नोव्हेंबर २०१७ ला वाशीमध्ये भरलेल्या ग़ज़ल संमेलनात प्रेक्षकांमधील एका गृहस्थानें (जो स्वत: कवी व गझलकार आहे) , स्वर-काफियाबद्दल प्रश्न विचारला असतां, मंचावरील ज्येष्ठ ज्ञानवंतांनी उत्तर दिलें की, ‘शक्यतो स्वर-काफिया वापरूं नये, शुद्ध-काफिया वापरावा’.
त्या विचाराशी मी स्वत: सहमत नाहीं.
( टीप : कुठल्याही ज्ञानवंताचा अधिक्षेप करायचा माझा किंचितही उद्देश नाहीं . मात्र, त्यांनी मांडलेल्या उत्तरापेक्षा माझें मत भिन्न आहे. इंदौरला हायस्कूलमध्ये असल्यापासून, गेली ५७-५८ वर्षें मी उर्दू-हिंदी शेरोशायरी वाचत आलेलो आहे. भिन्नभिन्न भाषांमधील ग़ज़ला वाचून ; हिंदी-हिंदुस्तानी-उर्दू, मराठी व इंग्लिश भाषांमधील ‘जानेमाने’ समीक्षकांच्या ग़ज़लविषयक ग्रंथांचें वाचन-मनन करून; गेली पंचवीस-तीस वर्षें स्वत: मराठी-हिंदी/हिंदुस्तानी-इंग्रजी ग़ज़ला व ग़ज़लांवर लेख लिहून; आणि स्वत: चिंतन करून, मी माझें मत बनवलेलें आहे. )
वाचकांसाठी मी या विषयावरील माहिती पुढे मांडत आहे .
विभाग – १
ग़ज़लच्या व्याकरणाची अल्प माहिती :
ग़ज़लच्या ( गझलच्या ) जाणकारांना काफिया म्हणजे काय, स्वर-काफिया म्हणजे काय, हें सांगायला नको. परंतु असेही जन आहेत, जे ग़ज़लवर प्रेम करतात, पण तिच्या व्याकरणासंबंधी फार-शी माहिती त्यांना नसते. म्हणून आपण थोडासा ऊहापोह करूं या.
ध्यानात घ्या, आपण ग़ज़लच्या व्याकरणाच्या खोलात जाणार नाहीं आहोत ; फक्त आपल्या विषयापुरती माहितीच बघणार आहोत.
- गज़लमध्ये साधारणतया ५ किंवा अधिक शेर ( द्विपदी ) असतात. प्रत्येक शेर स्वयंपूर्ण असतो.
- प्रत्येक ओळीला ‘मिसरा’ म्हणतात.
- ( पहिल्या व दुसर्या मिसर्याला काय नांव आहे, तसेंच ते कशा प्रकारें लिहिलेले असतात, त्यांची खासियत काय ; मक़्ता, वज़न , बह्,र, अशा अनेक गोष्टींची माहिती आपल्याला देतां-घेतां येईल; पण तूर्तास, आपल्या चर्चेसाठी त्यांची आवश्यकता नाही) .
- गज़लमध्ये दोन प्रकारची यमकें असतात. ‘अंत्ययमक’ म्हणजे खरें तर एक शब्द किंवा शब्द-समूह असतो. त्याला ‘रदीफ’ म्हणतात. (मूलत: अरबी-फारसी-उर्दूमध्ये हा शब्द स्त्रीलिंगी आहे ; पण मराठीत हल्ली तो शब्द पुल्लिंगी वापरायची प्रवृत्ती वाढलेली आहे ).
- अंत्ययमकाच्या आधी आणखी एक यमक येतें , ज्याला काफिया म्हणतात. काफियात, शब्दाची अखेरचें अक्षर ( किंवा शब्दाच्या अखेरची कांहीं अक्षरें) अपरिवर्तनीय रहातात, आणि त्याआधीची अक्षरें बदलतात.
