आजच्या पद्धतीप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रातही ‘स्पेशलायझेशन’ विशेष प्रावीण्य असणारे तज्ज्ञ आपल्याला दिसतात. स्त्री रोगतज्ज्ञ स्त्रियांचे आजार, प्रसूतिसंबंधी बाबी बघतात तर नेत्ररोगतज्ज्ञ डोळ्यांचे विकार बघतात. अस्थिरोग, बालरोग, न्यूरॉलॉजी वगैरे विशेष शाखांबद्दल आपण ऐकतो, मात्र आनुवंशशास्त्रतज्ज्ञ किंवा जेनेटिसिस्ट हे नेमक्या कुठल्या प्रकारच्या आजारांचे, कुठल्या अवयवांचे डॉक्टर, हे ध्यानात येत नाही. हे नावच इतकं मोठं आणि उच्चारायला कठीण वाटतं, की त्यामागचं शास्त्र भलतंच कठीण, अगम्य असणार, अशी आपली समजूत होते. वैद्यकीय | आनुवंशशास्त्राच्या अनुभवात, भेटायला येणाऱ्यांच्या मनात जे प्रश्न मुख्यतः डोकावतात, त्यांचा आधार घेत या शास्त्राशी ही तोंडओळख जेनेटिक/ आनुवंशिक आजार म्हणजे नेमकं काय? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जे आजार आपल्या ‘जीनोम’- जिन्स (जनुकं ) आणि क्रोमोझोम्स (रंगसूत्रं) यातील दोषांमुळे निर्माण होतात त्यांना जेनेटिक किंवा आनुवंशिक आजार म्हणता येईल. यातले अनेक आजार वंशागत (इनहेरिटेड) असतात, म्हणजे एका पिढीतून दुसऱ्या पिढीत जाऊ शकतात. काही आजार मात्र त्या व्यक्तीपुरतेच मर्यादित राहतात, त्यामुळे जेनेटिक असले तरी वंशागत नसतात. रंगसूत्रं आणि गुणसूत्रं कोठे असतात? आपल्या शरीरातल्या पेशींमध्ये (काही अपवाद सोडून) न्यूक्लिअस/ केंद्रक नावाचा एक गोलाकार घटक असतो. त्यात ४६ रंगसूत्रे- २३ जोड्या असतात. या रंगसूत्रांवर जवळजवळ २५-३०,००० जनुक असतात, ज्यांच्याही प्रत्येकी २ प्रती असतात. सामान्यतः प्रत्येक व्यक्तीला आई-वडिलांकडून समान संख्येत रंगसूत्रे/ गुणसूत्रे मिळतात.
गुणसूत्र हा डीएनएचाच एक ठराविक भाग असतो जो एखादं विशिष्ट प्रथिनं वा पदार्थ बनवण्यासाठी आवश्यक असतो. पालकांकडून त्यांच्या अपत्यांकडे आनुवंशिक घटक जातात. तरीसुद्धा पालक (आई-वडील) एकच असतील तरी त्यांची मुले मात्र वेगवेगळी कशी बनतात? हे प्रश्न सर्वांच्याच मनात येतात. स्त्री बीज व पुरुष बीज यांच्या संयोगातून नवीन गर्भ बनतो. स्त्री बीजात आईच्या व पुरुषबीजात वडिलांच्या ४६ पैकी २३-२३ रंगसूत्रांची व त्यावरच्या जनुकांची एकेक प्रत असते. त्यामुळे नवीन बनणाऱ्या गर्भाला एकंदरीत ४६ रंगसूत्रे व प्रत्येक जनुकाच्या दोन प्रती मिळतात ज्यातून आई-वडिलांचे गुणधर्म त्यांच्यात येतात. स्त्रीच्या वा पुरुषाच्या ४६ रंगसूत्रांमधली २३ रंगसूत्रं त्यांच्या बीजांमध्ये जातात, मात्र हे होण्याआधी जोडीमधील गुणसूत्रांची सरमिसळ होते. उदाहरणार्थ आईची १ क्रमांकाच्या संकसूत्रांची जोडी म्हणजे तिच्या आई-वडिलांकडून मिळालेली १ क्रमांकाची एकेक प्रत असते. त्या जोडीतली जनुकं मिसळली जातात आणि त्यातून बनणारं ‘नवीन’ एक क्रमांकाचं रंगसूत्र पुढे बीजामध्ये जातं. पुरुषबीज तयार होताना असंच घडतं. त्यामुळे स्त्री व पुरुषांच्या २५,००० जनुकांमधून जितक्या पटीत वैविध्य निर्माण होईल तितक्या प्रकारे पुढची पिढी वेगळी बनेल- व्यक्ती तितक्या प्रकृती.
-डॉ. कौमुदी गोडबोले
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply