गोरक्षनाथ शिखरवरून आम्हाला बरोब्बर समोर अखेर शेवटी गुरू शिखर दिसले. खूप धन्य वाटले!
पण अजूनही पूर्ण अंधार होता. आणि मध्ये मोठ्ठी दरी. गुरुशिखर निमुळते होत गेलेले. आणि त्या शिखरावर एक छोटे मंदिर, एवढीच जागा.. पोहचणार कसे तिथे..? आसपास पायऱ्या दिसतच नव्हत्या. मला एकदम त्या आगांतुकाचे शब्द आठवले, डोंगराळ, खडकाळ रस्ता आहे, कठीण चढण आहे. ठीक आहे, इथेपर्यांत आणलय त्याने, पुढे पण तोच नेईल. असे म्हणत पुढे निघालो.आणि आमच्यासमोर पाताळात नेतायत असे वाटणारे असंख्य जिने! म्हणजे आम्हाला आता हा डोंगर उतरून समोरचा डोंगर चढायचा होता. जवळपास २२५० पायऱ्या उतरणे आणि ते झालं की आम्ही दोन कमानी पाशी पोहचणार होतो. त्यातली एक कमान गुरुशिखरकडे जाते. एक कमंडलू तिर्थाकडे. अर्थात हे आम्हाला तिथे पोहचल्यावर कळलं.
वरून गुरुशिखर, पाताळात जाणारे जिने आणि दोन कमानी एवढच दिसत होतं. उतरताना तर मी एकदम खुश होते. धडाधड त्या २२५० पायऱ्या संपल्या. मी आणि नरेन यावेळेला सगळ्यात पुढे होतो. लांबवर आम्हाला बाकी लोकं सावकाश उतरताना दिसत होते.
मग आम्ही त्या दोन कमानी पाशी पोहचलो. त्यावर गुरूशिखर आणि दुसऱ्या कमानी वर कमंडलू तीर्थ असे लिहिले होते. आम्ही विचारात पडलो. आधी कुठे जायचं असतं. मग आम्ही बाकी लोकं येई पर्यंत वाट पहायच ठरवलं.
उगाच चुकामूक नको.तसेही सुरवातीच्या २२५० पायऱ्यानंतर मोबाईलची रेंज नव्हतीच. पूर्ण जगाचा विसर पडायला लाऊन, पूर्ण तद्रुप होऊन जाणे अशी अनुभूती देणारा हा प्रवास होता.
प्रत्येक टप्प्यावर तुमच्या सहनशक्तीची, चिकाटीची कसोटी होती. किती निर्धाराने तुम्ही प्रवास करत आहात, किती इच्छा शक्ती, श्रद्धा भाव तुमच्या मनात आहेत, ह्याची पण प्रचिती येत होती. मी एका ठिकाणी डळमळीत झाले होते. 5000 पयाऱ्यावर. पण गोरक्षनाथ शिखरावर आपसूकच मी मोरयावर विश्वास टाकून मोकळी झाले होते. हा बदल त्या प्रवासाने घडला होता.
थोड्याच वेळात बाकी लोक तिथे पोहचली.आता शेवटच्या २२५० पायऱ्या होत्या फक्त. खरंच!!! आम्ही एवढा टप्पा पार पाडला होता? आम्ही नाही पार पडला, त्याने करवून घेतलं.मनात असे भाव आपोआप आले.
आता २२५० पायऱ्या नुसतं चढण होतं. चढताना आम्हाला सुरवातीला भेटलेला तो बाया – बाप्यांचा ग्रूप, पायरी पायरीवर बसलेला दिसला. कोणी डोकं टेकून झोपले होते, कोणी कोणाला पाणी देत होते. आम्ही कुतूहलाने विचारलं, झालं तुमचं दर्शन, तर उत्तर आलं नाही, आमच्यातल्या बऱ्याच जणांना उलट्या, चक्कर येणे, मळमळणे असा त्रास झाला. आणि हीच चढण सगळ्यात अवघड आहे. जवळ जवळ आणि उंच अशा ह्या पायऱ्या आहेत. आम्ही खूप वेगाने चढत होतो. त्यामुळे त्रास झाला. त्यांना काही मदत हवी आहे का विचारले, आणि जवळच्या गोळ्या,बिस्किटे, पाणी थोडं देऊन, पुढे निघालो.