- पहिल्या शेरला ‘मत्ला’ म्हणतात. ( यावरून मराठीत ‘मथळा’ हा शब्द आला आहे). मत्ल्याच्या दोन्हीं मिसर्यांमध्ये ( ओळींमध्ये) रदीफ व काफिया असतात.
( कांहीं वेळा, ग़ज़लमध्ये एकाहून अधिक मत्ले असतात. मात्र , तूर्तास , आपण त्या बाबीत शिरणार नाहीं आहोत).
- अन्य शेरांच्या पहिल्या पंक्तीत रदीफ-काफिया नसतात ; मात्र दुसर्या ओळीत ते असतात.
- प्रत्येक शेर स्वयंपूर्ण असला तरी, सर्व शेर एकमेकांशी रदीफ-काफियानें जोडलेले असतात.
कांहीं उदाहरणें :
रदीफ-काफियाचें एक उदाहरण पाहूं या.
( हे माझ्या एका हिंदुस्तानी गज़लचे कांहीं शेर आहेत. हिची पूर्वप्रसिद्धी, ‘येवा कोंकणात’ पाक्षिक, दि. ११.११.२०१७ ) –
मत्ला :
क़ाबू में नहीं मेरे, उस मन का क्या करूँ ?
उस दिल चुरानेवाले दुश्मन का क्या करूँ ?
पुढील कांहीं शेर :
वो ना दिखते , न सही ; पर अक्स तो दिखे
खिड़कीतले छुपा मैं, दर्पन का क्या करूँ ?
आग़ोश में आने को वो आगे बढ़ते भी
उड़ उड़ के बीच आए दामन का क्या करूँ ?
मैं दर्दे जिगर अपना दुनिया से छुपाता
पर आँख से बरसते सावन का क्या करूँ ?
( शब्दार्थ : अक्स : प्रतिबिंब ; आग़ोशआ: आलिंगन ; दामन : मूल अर्थ ‘कमीज़ का आगे का छोर’ , मगर भारत में ‘आँचल’ यह अर्थ भी लिया जाता है । )
इथें ‘क्या करूँ’ हा शब्द-समूह रदीफ आहे.
काफियासाठीचे शब्द आहेत – मन, दुश्मन, दर्पन, दामन, सावन.
आतां स्वर-काफियाचें एक उदाहरण पाहूं या, म्हणजे पुढील चर्चा सोपी जाईल.
( हें उदाहरण म्हणजे माझ्याच एक गज़लमधील कांहीं शेर आहेत . पूर्वप्रसिद्धी : वरीलप्रमाणेंच).
इश्क़ ज़िंदगी है, इश्क फ़ना भी है
इश्क़ के लिये जान दी, जान ली है ।
इश्क ख़ुदा भी है, इश्क ख़ुदी भी है
अवतारे इश्क़ पे ही टिकी ख़ुदाई है ।
इश्क़ मुश्क़ है, इश्क़ पे फ़ख़्र है
शख़्स, दे सदा, ‘इश्क़ ही बंदगी है’ ।
(शब्दार्थ : फ़ना : मृत्यु ; ख़ुदी : स्वाभिमान, अस्मिता ; ख़ुदाई : संसार, जगत् ; मुश्क़ : कस्तूरी, musk ; फ़क़्र : अभिमान ; सदा : पुकार ; बंदगी : पूजा ).
इथें रदीफ, ‘है’ हा शब्द आहे. काफियासाठी वापरलेले शब्द : भी, ली, ख़ुदाई, बंदगी.
इथें , ‘ई’ हा स्वर-काफिया आहे.
— सुभाष स. नाईक
Subhash S Naik
भ्रमणध्वनी : Mobile : 9869002126
ई-मेल : vistainfin@yahoo.co.in
GHAZAL AND SWAR-KAFIYA –
Summary : Using a ‘Swar Kafiya’ ( as against a ‘pure’ Kafiya ) does not make a difference. (Swar-Kafiya is accepted in Urdu. ) . What is more important in a Ghazal is its ‘Ghazaliyat’ , i.e. having the main characteristic for being a Ghazal.