नवीन लेखन...

घास रोज अडतो ओठी

हॉलमध्ये तुफान गर्दी .
सगळीकडे झगमगाट .

फॅशनच्या नावाखाली काहीही परिधान केलेल्या ललना आणि फाटलाय की टेलर ने वाकडी तिकडी कैची चालवून शिवलेल्या वस्त्राला फॅशन म्हणून स्वीकारलेले पुरुष दागदागिन्यांचं प्रदर्शन. परफ्यूमचा बेशुद्ध व्हायला लावणारा घमघमाट. काहींच्या तोंडी, त्यांनाच केवळ सुमधुर वाटणारा अल्कोहोलचा सुवास.

हातात कुणीतरी कोंबलेला पेढा, सुपारी आणि उरलेल्या अक्षतांचं काय करायचं या संभ्रमात असताना, मघाशी उगीचच स्माईल टाकून मानेसह अवघ्या शरीराला अनावश्यक हेलकावे देत अचानक जवळून गेलेली तरुणी गेली कुठं, या यक्षप्रश्नात गुंतलेले अनेक तरुण फ्रिज होऊन उभे.

लग्न कधी एकदा लागतंय याची अधिरतेने वाट बघणारे दोन गटात विभागलेले .
एक नवरा नवरी. आणि दुसरे, मिष्टांन्नम् इतरे जना: l

आत्ताही तसंच झालेलं. माईकवरून जेवणाचं निमंत्रण घोषित झालं. आणि नवरा नवरीला विसरून गर्दी जेवणाच्या हॉलकडे धावू लागली .

पण काही चाणाक्ष आणि अनुभवी लोकांनी लग्न विधी सोडून मघाशी रांगेत उभं राहून मोबाईलमध्ये एक डोळा ठेवून दुसरा डोळा गेट केव्हा उघडत आहे यासाठी सजग ठेवलेला. अखेर तो क्षण आलाच. गेट उघडलं. आणि मग, पळा पळा कोण पुढे पळे तो …ची शर्यत सुरू झाली बुफे असल्याने सराईतानी रांग लावताना कोणकोणते पदार्थ आहेत, बॉउल्स किती घ्यावे लागतील याचा अंदाज घ्यायला सुरुवात केली. नंबर येईपर्यंत काय करायचे म्हणून काहींची ओळखपाळख काढून स्माईल्स ची देवाण घेवाण.

“अरे व्वा , खूप वर्षांनी भेटतोय, या वर्षीचा पाऊस, उन्हाळा, थंडी, राजकारण …” अशा निरर्थक गप्पांमध्ये रंगतोय असं दाखवत रांग अजून का पुढं सरकत नाही म्हणून काहीसे काळजीत असणारे अजून काही .

रांग अजून गच्च दाट झालेली. शेवटी उभं राहणाऱ्या प्रत्येकाला पदार्थ पुरेसे असतील ना ची स्वाभाविक काळजी. आणि आपल्या पाठी अजून बरेच असल्याने, त्यांच्यापेक्षा आपण बरे, असं, त्यातल्या त्यात समाधान करून घेणाऱ्यांची गर्दी वाढत चाललेली.

बसायला जागा नाही. उभं राहायला जागा कमी. अशी अवस्था असताना अचानक सगळ्यांचं लक्ष लंगडत चालणाऱ्या त्या म्हाताऱ्याकडे गेलं. जवळपास नव्वदीच्या आसपासचा वाटत होता. रांगेत उभं न राहता सगळ्यांकडे न पाहता तो पुढं घुसत येत होता. आता रांगेतल्या गर्दीचं कुतूहल संपलं होतं.
आणि त्याची जागा रागानं घेतली होती.

” ओ आजोबा , आम्ही सुध्दा रांगेत आहोत .”
” वयाचा फायदा बरा घेता येतो यांना .”
” आधीच वृध्द त्यात दिव्यांग,आहे काय नि नाही काय,
यांना कोण सांगणार रांगेचं महत्त्व .”
“तर काय , आम्ही काय झक मारायला रांग लावली ?”
” बघा , इतकं बोलतोय पण म्हातारा पुढंच घुसतोय .”
” भैरा असणार.”

