सिग्नल सुटायला अवकाश असला तरी काही मंडळींना इतकी घाई झालेली असते की ते झेब्रा क्रॉसिंग पार करून केव्हाच पुढे आलेले असतात. धावण्याच्या शर्यतीत जसे स्पर्धक एकेक पाऊल तयार ठेवून पळण्याच्या तयारीत असतात अगदी तसे. तिकडे धावण्याच्या शर्यतीत शुट झाला की सारे स्पर्धक जीव तोडुन धावू लागतात, त्यांना जिंकायचे असते हे आपण समजू शकतो. पण इथे सिग्नलवर सर्वांनाच पुढे जायची कोण घाई झालेली असते. आजु-बाजूच्या वाहनांना कट मारून, आपलं वाहनं पुढे दामटत निघणारी मंडळी असतेच. बरं पुढे गेल्यावर दुसरा सिग्नल असतोच हे कसे विसरतो आपण. हिरवा सिग्नल व्हायच्या आतच, शेजारच्या रस्त्यावरची वाहने संपली की सारेच सुसाट निघतात. इतक्या घाई-घाईने ही मंडळी कुठे बर जात असली पाहिजे..? या प्रश्नाचं उत्तर काही केल्या सापडत नाही. बर या सिग्नलवरून सुटल्यावर पुढच्या सिग्नलला थांबणे आलेच ना. मग दोन सिग्नलच्या मधल्या मार्गावर घाई करून जाण्यात कोणती बहादुरी असते, कळत नाही. हे सारे घडत असताना कुणाचा तरी कुणाला तरी धक्का हा लागणारच, धक्का लागला की मग हमरी-तुमरी सुरू होते. सुरवातीला शब्दांची मारामारी होते. शब्द अपुर्ण पडायला लागले क़ी मग प्रकरण हातघाईवर येते. हातघाई सुरू झाली की मग त्यात कुणाचं तरी काही तरी निश्चित होतंच.. क्षणभराची ही सिग्नलघाई साऱ्यांनाच वेठीस धरणारी ठरते.
बरं ही अशा प्रकारची घाई एकाच ठिकाणी असते का तर नाही. आपण बघा साधं बसमध्ये चढतांना देखील आपण अशा प्रकारे चढतो, जणू आता ही जगातली शेवटची बस उरली आहे, या नंतर जगात दुसरी बस येणारच नाहीय. बाया-बापड्यांना बाजुला सारत, चिल्ल्या-पिल्ल्यांचा विचार न करता पुढे घुसणारी मंडळी अशा ठिकाणी पहायला हमखास पहायला मिळतेच. मिळतेच. बरं इतकी घाई करून काय मिळवायचं असतं तर बसमध्ये बसण्यासाठी जागा… असो. काही महाभागांना तर इतकी घाई झालेली असते की ते चक्क चालकाच्या दरवाज्यातून आंत घुसतात. तर काही मंडळी लहान मुलांना खिडकीतून आंत सिटवर सोडतात.. रेल्वे स्थानकातही असेच काहीसे चित्र पहायला मिळते. रेल्वे येण्याच्या आधीपर्यंत ही सारी मंडळी फलाटावरच्या बाकड्यांवर पेंगुळलेली असते. रेल्वे जशी स्थानकात शिरते तशी या मंडळींच्या शरीरात वीरश्री संचारते. काही वीर तर फलाटाखाली उतरून रेल्वेरुळाच्या पलिकडच्या बाजुने चढण्याचा पराक्रम करतात….
जिथे कुठे रांग लावावी लागते तिथे घाईचे दर्शन होत असते. रांगेतही मागच्या लोकांना बाजुला सारून, थेट खिडकीजवळ जाणारे काही योद्धे असतातच. अशा वेळी रांगेतल्या मागच्यांनी हटकले तर ‘अहो मला घाई लवकर जायचंय’ असं काही तरी कारण बोलणाऱ्याच्या तोंडावर फेकलं जातं. त्या पुढे जाणाऱ्याला घाई आहे, अन बाकीच्यांना त्या रांगेतच मुक्काम करायचा असतो का…!
शांत, संथ लयीत चालणारं आपलं जीवन आपणच घाई गर्दीत हरवून टाकतोय असं नाही का वाटत. काय फरक पडतो थोडसं सिग्नलवर थांबलं तर.. काय फरक पडतो एसटीत चढतांना थोडा संयम बाळगला तर. काय फरक पडतो.. रांगेत उभे असताना थोडी शिस्त बाळगली तर… पटतं सगळं.. पण वळत नाही.. काय करणार…!
— दिनेश दीक्षित
Leave a Reply