नवीन लेखन...

नात्यांचा गेट – टू – गेदर

आपल्या समाजव्यवस्थेत कुटुंब एक संस्था आहे. बहुतांश कुटुंबांचा प्रवास हा एकत्र कुटुंब पद्धतीपासून एकेरी कुटुंब पद्धतीकडे झालेला दिसून येतो. परंतु याचा अर्थ असा नाही कि वेगवेगळ्या नात्यांचे महत्व व त्यांचा आपल्या जीवनावरील प्रभाव नाहीसा झाला, नक्कीच त्यामध्ये कमी-अधिक बदल झाला असेल तरी त्याचे अस्तित्व अजूनही कायम आहे. आजच्या बदलत्या समाजव्यवस्थेत नात्यांच्या वेगवेगळ्या रंगांचा अनुभव घेयचाच असल्यास एखादा मोठा कौटुंबिक सोहळा किंवा कार्यक्रम सर्वात उत्तम जागा आहे. अश्या सोहळ्यांमध्ये आपण पूर्णपणे जागरूक अवस्थेत व विनोदबुद्धी दक्ष ठेवल्यास मानवी स्वभावाचे अनेक नाव-नवीन प्रकार अनुभवायास मिळतात.

“तत्वज्ञानी नातेवाईक ” या प्रकारातील लोक नेहमीच दुसर्यांना स्वतःचा कधी न मागितलेला सल्ला देण्यास तत्पर असतात . कोणत्याही गोष्टीत व कामात बारीक-बारीक चुका दाखवून आपले उच्च विचार मांडण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळ योग्यच वाटत असते, थोडक्यात सांगायचे म्हणजे या लोकांना वेळेचे भान नसते. यांची देहबोली देखील स्वभावाला पूरकच असते. विषय कोणताही असो राजकारण, अर्थकारण, देश, विदेश, विज्ञान इ.. प्रत्येक विषयात आपला सखोल अभ्यास असल्याचा गोड गैरसमज बाळगून आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीत उच्चतम शिखरावर ठेवणे हे यांचे वैशिष्ट्य, छंद म्हणाल तर युवकांना जबरदस्तीचे मार्गदर्शन करणे. अश्या लोकांना ऐकण्याची मज्जा वेगळीच असते परंतु एक ठराविक अंतर ठेवुनच.

“जावई ” नावाचा प्राणी, हा प्राणी दोन पायांचाच असतो, अगदी सर्वसाधारण माणसासारखाच दिसतो परंतु तरीही हा प्राणी पृथ्वी या ग्रहावरचा नसून बाहेरून आला आहे असा भास झाल्यास आश्चर्य वाटण्याची गरज नाही. नातेवाईकांमध्ये हा प्रकार अतिशय मौल्यवान, नाजूक व जतन करून ठेवण्याचा असतो. कोणत्याही कौटुंबिक कार्यक्रमात या प्राण्याच्या आजूबाजूला नेहमीच दोन-चार डोकी निव्वळ मनोरंजनासाठी व तोंडातून पडलेला शब्द झेलण्यासाठीच तत्पर असतात. यांचे झेलण्याचे अप्रतिम कौश्यल्य अर्थातच घरातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळेच लाभते. जावयाच्या प्रत्येक गोष्टीत होकार पुरवणे, उगाचच चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवणे, सतत आग्रह करणे अशी यांची काही ठराविक वैशिष्ठे यांमध्ये अढळतात. या प्राण्यासाठी एवढे करूनही नाराजी व्यक्त करणारी प्रजाती यात सापडते याचा खेद वाटतो.

थोडंसं हटके बघितले तर पारिवारिक कार्यक्रमात आत अजून एक दुसरा कार्यक्रम शांतपणे सुरु असतो, तो म्हणजे “मुली-मुले दाखवण्याचा अघोषित कार्यक्रम” ज्या पालकांना आपल्या पाल्यांचा लवकरच बार उडवण्यानचा विचार असतो त्यांच्यासाठी तर हि सुवर्ण संधीच असते. यासाठी पद्धतशीरपणे पेहरावापासून ते चालण्या-बोलण्यापर्यंत नियोजन व रंगीत तालीम करून घेतली जाते, त्यासाठी पालकांकडून विशेष महत्वाच्या सूचना व मार्गदर्शन पुरवले जाते. बिचाऱ्या मुलं-मुलींची इच्छा नसली तरी जबरदस्तीने नटून-थटून, हसू येत नसेल तरी चेहऱ्यावर एक हलकासा हसरा भाव ठेवून बुजगावण्यासारखे मिरवावे लागते. काहींची तशी हौसदेखील असते, अशी मुले कार्यक्रमाचा आनंद लुटतात परंतु इच्छेविरुद्ध आलेल्यांची मनाची घुसमट समजण्याची पालकांनी तसदी घेणे थोडेसे मला तरी गरजेचे वाटते.

एक खास वर्ग आपल्याला कोपऱ्या-कोपऱ्याने मिरवतांना, कुठेतरी लोकांपासून लांब शांत बसलेला आणि कधी येथून पाय काढता येईल याची संधी शोधणारा पाहावयास मिळतो. हा असतो “स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा वर्ग” डोक्यात एका बाजूला अभ्यास व परीक्षेचा सतत घोळणारा विचार व दुसऱ्या बाजूला नातेवाईकांचे येणारे तीक्ष्ण बाणासारखे प्रश्न यामध्ये हा पिसलेला असतो. लोकांची नजर चुकवून त्यांच्यापासून लांब राहणे हा या मुलांचा स्वभाव नसतो तर मजबुरी असते कारण यश-अपयश हा जरी शेवटच्या दिवसाचा निर्णय असला तरी तितपर्यंतचा प्रवास मोठा आणि कठीण असतो, तरी याचा काहीही विचार न करता काही लोक कळत-नकळत मुलांचा आत्मविश्वास कमी होईल असे बोलून त्यांचा हा प्रवास अजून कठीण बनवतात.

आपण कधी-कधी सहजपणे म्हणतो कि काही लोक साखरेपेक्षाही गोड असतात, याचा संबंध त्यांच्या स्वभावाशी असतो. परंतु काही लोक फक्त तोंडावर बोलण्यापुरतेच गोड असतात ते नेहमीच तोंडात साखर ठेऊन बोलतात कि काय असे वाटते. असले नातेवाईक कार्यक्रमात फक्त स्वतःचे चाहते वाढवण्याच्या हेतूने मिरवत असतात. काहीही असो समोरून आपला गोडपण सोडायचा नाही असा पक्का निश्चय असतो. परंतु पाठीमागे दुसयांच्या नावाचे खडे फोडण्यात देखी यांचाच अव्वल क्रमांक असतो.

एकीकडे रुसलेले चेहरे तर दुसरीकडे प्रफुल्लित हास्य, कुणीकडे नव्या नात्यांची सुरवात तर कुणीकडे जुन्या नात्यांची सावरासावर, एकीकडे भावनाशून्य मन तर दुसरीकडे भावनिक झालेले मन, एकीकडे नवीन वादांची सुरवात तर दुसरीकडे जुन्या वादांवर पांघरून असा हा नात्यांचा गेट-टु -गेदर रंगीबेरंगी व्यक्तिरेखांनी रेखलेला व असंख्य भावनांनी बहरलेला.

— विवेक विजय रणदिवे

Avatar
About विवेक विजय रणदिवे 5 Articles
मला वेगवेगळ्या विषयांवर लिखाण करण्याचा छंद आहे. सामाजिक प्रश्न, राजकारण, जीवनाशी निगडित इतर विषय.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..