लोकांच्या जळजळीत प्रतिक्रिया उमटत होत्या. चीड वाढत होती. तरीही तो म्हातारा नेटाने पुढे जात होता. आरडाओरडा वाढू लागला होता. रांगेतला प्रत्येक जण पुढच्या माणसाला सांगू लागला. ” त्याला घुसू देऊ नका . पाठी ढकला त्याला . जाऊदे सगळ्यात शेवटी.”

म्हातारा शांतपणे पुढे गेला. जागच्या जागी उभे राहून सगळे त्याच्या चिवटपणाचा उद्धार करू लागले. पण थोडा वेळच. त्यानं समोरच्या अन्नाला नमस्कार केला. आणि खिशात हात घातला. आत्ता कुठे रांगेतल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. त्यानं डिश, बाऊल, चमचे असं काहीच घेतलं नव्हतं हातात. लोक बघत राहिले. म्हाताऱ्यानं खिशातून अगदी लहान असा कागदाचा द्रोण बाहेर काढला. ज्यात केवळ अगदी लहानात लहान अशा चमच्याएवढा भात राहिला असता. त्यानं तेवढाच भात त्या द्रोणात ठेवला. वर डाळीचं जरासं वरण घातलं. आणि तिथून तो हलला. हॉलच्या एका खिडकीत त्यानं तो द्रोण ठेवला. आणि हात जोडले. खिशातला रुमाल काढून डोळे टिपले. आणि पाठी वळला.

सगळी गर्दी जेवण घ्यायचं विसरून त्याच्याकडे बघत राहिली. त्यानं एकदा सगळ्यांकडे पाहिलं आणि हात जोडले. ” माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला . मी रांगेत उभा न राहता पुढे घुसून अगोदर नंबर लावला. आपण सगळे चिडला होता. काहीबाही बोलत होता. पण मला राग नाही आला. खरं सांगू , तुम्ही काय बोलत होता , तेही मला ऐकू येत नव्हतं. मी बहिरा नाही, पण माझं लक्ष तुमच्या बोलण्याकडे नव्हतच. मला फक्त …”

त्याचे डोळे भरून आले. क्षणभर तो थांबला. भरून आलेले डोळे रुमालात मोकळे केले. “मला फक्त चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस हीच तारीख आठवते. काश्मीर मध्ये बसवर झालेल्या अतिरेकी हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाले होते. त्यांच्यासाठी आणि देशासाठी शहीद होणाऱ्या सगळ्याच जवानांसाठी मी असा घास ठेवतो. त्यांची आठवण ठेवून, त्यांच्या आत्म्यासाठी मी रोज स्वतः जेवण्या आधी त्यांना जेवू घालतो. मी घरी नसेन तेव्हा, जिथे असेन तेथेच त्यांना घास भरवतो . त्यात सर्वांना त्रास होतो , गैरसमज होतात. पण काय करू ? हुतात्म्यांना जेवण भरवल्याशिवाय माझ्या घशाखाली घास उतरत नाही . कदाचित तुमच्या आनंदावर मी विरजण घालत असेन , तर मला माफ करा. हुतात्म्यांना जेवायला घातल्यावर घरातील सगळे जेवल्याचं समाधान मिळतं मला. आणि एक सांगू, त्या हुतात्म्यात माझाही मुलगा आहे … माझा एक नातू सुध्दा …”

अचानक म्हातारा शांत झाला आणि एक डिश घेऊन रांगेत सगळ्यात शेवट उभा राहिला. सगळे त्याला पुढं बोलवत होते. पण तो तिथेच रांगेत उभा राहिला. मघाशी त्याला बडबडणारे, शरमेनं मान खाली घालून उभे होते. आणि विलक्षण शांतता सगळ्यांच्या हृदयात कालवाकालव करत होती. सगळ्यांचं लक्ष खिडकीकडे जात होतं.

आणि खिडकीत आलेले अदृश्य असे अनेक हुतात्मे जेवून तृप्त होत होते. म्हातारा ताठ मानेनं , हळुहळू पुढं सरकणाऱ्या रांगेत पुढं सरकत होता.
———-
डॉ . श्रीकृष्ण जोशी , रत्नागिरी
९४२३८७५८०६

डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी 123 Articles
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..