नवीन लेखन...

गिरनार यात्रा (भाग – २)

आजूबाजूचा परिसर सपाट ओसाड होता. जसे जसे आम्ही गिरनार पायथ्याशी पोहचत होतो, आम्हला गिरनारच्या डोंगर रंगांचे दर्शन होत होते. गिरनार पायथ्याला गिरनार तलेठी म्हणतात. अशी आमच्या ज्ञानात त्या रिक्षावाल्याने भर टाकली. गिरनार पर्वताच्या पायथ्याला म्हणजेच तलेठीला भवनाथ मंदिर, भगवान महादेव मंदिर, मृगी कुंड, लम्बे हनुमान मंदिर अशी प्राचीन प्रेक्षणीय स्थळे आहेत. गिरनार तलेठीला पोहचलो. त्या रिक्षावाल्यांनी आमचं सामान उतरवून दिले. आणि जेवढे ठरले होते तेवढेच पैसे घेतले. वेटींग चार्जेस नाही की परत थोडे उलटे गेलो होतो, त्याचे पैसे नाहीत.

आम्ही मंगल भुवन ह्या हॉटेल वजा धर्मशाळेत उतरलो. सर्वत्र स्वच्छता! राहण्याची उत्तम सोय.. लिफ्टची सोय सर्व सोयी उत्तम होत्या. तीनच मजले होते. तरी पण लिफ्ट का? आम्हाला लवकरच ह्या प्रश्नाचे उत्तर मिळणार होते.

साधारण 4 वाजता आम्ही आमच्या रूम्स मध्ये होतो. सर्व स्थिर स्थावर करून 5 वाजता आम्ही चहासाठी खाली उतरलो. रूम्स पण नीट नेटक्या स्वच्छ होत्या. खाली चहा घेता घेता तिथल्या लोकांशी बोलणी झाली. ते जमेल तेवढी माहिती पुरवत होते. हलकं सामान ठेवा, रात्री चढणार असाल तर एकत्र रहा, मागच्याच आठवड्यात एका सिंहाने भातृहरी गुहेच्या पुजाऱ्याला उचलून नेले. न कळत एक आवंढा गिळत आम्ही मन डोलावली.

7 .30 ला पुन्हा खाली येऊन जेवण्याचे ठरले. मग रूमवर जाऊन बरोबर काय न्यायचं ते एका सॅकमध्ये घेतले.. गोळ्या, बिस्किट्स,पाण्याच्या बाटल्या, भीमसेनी कापूर. हो अनेक सुचानांमध्ये हे पण एक होते. दम लागला की अधे मध्ये कापूर हुंगा, फ्रेश वाटेल. तर कापूरही बरोबर होता. पूर्ण मार्गात कुठे ही रेस्ट रूम्स नाहीत त्यामुळे शक्यतो पाणी कमी प्या किंवा अगदीच जायची वेळ आली तर खुलले आसमान के नीचे,पेडोंके पीछे!! एकंदरीतच सगळं अशक्य वाटत होतं. नरेनने माझ्या पायाचे बॅंडेज काढून तिथे बॅंड एड लावले. थोडं मोकळं वाटलं. दुखरा पाय बऱ्यापैकी ताळ्यावर आला होता. पण थोडा ठणका जाणवतच होता.

तर माझ्या साशंकतेमध्ये अजूनच भर टाकत आम्ही 7.30 ला खाली आलो. खूप सुंदर जेवण.इतकं उत्कृष्ट जेवण आणि गरम गरम वाढत होते. फुलके, वांग्याची भाजी , कढी असे टीपिकल गुजराथी चवीचे पदार्थ पोटभर खाल्ले.

मी सहज त्यांना विचारले, ‘बाजरानु रोटलो नथी?’ तो एकदम खुश झाला, त्याने चुलीवर भाजलेल्या गरम गरम भाकरी वाढल्या. खूपच मज्जा आली. आमच्यासमोर तो करत होता आणि आम्हाला वाढत होता. जास्त खाऊन पण उपयोग नव्हता. पुढे चढायचं होतं.

रूमवर येऊन जरा आराम करायचं ठरवलं. 4 वाजता आलो होतो तेंव्हाच बाजूच वातावरण भारावून टाकणारं होतं. डोंगराच्या पायथ्याशी लहान मोठी चांगली सोय असलेली हॉटेल्स, सुरवातीलाच कुंड, मंदिर सगळं वेगळंच वातावरण होतं. हळू हळू गिरनार परिसराची जादू पसरायला सुरवात झाली.

आम्ही 9.30 ला बाहेर आलो. वातावरण छान थंड होते. आजुबाजुच्या मंदिरांमुळे आणि प्राचिन कुंडांमुळे ते अजूनच पवित्र आणि प्रसन्न वाटत होते.  खुपश्या positive vibes मिळायला लागल्या. What’s up ग्रूपवर आमच्या सर्व नातेवाईक आणि मित्र मंडळींनी शुभेच्छा देऊन आमचा उत्साह अजून वाढवला होता.

नंदाताईचे शब्द मनात कोरून ठेवले होते, सावकाश पण निर्धाराने चढ! ते वाक्य माझ्यासाठी परवलीचे वाक्य ठरले माझ्या पूर्ण प्रवासात..! विशेषत: परतीच्या प्रवासात!

फक्त पुढची पायरी बघायची, किती चढलो, किती राहिल्या हा विचार डोक्यात आणयाचाच नाही. असं आम्ही एकमेकात ठरवलं. काठी घेणं गरजेचं असतं.येताना तिचा फार उपयोग होतो. तीच एकमेव आधार ठरते उतरताना.

आम्ही पहिल्या पायरीच्याजवळ हनुमानाचे मंदिर होतं तिथे थांबलो आणि नरेन आणि जिजाजी सर्वांसाठी काठ्या घेऊन आले. मारुतीरायाला सफळ यात्रेसाठी बळ दे  अशी मनोभावे प्रार्थना केली. पौर्णिमा आदल्या दिवशीच होऊन गेली होती आणि निरभ्र आकाशात पूर्णाकृती चंद्र तेजाने तळपत होता.

आमच्या नजरेसमोर 3 डोंगर होते आणि गिरनारच्या पाय वाटेवरचे दिवे त्यावर लुकलुकत होते. त्यांचा आकार एकदम ओंकारसारखा होता. आणि त्याच्या शिरावर चमकणारा पूर्ण चंद्र. काय दृश्य होते ते!

तोंडातून आपोआप ‘फणिंद्र माथा मुकुटी झळाळी’ श्लोक बाहेर पडला. ‘तुजवीण शंभो मज कोण तारी?‘ अशी विनवणी आम्ही केली आणि त्याने पण ओंकार दर्शन देऊन ‘मी तुमच्या सतत बरोबर आहे’ असे आश्वासन दिले.

मगाशी आलेली negativity कुठच्या कुठे पळाली. ‘अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त’ असे म्हणत, पहिल्या पायरीला वाकून स्पर्श केला आणि गंमत म्हणजे, ‘मोरया तारून ने रे!’ अशी आर्त साद आपोआप मनात उमटली. पावलापावलावर मोरायचाच अखंड जप चालू होता माझा.

देव सर्वत्र आहे आणि एकच आहे ह्याचीच प्रचिती नाही का ही?  त्या भक्ती रसाने न्हायलेल्या वातावरणात माझ्या पायाच दुखणं कुठे गायब झालं कोण जाणे?

सर्वांनी आप-आपल्या श्रध्दा स्थानाचे स्मरण केले, पहिल्या पायरीला वाकून नमस्कार केला आणि चढण चढायला सुरुवात केली.

यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..