!! अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त !!
‘गुरु शिवाय मोक्ष नाही’ जेंव्हा जेंव्हा काही अध्यात्मिक चर्चा ऐकल्या, वाचल्या सर्वातून हा एकच निष्कर्ष निघाला. तशी मी फार कर्म-कांड करणारी नाही. मोरयाचे नाव मनात आणि योगेश्वरच्या कर्मयोगाची श्रद्धा कार्यात आणण्याचा प्रयत्न सतत होता. अचानक एक अनोळखी व्यक्तीशी ओळख झाली आणि माझ्याकडे एकटक बघत ती व्यक्ती एकदम म्हणाली, तुम्ही एकमुखी दत्ताची आराधना करा. ही खूप आधीची गोष्ट होती. मी फार लक्ष दिले नाही. माझी मोरयाची भक्ती चालूच होती. योगायोगाने म्हणा किंवा संकेत म्हणून म्हणा माझ्यासाठी गुरवार हा lucky day ठरायला लागला. प्रत्येक महत्वाची आणि चांगली गोष्ट गुरुवारी घडायला लागली.
ह्या सगळ्या संकेतांमुळे मला गुरु भेटावा याचा ध्यास लागला. अर्थात ही एका जन्माची कमाई नसते. अनेक जन्माची पुण्याई येथे कामी येते. पण या जन्मापासून सुरुवात करायला काय हरकत आहे? ह्या विचारांनी मनात घर केले. अर्थात त्याने मोरयावरची भक्ती जराही कमी नाही झाली.
पण अचानक दत्तगुरुनी बोलावून घेतल्यासारखे मला गिरनार पर्वत दर्शनाचे बोलावणे आले. माझ्या दृष्टीने दहा हजार पायऱ्या चढणे आणि उतरणे ही एक अशक्यप्राय गोष्ट होती. पूर्ण यात्रा मनाची कसोटी बघणारी होती. पावला – पावलावर दत्तगुरुनी साथ दिली. आणि त्यांच्याच कृपेने यात्रा सफल झाली.
पूर्ण यात्रेदरम्यान आलेले अनुभव, टाळता येण्यासारख्या चुका, श्रद्धा आणि चिकाटीने बदलेली मानसिकता हे सर्व माझे अनुभव या लेखांदरम्यान प्रामाणिकपणे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. कदाचित माझे पायऱ्यांचे नंबर थोडेफार पुढे-मागे होऊ शकतात. कृपया त्याबद्दल क्षमस्व!!
पूर्ण यात्रेचा अनुभव माझ्यासाठी एक अद्भुत चमत्कार आहे. शब्दांच्या पलीकडे आहेत त्या भावना!! यात्रा 5 भागात लिहिली आहे. त्यावरून तुम्हाला माझ्या आनंदाची, अद्भुत अनुभूतीची थोडी फार कल्पना यावी ही इच्छा!!
माझ्या ह्या अनुभवाचा कोणाला उपयोग झाला तर मी माझ्या हातून दत्तगुरुची सेवा घडली असे समजेन.
— यशश्री पाटील.
Leave a Reply