नवीन लेखन...

गिरनार यात्रा (भाग – ५)

एका भारावलेल्या मनःस्थितीत आम्ही 2-3 जिने खाली आलो. आणि आश्चर्याचा सुखद धक्का! समोरून काशिनाथ काका डोली मधून येत होते. त्यांच्या जिद्दीला सलाम!! 6 – 6.15 ला त्या हॉटेल मालकाशी बोलून एका डोलीवाल्याला गाठून ते इथे पर्यंत पोहचले होते. त्यांना बघून आम्हा सर्वानाच अतिशय आनंद झाला. त्यांना दर्शन घेता नसते आले तर आम्हाला काही तरी अपूर्ण राहिले असे वाटले असते.

त्या डोलीवाल्याना ‘काकाना संभाळून न्या’ असे सांगून आम्ही जरा तिथेच विसावलो. डोलीवाले काकांना आमच्या हॉटेल पर्यंत सोडणार होते. खूप काळजीपूर्वक त्यांना नेताना पाहून आम्हाला समाधान वाटले.

आमचे दर्शन झाले होते आणि काही क्षणात काकांना पण दर्शन घेता येणार होते. आमचा आनंद द्विगुणित झाला. आता थोडे रिलॅक्स होवून आम्ही आजू बाजूचे सृष्टी सौंदर्य न्याहाळत होतो. सगळीकडे सोनेरी केशरी मुलामा पसरला होता. सूर्योदय नुकताच होत होता. इतकं लक्षवेधक दृश्य होतं ते.आम्ही ते कॅमेरा मध्ये टिपण्यात दंग झालो. तेवढ्यात कोणीतरी आठवण करून दिली.शिथिल होऊ नका. जेवढं आलोय तेवढं उतरायचं आहे.

आम्ही सृष्टी सौंदर्य दर्शन आटोपते घेतले आणि उतरायला सुरुवात केली. गुरुशिखराच्या शेवटच्या काही पायऱ्या खूपच अरुंद होत्या आणि जवळ जवळ होत्या.त्यामुळे माझ्या चप्पल घसरायला लागल्या. शेवटी मी काही पायऱ्या चपला सरळ हातात घेऊन उतरले.

जिथे 2 कमानी होत्या तिथे पर्यंत आम्ही पटकन आलो.कारण उतरणे मला जास्त सोप्पे वाटले चाढण्यापेक्षा.

कमंडलू तिर्थासाठी परत 300 पायऱ्या खाली उतरून जायचे होते. तिथे अखंड धुनी आणि महा प्रसाद असतो.

कमंडलू तीर्थाच्या निर्माणाची कथा एकदम मनोरंजक आहे. अस म्हणतात, गुरुशिखरावर आजही दत्तगुरु गुरुंचा वास आहे. दत्तगुरु गुरुशिखरावर तपश्चर्या करत होते. 12000 वर्षे उलटली. सौराष्ट्र मध्ये दुष्काळ पडला होता आणि लोक खूप हैराण झाले होते. म्हणून माता अनुसुया देवीने लोक कल्याणसाठी त्यांना हाक मारली. आईची हाक ऐकता तत्काळ दत्तगुरु समाधी सोडून उठले. आणि त्यांचा कमंडलू मांडीवरून खाली पडला. तो जिथे पडला त्याला कमंडलू तीर्थ म्हणतात. कमंडलूचे दोन भाग झाले आणि एका भागापासून अग्नी आणि दुसऱ्या भागातून पाणी तयार झाले. तो अग्नी तिथे अखंड प्रज्वलित असतो आणि तिथले पाणी कधीही आटत नाही.

प्रत्येक सोमवारी सकाळी 6 वाजता धुनी आपोआप प्रज्वलित होते. आणि रविवारपर्यंत कमी कमी होत जाते. आम्ही गेलो तो दिवस शनिवारचा होता. त्यामुळे आम्हाला ज्योतीचे दर्शन झाले पण ज्योत अगदी लहान होती. तिथेच जरा विसावलो. धुनीचा अंगारा घेऊन बाहेर आलो. तिथे महाप्रसाद म्हणून जेवणच असते. कधीही जा तुम्हाला छान गरम गरम अन्न वाढतात. दत्त गुरुंची सेवा म्हणून कोणीही पैसे घेत नाहीत. दुसरे एक विशेष म्हणजे तिथे जेवण झाल्यावर आपण हात धुवायचे नाहीत. ती लोकं हातावर पाणी घालणार आपल्या. ती त्यांच्या दृष्टीने भक्तांची सेवा असते. आणि तुम्ही तिथलं पाणी तीर्थ म्हणून बाटली मध्ये पण घेऊ शकता. आम्ही पण 2-4 बाटल्या भरून घेतल्या.

