‘घटस्फोट टाळणारी प्रश्नपत्रिका’ हा दैनिक प्रत्यक्ष मधील श्री.सिद्धार्थ नाईक यांनी लिहिलेला लेख आवडला.
लग्नासारखे पवित्र संस्काररूपी बंधन झुगारून कित्येक संसार घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज करण्यापूर्वी पती-पत्नीला एकमेकांना समजून घेण्याचा सल्ला दिला जातो. लग्न टिकविण्याचे प्रयत्न केले जातात आणि त्यातून काही निष्पन्न झालं नाही के मग घटस्फोटासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरु होते.
जगातील प्रत्येक देशाची संसकृती, रूढी, परंपरा, चालीरीती, धर्म, पंथ आणि सामाजिक जडणघडण स्थळ, कालपरत्वे बदलत असतात. समाजाची घडी व्यवस्थित राहावी, हेवेदावे, भांडणं होऊ नयेत म्हणून त्यात सुधारणा होत असतात त्यामुळे तेथील कायदेही वेगवेगळे असतात.
लेखात म्हंटल्या प्रमाणे चीनच्या सिचुआन प्रांतातील यिबिन शहरात राहणाऱ्या तिशीतल्या जोडप्याला न्यायाधीशांनी शंभर मार्कांची प्रश्नपत्रिका सोडविण्यास सांगितले त्यात गाळलेल्या जागा भरा, एका वाक्यात उत्तरं द्या आणि कुटुंबाची विस्तृत माहिती लिहा अशा तीन भागात ही परीक्षा घेतली जाते. गमतीचा पण तेव्हढाच जोडप्याला अंतर्मुख होऊन विचार करावयास लावणार प्रश्नांमध्ये ‘पती-पत्नीचा वाढदिवस, लग्नाची तारीख, जोडीदाराचा आवडता खाद्यपदार्थ, घरात तुम्हीं कोणती जबाबदारी उचलता? कुटुंबाचं तुमच्या आयुष्यातलं महत्व किती यासारख्या प्रश्नांचा समावेश असतो. अर्थात दोघांनाही शंभर मार्कांची प्रश्नपत्रिका सोडवायची असते. परीक्षेत जास्त गुण मिळाल्यास घटस्फोट नाकारतात हे कळलं तर जोडपी परीक्षेत मुद्दाम नापास होतील हे या परीक्षेचं अपयश आहे. अर्थात ही वेळ कुणावरही येऊ नये हीच सदिच्छा. काही वेगळा विचार स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे. हे फक्त आपल्या शेजारी राष्ट्रातच आहे नाही तर जगभर दररोज घटस्फोट घेतले जातात आणि त्यांची करणेही वेगळीवेगळी असू शकतात. असो.
देशात आधुनिकतेची कास धरणाऱ्या युवा पिढीत जास्त घटस्फोट वाढल्याने चिंता आहे. संशोधनात २५ ते ३५ वयोगटातील युवक-युवतींमध्ये घटस्फोटाचे प्रमाण ७४.४ टक्के आहे. शहरी भागात घटस्फोटाचे ८२.६ टक्के प्रमाण आहे. ग्रामीण भागात १७.४ टक्के आहे. घटस्फोटामध्ये उच्च शिक्षितांचे ५३.४ टक्के, तर उच्च निम्तर शिक्षितांचे ४२.९ टक्के प्रमाण आहे. यात इंजिनिअर, डॉक्टर्सची संख्या सर्वांधिक आहे. खासगी क्षेत्रातील युवक-युवतींचे घटस्फोटांचे प्रमाण ३६.५ टक्के आहे. घटस्फोट घेणाऱ्यांमध्ये २६.४ टक्के गृहिणी आहेत. घटस्फोटांमुळे सामाजिक प्रतिष्ठा व मुल्यांवर सर्वात जास्त परिणाम होत असल्याचे ७४.९ टक्के लोकांचे म्हणणे आहे.
