमध्ये जवळीक निर्माण करावी. सहकार्याची भावना मनाला आनंद आणि समाधान देते. मात्र कोणालाही सतत सल्ले देण्याचे टाळावे. समोरच्याने विचारला तरच सल्ला द्यावा आणि त्याप्रमाणे समोरचा अवलंब करेलच याची अपेक्षा ठेवू नये. घरामध्येही काही चुकीचे होताना आढळल्यास बरोबर काय ते एकदाच सांगावे. पुन्हा पुन्हा सांगू नये. त्यामुळे शब्दाला किंमत रहात नाही. आपण वयाने ज्येष्ठ आहोत म्हणून आपला आब राखला जावा याची अपेक्षा न करता आपले विचार किती उपयुक्त आहेत याची जाणीव बाकीच्यांना व्हायला हवी. तरच ज्येष्ठत्वाचा सन्मान होऊन श्रेष्ठत्व प्राप्त होईल. अगदी सहजपणे. आपल्याला वयाने ज्येष्ठांच्या पंक्तीत बसवले आहे, त्याचा मान राखून श्रेष्ठत्व कसे निभावता येईल, याचे सतत भान असावे आणि त्यानुसार वर्तन असावे.
बाहेर जाऊन समाजसेवा करणे जमेलच असं नाही ना?… अशावेळी घरात काम करणारी सेविका, तिचे कुटुंबीय… यांच्यासाठी जमेल तशी मदत करावी. साहाय्य करावे. आर्थिक परिस्थिती चांगली असल्यास एखाद्या मुलाची जबाबदारी उचलावी. त्यातही समाधान असते. आपण वयस्कर म्हणून समोरच्या प्रत्येकाला काही शिकवण्याच्या भानगडीत तर पडूच नये. यामुळे घरात, घराबाहेर विसंवाद निर्माण होतो. परिणामी नाती विस्कळीत होतातच आणि अति झालं की वृद्धाश्रमाची वाट चालावी लागते.
वय वाढत जाते तसतशी हालचाल मंदावते. स्मरणशक्ती काम करत नाही. तब्येतीच्या तक्रारी सुरू होतात. अशा वेळी जिभेचे चोचले पुरवणं थांबवावं. सौम्य आहार घ्यावा. आणि महत्त्वाचं म्हणजे समोरच्या पदार्थाला नावं न ठेवता आनंदाने भोजनाचा आस्वाद घ्यावा. ज्यामुळे घरातील स्त्री समाधानी राहील. आपल्यामुळे दुसर्याला कमीत कमी त्रास होईल असा प्रयत्न असावा. त्रास बिलकुल होणार नाही असं होऊ शकत नाही. म्हणून होईल तो कमीत कमी व्हावा असं स्वतःला सांगत रहावं.
मतमतांतरे हे विसंवादाच्या मुळाशी असलेलं कारण आहे. कधी कधी स्वतःच्या दोन विचारातही असं मतांतर उद्भवतं. साहजिकच दोन व्यक्तींमध्ये बेबनाव सहज शक्य आहे. कुटुंबातील मुलगा, मुलगी, सून, सासू.. यांच्यात एका पिढीचं अंतर असतं. परिस्थिती, विचार, दृष्टिकोन, कामाच्या वेळा, गरजा, जबाबदार्या, नोकरीचं स्वरूप.. अशा अनेक बाबी बदलत जातात. प्राधान्यक्रम बदलतात. याबाबत दोन पिढ्यांचे विचारव्यूह वेगवेगळे असू शकतात… अशावेळी ज्येष्ठांनी समजुतीने घ्यावं. ‘आमच्या वेळी असं नव्हतं.’ म्हणून वाद घालण्याऐवजी जरासं नमतं घेण्यात ‘इगो’ला धक्का नाही लागणार. उलट पुढच्या वेळी तरुणांना आपली सूचना योग्य वाटेल आणि संघर्ष टळेल. सासूने सुनेला मोकळेपणा द्यावा. स्वयंपाकघरातील लुडबूड कमी करावी. हवी तेव्हाच मदत करावी. सासरी गेलेल्या मुलीच्या संसारात नको इतकं लक्ष घालू नये. तिने विचारलंच तर मार्गदर्शन करावं. आपलं ऐकलंच पाहिजे असा हट्ट धरू नये. वेळोवेळी सूचना, सल्ले देणं टाळावं. अन्यथा गृहकलह निर्माण होतो.