आमचा तीर्थ प्रसाद होईपर्यंत काशिनाथ काका दर्शन घेवून आले तिथे. सर्वांनी एकत्र धूनीचे दर्शन घेतले परत. नमस्कार करून निघालो.

आता अडीच हजार पायऱ्या चढण होतं. मी परत मागे पडले. एक तर प्रसादाच गरम गरम जेवण झालं होतं आणि दर्शन झाल्याचं रिलॅक्सेशन होतं. तरीही अजून अर्धी लढाई जिंकणे बाकी होते. अस मनाला बजावत, आम्ही त्या अडीच हजार पायऱ्या चढून आलो.सकाळी सकाळी ते दृश्य खूप छान वाटलं. पाताळात जाणाऱ्या खोल पायऱ्या, गुरू शिखर, 2 कमानी हे काल अंधारात पाहिलेलं दृश्य आज उजेडात पाहताना खूप समाधान वाटत होतं.

खूप काही दिलं, मिळालं होतं ह्या टप्प्यात! समाधान, श्रद्धा, आत्मविश्वास, प्रेम अशी सगळी शिदोरी बरोबर होती.

आता गोरखनाथ शिखर आणि अंबाजी माता शिखर ह्यांना संधणारा हिरवाईने नटलेला पूल स्पष्ट दिसत होता. किती समृद्धी! निसर्गाची मुक्त हस्ते उधळण! ते सृष्टी सौंदर्य निरखत अंबाजी शिखर पर्यंत कधी पोहचलो कळलंच नाही. फक्तं 10.30 वाजले होते घड्याळात.

अरे वा! किती पटकन आलो आणि काही त्रास पण नाही झाला. असा थोडा अहं मनात आपसूकच आला. पण !!…… पुढे 5000 पायऱ्या अजून बाकी आहेत हे विसरलो जणू काही. ज्या हॉटेल मध्ये पहाटे चहा घेतला होता तिथे थांबून थोड चहा  पाणी केलं. तिथे पाहिलं तर चक्क थोड्या वेळा पुरती रेंज मिळाली.

काल रात्री 11 वाजता घरी संपर्क केला होता, त्या नंतर आत्ता फोन करायला चान्स मिळाला. पटापट आई, शैलेश, दीदी सगळ्यांना फोन केले. फोन वरून दर्शन झालं, सगळे ठीक आहेत एवढच जेमतेम कळतं होतं कारण खूप disturbance होता.

अजून बरंच जायचं आहे, असं म्हणत तिथून निघालो. अंबाजी मातेचे दर्शन घेतले.

आता मी एकदम खुश होते कारण जिने उतरायचे होते. आणि भक्तीने आधीच सांगितले होते, तिरके तिरके उतारा म्हणजे गुढग्यावर प्रेशर येणार नाही. तिचा as a physiotherapist, हा सल्ला फारच उपयोगी पडला.

आम्हाला संध्याकाळी 5 वाजता वेरावळला जाणारी गाडी पकडायची होती. मी आणि नरेन संध्याकाळी वेरावळला जाऊन सकाळी सोमनाथचे दर्शन घेणार होतो.

पण!! जिथे अहं भाव तिथे तो तुम्हाला बरोबर त्याचं अस्तित्व जाणवून देतो. मगाशी जो नकळत अहं भाव आला माझ्या मनात त्याची प्रचिती लवकरच येणार होती.

11.30 च्या सुमारास आम्ही अंबाजी शिखर सोडलं. मी आणि नरेन पटापट उतरत होतो पण अरुताई  आणि बाकी लेडीज लोकांना त्रास व्हायला लागला. तरीही त्यांनी आम्हाला पुढे जा तुम्ही. गाडी आहे तुमची. आम्ही येतो सावकाश असे सांगून मनाचे औदार्य दाखवले. त्यांना मागे टाकून आमचे मन होत नव्हते. तसेच आम्ही पुढे निघालो.

सुमारे 2600 पायऱ्यांवर एका डोंगराच्या कपारीवर चुडा भरलेल्या हातांचे चित्र होते. तिथे राणक माता देवी असं नाव लिहिलं होतं. रात्री आमच्या नजरेतून ते सुटलं होतं. नमस्कार करुन पुढे निघालो. आता आम्ही 2250 पायऱ्यांवर आलो होतो. भरतृहरी गुहा दिसली. सहज खाली नजर गेली तर दूरवर पहिल्या पायरीची कमान दिसली. अजून इतकं जायचयं?

आणि इथेच गडबड झाली. जाताना कटाक्षाने फक्त पुढची पायरी बघण्याचे ठरवले होते त्यामुळे अजून किती जायचं किती वेळ असे नकारात्मक विचार मनात आले नाहीत.