लग्न जमवताना खालीली गोष्टींचा विचार व्हावा तसेच लग्न जमलेल्या मुला/मुलीचे योग्य अधिकारी व्यक्तीकडून समुपदेशन व्हावे म्हणजे बरेच समज-गैरसमज दूर होण्यास मदत होईल आणि लग्नानंतर घटस्फोट टाळणारी प्रश्नपत्रिका सोडविण्याची वेळ येणार नाही आणि वैवाहिक आयुष्य सुखी व आनंदी होण्यास मदत होईल. अशी अशा आहे.
लग्न जमवताना शक्यतोवर पत्रिक बघण्याचा घाट न घालता, दोघांच्याही रक्तातील प्रमुख बाबी मेडिकल सायन्सच्या साह्याने तपासाव्यात ज्याने एखादा रोग असल्यास चाचणीत स्पष्ट होईल. उदा. एड्स, टी.बी. कॅन्सर किंवा एखादा असाध्य रोग असल्यास एकमेकांना कळेल व वेळीच जागे झाल्याने पूढील अनर्थ टळेल.
मुला/मुलीच्या चारित्र्याच्या बाबतीत आणि व्यसना बाबतीत एकमेकांशी खोटे न बोलता सांगावे. अचानक ऑफिस मध्ये जाऊन
मुला/मुलीस भेटावे. स्वभाव, नोकरी, आर्थिक उत्पन्न, घराण्याचे वैभव व छानछोकीला भूरळून जाऊ नये. मुला/मुलीच्या कुटुंबाची सखोल चौकशी ज्यानेत्याने करावी. मुख्य म्हणजे लग्ना आधी मुला/मुलीनी एकत्र भेटून गत आयुष्यातील चुका कबुल कराव्यात व पुढे होणार नाहीत याची एकमेकांना खात्री पटल्यास पुढे जावे. काही आर्थिक व वैयक्तीक न्यून आधीच स्पष्ट करावे. सवयी, लकबी व त्रुटी एकमेकांस लग्ना आधीच सांगीतल्यास भविष्यातील गैरसमज दूर होऊन संशयाला जागा राहणार नाही. परंतू बऱ्याच तरुण मुलमुली आंधळ्या प्रेमात लग्नाच्या आणाभाका घेतात व एकमेकांच्या वैभवाला, व्यक्तिमत्वाला, घराण्याला व खोट्या प्रलोभनांना बळी पडल्याने भविष्यात अपयशी होतात. मुला/मुलीच्या मनाचे संतुलन बिघडते. जीवनात वैफल्य व नैराश्य आल्याने व्यसनाधीन व वाम मार्गाला लागण्याचीच शक्यता जास्त असते. काही वेळा फसव्या जाहिरातींना बळी पडल्याने भविष्यात निराशा येण्याची शक्यता असते.
फुकटचे मनोरथ, आपल्याला न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या, मनातल्या मनात इमले बांधण्याच्या हव्यासापोटी तर कधी शेजाऱ्यांची स्पर्धा करण्यासाठी तर कधी चुकीच्या समजुतीतून तर कधी सिनेमा व सिरीयल्सचा आपल्या मन व बुद्धीवर झालेल्या प्रभावामुळे कुटुंबे स्वत:चे नुकसान करताना दिसतात.
मुल उशिरा होणे किंवा न होणे. तसेच लहानसान कारणांवरून आधी सासू-सून, मग नणंद-भावजय आणि सर्वात शेवटी पती-पत्नीत संशय, अविश्वास मग कुरबुरी, भांडण, एकमेकांना कमी लेखणे कधी पत्नीने घर सोडून जाणे किंवा पतीने घालवून लावणे आणि सरते शेवटी परिस्थितीचा उद्रेक व कडेलोट म्हणजे डिव्होर्सला सामोरे जावे लागते.