देव कसा पाठीराखा असतो हे प्रकर्षाने जाणवले. योग्य वेळी परीक्षा घेऊन, योग्य वेळी सल्ले देऊन आम्हाला आमचे उद्दिष्ट गाठायला मदतच केली.
५००० पायऱ्यावर आगांतुकाकडून आमच्या श्रद्धेची चिकाटीची परीक्षा घेतली.आणि काशिनाथ काकांना तिथेच थांबण्याचा योग्य सल्ला ही दिला.कारण त्यांना त्या २२५० पायऱ्या उतरणे खूप त्रासदायक झाले असते.
आताही शेवटच्या टप्प्यात आम्ही अधीर होऊन उत्साहाच्या भरात भराभर चढू नये म्हणून ह्या लोकांशी गाठ घालून दिली. आणि आम्हाला सावध केलं. आता आम्ही सावकाश दत्तगुरुनचा मनातच जप करत सावकाश चढू लागलो. पण चढण्यात माझा स्पीड एकदम कमी.
त्या डोंगराला मागच्या बाजूने पायऱ्या होत्या. म्हणून गोरक्षनाथ शिखर वरून त्या दिसल्या नाहीत. तसा डोंगर निमुळता होत जात असल्याने वळसेदर जिने होते. सगळे जवळपास पोहचत आले होते आणि मी मागे एकदम! नरेन ऑफ कोर्स माझ्या सतत बरोबर होता.
अखेर शेवटी खालून वर मंदिराच्या बाजूला असणाऱ्या lamp post चे दर्शन झाले. आता फक्त काही जिने की आम्ही गुरू मंदिरात!!! एक वळसा झाला, दोन झाले, शेवटचा जिना काही येईना. मी पुरती दमलेले. होते तिथेच थांबले. अजून किती? तेवढ्यात वरून अरुताई चा आवाज, अग यशा, हे बघ हे दोनच जिने फक्त ये लवकर! आणि त्यांनी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त म्हणत मला प्रोत्साहन दिले.
अखेर शेवटी आम्ही गुरुशिखरावर पहाटेचे 6.30 वाजता होतो. मंदिर नुकतेच उघडले होते.
आमच्या पुढे कोणीही नव्हते. चपला काढून मंदिरात शिरलो आणि दत्तगुरुच्या चरणांचे दर्शन झाले. डोळ्यातून घळाघळा पाणी , हात जोडलेले. सगळं मिळालं, काय हवंय अजून. आपण कोण, का आलोय हे सगळं विसरायला लावणारा तो क्षण होता. हीच का ती समाधी अवस्था? दोन एक क्षण ती अवस्था अनुभवली.पण आपली तितकी योग्यता नाही किंवा अभ्यास नाही, लगेच भान आले. मग मी मोबाईल काढून आजोबांच्या (आईचे बाबा) फोटोला चरण दर्शन घडवले.
मोबाईल काढताच security पुढे आला. पण पुजाऱ्याने त्याला हातानेच थांब अशी खूण केली. फोटोला चरण दर्शन घडवत असाताना देखील डोळ्यातून सतत पाणी वाहत होतेच. पुजाऱ्यांच्या संवेदनशील मनाने माझ्या मोबाईल बाहेर काढण्याच्या मागचे प्रयोजन ओळखले होते त्यामुळेच त्याने security ला थांबवले होते.
आईच्या वडिलांना दत्त गुरूंचे खूप वेड होते. पारायण तर ते कधी चुकले नाहीत. स्वतःही दत्त गुरुंसारखे शांत संयमी आणि संत वृत्तीचे होते.
मन भरून पोट भरून दर्शन घेतले आणि बाहेर आलो. 5 मिनिटात ही गर्दी होती बाहेर. हे सगळे असे जादूने कसे आले.आत्ता तर आस पास पण कोणी नव्हत.अस नवल करीत परतीचा रस्ता धरला.
काही तरी अद्भुत घडलंय अस वाटत होतं. कदाचित माझ्या ह्या भावना आईपर्यंत त्या आजू बाजूच्या तरल वातावरणाने पोहचवला असतील. आईला पहाटे पडलेल्या एका स्वप्नाने जाग आली. तिच्या स्वप्नात मी तिला सांगत होते की अग, आई चमत्कार आहे हा. खूपच अद्भुत आहे सगळं!
एक्झॅक्टली हेच फिलींग होतं माझं त्या क्षणी!!
— यशश्री पाटील.
Leave a Reply