स्वातंत्र्यदिनानिमित्त
स्वतंत्र-भारत सत्तरीचा
अन् मीही सत्तरीचा
दोघांचें वय एकच . १
मी म्हातारा झालो
पण देशाचें लोकतंत्र
अजून बाल्यावस्थेतच आहे.
हजारो वर्षांच्या इतिहासात
सत्तर वर्षें ती काय ! २
माझ्यासारख्या अनेकांना
हा देश पुरून उरेल.
माझ्यासारख्या अनेकांना
गाडून, ‘पुरून’,
हा देश उरेल ? ३
आम्ही तर देशासाठी
कांहीं पुण्यकर्म
केलें नाहीं म्हणा ;
पण पूर्वसूरींचें पुण्य
या देशाला कितपत पुरेल ?
कुणाकुणाच्या कुकर्मांचा
घडा कधी भरेल ?
त्यातून कांहीं धडा मिळेल ? ४
सत्तरी, शंभरी,
अन् शतकानंतरची सत्तरीही येईल
पण आतां तरी कांहीं भलें होईल कां ?
की, अशी वर्षेंच फक्त मोजत बसायची
देशाच्या ‘असण्याची’ ? ५
आमच्यासाठी नाहीं, पण,
पुढल्या पिढ्यांसाठी तरी
हा देश पुढे पुढे, वर वर जावो
पुढलं शतक, पुढलं सहस्त्रक
माझ्या देशाचं असो.
सत्तरीतल्या देशासाठी
सत्तरीतल्या माझी
एका नागरिकाची
हीच घोषणा भलीमोठी .
खरीखोटी !
वांझोटी ?
— सुभाष स. नाईक
Subhash S. Naik
Leave a Reply