घटस्फोटाचा प्रश्न फक्त भारत देशा पुरता मर्यादित नसून हा एक जागतिक प्रश्न बनला आहे. दरवर्षी ६४%
डिव्होर्स रेटिंग हे एकटया क्युबा देशाचे आहे. गंमत म्हणजे डिव्होर्स घेऊनही नवरा बायको एकाच घरात राहतात कारण तेथे घरांचा मोठा प्रश्न आहे. भारतातील डिव्होर्सचे खटले देशातील कित्येक न्यायालयात या ना त्या कारणाने प्रलंबित आहेत. या प्रश्नांच्या मुळाशी गेल्यास ठळक कारणे दिसतात ती पुढील प्रमाणे :-
हुंडा, व्यसन, वैचारिक भिन्नता, मुल न होणे तसेच पत्नीने कुलादिपकास जन्मास न घालणे किंवा सर्व मुलीच होणे, अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव, करिअर, आंतरजातीय व आंतरराष्ट्रीय विवाह, अविश्वास, गंभीर आजार, तडजोडीचा अभाव व गरीबी किंवा बेकारी. या अनुषंगाने येणाऱ्या समस्या म्हणजे नवविवाहित पत्नी प्रेग्नंट असेल तर त्यात येणाऱ्या बाळाचे काय? ते कोणाकडे राहील? काय संस्कार होणार त्या निरप्राध जीवावर? याला जबाबदार कोण? संस्कृती, जात, धर्म, पंथ, समाज, अंधश्रद्धा, रितीरिवाज, कुटुंबे, कायदे, सरकार का आपण स्वत:. बऱ्याच वेळा असे पाहण्यात आले आहे की सूड व बदला घेण्यासाठी पती किंवा पत्नी एकेमेकांना घटस्फोट न देता राग, द्वेश व तिरस्कार प्रगट करीत असतात. पण यात आर्थिक व मानसिक नुकसान तसेच अमुल्य वेळेचा अपव्य कोणाचा होतो? वेळ अशी गोष्ट आहे ती तशीच परत येत नाही. आयुष्यात चांगल्या संधी परत परत येत नसतात याचा दोघांनी निट विचार कारणे गरजेचे आहे. आज आपण सर्वत्र पाहतो माणसांची जीवनाकडे बघ्यण्याची वैचारिक नैसर्गिकता जाऊन कृत्रिमता येऊ लागली आहे व त्याने त्यांच्या घकाधाकीच्या दैनंदिन जीवनात वैफल्यता आल्यासारखे दिसते आहे. माणसं सुखी, समाधानी व आनंदी नाहीत असे एकूणच आजचे चित्र दिसते. याला आपणच जबाबदार आहोत कारण आपली सामाजिक मानसिकता त्यांची मूल्ये दिवसागणिक ढळत चालली आहेत.
चीनच्या न्यायालयाने घटस्फोट टाळण्यासाठी प्रश्नपत्रिकेचा नवीन फंडा आणला आहे पण त्यात सुद्धा काही त्रुटी आहेत. कायद्याला पळवाटा असल्याने कोर्टकचेरीतून प्रश्न सुटणे मानसिक व आर्थिक दृष्ट्या न परवडणारे व निर्णायक दृष्ट्या वेळकाढू असू शकते. परंतू कायद्याच्या बंधना पोटी काही प्रश्नी कोर्टाकडून निर्णय घ्यावा लागतो. तसेच प्रश्न प्रतिष्ठेचे, गुंतागुंतीचे व हळवे असल्याने समजुतीने व समुपदेशाने सुटतील असे वाटते. अर्थात, त्याला संस्कारक्षम भक्ती, सेवा, श्रद्धा व सबुरीची जोड असायला हवी व त्या बरोबर संतांनी लिहिलेल्या ग्रंथातील मर्यादा मार्ग निर्धाराने व सत्यसंकाल्पाने नित्य जीवनात आचरणात आणला पाहिजे. मुख्य म्हणजे जीवनातील व संसारातील प्रश्नांची उकल करताना किंवा कुठलाही निर्णय घेताना टोकाची भूमिका न घेता कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला व विचार ऐकून घेऊन सुवर्णमध्य गाठावा ज्यामुळे कुटुंब व पतीपत्नीत दुरावा निर्माण होणार नाही व भविष्यात कोर्टकचेर्यांचे व पोलीस स्टेशनचे हेलपाटे घालावे लागणार नाहीत त्यामुळे संसारासाठी वेळ, पैसा व श्रम उपयोगी आणता येईल.
जगदीश पटवर्धन
Leave a Reply