आता मात्र वर तापत उन, थकलेलं शरीर आणि दर्शनाने श्रांत झालेलं मन अशातच समोर लांबवर दृष्टी पोहचली जिथे पहिल्या पायरीची कमान होती. 10000 x 2 पैकी आता फक्त 2250 पायऱ्या बाकी होत्या आणि तिथेच पाय लटपटले.

जवळच एक टपरी होती. तिथे पांढरे काका बसले होते. त्यांनी हाक मारली. मी आणि नरेन तिथे जरा टेकलो. थंड लिंबू सरबत घेतले. खूप फ्रेश वाटलं. तिथे 5 मिनिटे टेकून लगेच निघायला हवे होते. पण 15 मिनिटे वेळ घालवला तिथे आणि ही दुसरी चूक झाली. उठल्यावर चालता कुठे येत होत? पाय थरथरायला लागले, muscles रिलॅक्स झाल्या. आता तर एक पाय पुढे टाकता येईना. पायात गोळे आले. गुडघ्यांनी नांगी टाकली. पुढे न जाण्याचा हट्टच धरून बसले. थोडक्यात एक पाऊल पुढे टाकताना ब्रह्मांड आठवत होतं.

आता ह्या उरलेल्या पायऱ्या कशा उतरायच्या?

मलाच जाणवली माझी दर्पोक्ती. उतरताना मला अजिबात त्रास झाला नव्हता. त्याचा थोडासा कुठे तरी अहं भाव मनात आला होता आणि दत्तगुरुनी मला योग्य प्रकारे जमिनीवर आणलं होतं. त्यांची माफी मागून मनोभावे प्रार्थना केली. आणि पुढच्या प्रवासासाठी सहाय्य करा अशी विनंती केली.

काठीच्या आधाराने हळू हळू उतरायला सुरुवात केली. एका बाजूला नरेनच्या खांद्यावर भार आणि एका बाजूला काठीवर. अशी माझी वरात उतरत होती.

एका पायरीपाशी माझ्या मनाने give up केलं. मी नरेनला म्हणाले, अजून 1000 पायऱ्या बाकी आहेत. मला काही जमणार नाही. मी इथेच थांबते. तू जा पुढे. पण नरेन अगदी खराखुरा पाठीराखा! त्याने मला खूप प्रोत्साहन दिलं. अगं 20,000 पायऱ्यापैकी आता फक्त 1000 बाकी आहेत. चल तू!

मी पण 5 मिनिट उभ्या उभ्याच डोळे मिटले. मोरयाची प्रार्थना केली, दत्तगुरुंचे स्मरण केले आणि म्हणाले, चल. मोठा श्वास घेतला आणि नॉन स्टॉप 25-30 पायऱ्या उतरूनच थांबले. नरेन एकदम सरप्राइज. तो ही खुश झाला. सतत मला प्रोत्साहन देत राहिला.

परत मोरयाची प्रार्थना, दत्तगुरुंचे स्मरण, मोठ्ठा श्वास आणि धडाधड 25-30 पायऱ्या. परत 5 मिनिटे उभ्या उभ्या विश्रांती. असा क्रम चालू ठेवला.

काही वेळाने कमान समोर दिसायला लागली. मध्ये एकदा नरेनला अरु ताईचा फोन आला की त्यांनी 1000 पायऱ्यांवर डोली केली. कारण त्यांनाही उतरण अशक्य झालं होतं. आणि खरंच नरेन बरोबर होता म्हणून मी उतरू शकले. नाही तर मी पण तिथेच थांबले असते कदाचित!

अचानक नरेनचा आनंदाने भरलेला आवाज कानी पडला. ‘ताई, फक्त 70 पायऱ्या आता! हे बघ, मार्किंग!!!

इतका वेळ आम्ही मार्किंग  कडे मुद्दाम दुर्लक्ष केलं होतं. आणि फक्त निर्धाराने पुढची पायरी ऊतरत होतो. माझा विश्वासच बसेना.आता तर अजून उत्साह आला. आणि त्या उत्साहाच्या भरात मी कमनीच्या पहिल्या पायरी पाशी कधी पोहचले मला कळलेच नाही.

अशा प्रकारे अनेक शंका – कुशंका नी सुरू झालेली माझी गिरनार यात्रा गुरूकृपेने व्यवस्थित पार पडली. योग्य ठिकाणी मार्ग दाखवून, योग्य ठिकाणी परीक्षा घेवून, यात्रा पूर्ण करण्याचे मानसिक आणि शारीरिक बळ देवून पायरी-पायरी गणीक दत्त कृपेचा अनुभव येत राहिला. असे योग वारंवार येवोत हीच गुरू चरणी नम्र प्रार्थना!!

!!अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!! 

!! श्री दत्तार्पणमस्तुइद्ं  मम्!!

— यशश्री पाटील.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..