‘वृद्धाश्रम’ शब्द मोठा गोंडस आहे. अलिकडे निर्माण झालेली की केलेली गरज आहे. धकाधकीची जीवनपद्धती, अपुरी जागा, एकमेकांसाठी वेळ देता न येणं, स्वतंत्र संसाराची ऊर्मी, स्वभाव…. अशा विविध बाबींमुळे ज्येष्ठांना वृद्धाश्रमात रहावं लागतं. इथलं वास्तव्य सुखकर होईलच असं नाही. स्वत:ची शिल्लक असेल तर झेपेल तिथे राहण्याचा विचार होऊ शकतो. नाहीतर ठेवतील तिथे सहन करत रहावं लागतं. तिथे असणारे समवयस्क असले तरी तिथे येण्यामागची कारणं वेगवेगळी असतात. ज्येष्ठांना आपल्या नातवंडांमधली भावनिक गुंतवणूक बाजूला ठेवता येत नाही. सतत आठवणी येतात, भेटावसं वाटतं पण शक्य होतंच असं नाही. मुलंदेखील भेटायला येतात असं नाही… फक्त डोळ्यात प्राण साठवून वाट पहात राहणं.. एवढंच काय ते.
ज्येष्ठत्व ते श्रेष्ठत्व… हा विषय मोठा आहे. श्रेष्ठत्व प्राप्त करण्यासाठी ज्येष्ठांच्या रांगेत समाविष्ट होणे अत्यावश्यक असते असं नाही. तरूण वयातही श्रेष्ठत्व प्राप्त होऊ शकतं. जसं की ज्ञानेश्वर माऊलींनी तरुण वयात ‘भावार्थ दीपिका’ म्हणजेच ‘ज्ञानदेवी’ ही गीताटीका लिहिली.सर्वसामान्यांपर्यंत तत्त्वज्ञान पोचवले, तेही त्यांच्या प्राकृत भाषेत.या ग्रंथाला जयंती साजरी होण्याचा बहुमान मिळाला. माउलींनी पसायदान मागितले तेही स्वतःसाठी नाही, तर अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी आणि खरोखरच अवघ्या विश्वात ग्रंथाने मानाचे स्थान मिळविले. अशी अनेक उदाहरणे आहेत… पण आपला दृष्टिकोन वेगळा आहे . त्याला अनुसरून वरील मांडणी केली आहे.
निवृत्तीनंतर माणसाची कार्यक्षमता कमी होत येते. तो विचार करून ज्येष्ठांनी कोणतीही जबाबदारी हाती घेऊ नये. मुलांना तसं सामोपचाराने पण स्पष्टपणे सांगावं. त्याऐवजी आपले अपुरे छंद जोपासावे. जे जमेल ते, झेपेल ते आनंदाने करावं आणि आपला दिवस शांतपणे, स्वस्थपणे, समाधानाने व्यतीत करावा. जन्माला आलेल्या प्रत्येकाला वयाचे ज्येष्ठत्व निसर्ग बहाल करत असतो. ते कोणीही टाळू शकत नाही. पण हे ज्येष्ठत्व श्रेष्ठत्व कसे ठरेल यासाठी मात्र माणसालाच प्रयत्न करायला हवेत. माणूस लक्षात राहतो तो त्याच्या कर्तृत्वाने, विचाराने आणि कार्याने.
–प्रा. विजया पंडितराव
(व्यास क्रिएशन्स च्या ज्येष्ठविश्व / ज्येष्ठत्व साजरा करणारा दिवाळी २०२२ ह्या विशेषांक मधून प्रकाशित)
Leave a Reply