मधुमेह हा आजार दिवसेंदिवस वाढतो आहे. विशेष म्हणजे तरुण पिढीतही त्याचे प्रमाण जास्त आहे. मधुमेहात रक्तातील साखर वाढते त्यामुळे रुग्णाला असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. रक्तातील ही साखर नेमकी किती आहे हे मोजण्यासाठी जे वैद्यकीय उपकरण वापरले जाते त्याला ग्लुकोज मीटर असे म्हणतात.
मेलिटस किंवा हायपोग्लायसिमिया या रोगात तर ग्लुकोजच्या प्रमाणावर बारीक लक्ष ठेवावे लागते. यात त्वचेवर लँसेटने टोचून रक्ताचा थेंब काढला जातो व तो डिस्पोजेबल परीक्षण पट्टीवर ठेवला जातो, नंतर मीटरवर रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण दाखवले जाते. होम ब्लड शुगर मॉनिटरींग हे मधुमेहात आवश्यक असते. अशा प्रकारे काळजी घेतल्याने मधुमेहामुळे पुढे ज्या गुंतागुंती निर्माण होतात त्या टाळता येतात.
ग्लुकोज मीटर हा हाताच्या पंजाचा आकाराचा असतो. काही वेळेला त्यांचे आकार यापेक्षा लहान-मोठे असू शकतात. बॅटरीवर हे यंत्र चालते. यात परीक्षण पट्ट्या असतात त्यावर काही रसायने लावलेली असतात. त्यांचा रक्ताच्या थेंबातील ग्लुकोजशी संपर्क येताच ग्लुकोजचे प्रमाण समजते. काही वेळा या पट्ट्या प्लास्टिकच्या असतात. प्रत्येक पट्टी एकदाच वापरता येते. काही मीटरमध्ये पट्टीच्या जागी डिस्क असते. टाईप १ मधुमेहात दिवसाला ४ ते १० वेळा तर टाईप २ मधुमेहात कमी वेळा चाचणी करावी लागते. ग्लुकोज मीटरची किंमत तुलनेने कमी असते पण त्यातील परीक्षण पट्ट्यांमुळे खर्च वाढतो.
१९६२ मध्ये सिनसिनाटी हॉस्पिटलमध्ये लेलँड क्लार्क व ॲन लायन्स यांनी पहिल्यांदा ग्लुकोज एन्झाईम इलेक्ट्रोड तयार केला. अँटन एच क्लेमेन्स यांनी त्यात सुधारणा केल्या. १९८० मध्ये ग्लुकोमीटर व अॅक्युचेक ही दोन उत्पादने बाजारात आणली गेली. यात ग्लुकोजचे ग्लुकोज ऑक्सिडेज या उत्प्रेरकाच्या मदतीने ऑक्सिडेशन करून ग्लुकोनोलॅक्टोनमध्ये रूपांतर केले जाते. काही वेळा यात उत्प्रेरक म्हणून ग्लुकोज डिहायड्रोजेनेस या विकराचा वापर केला जातो.
आधुनिक ग्लुकोजमीटर मध्ये इलेक्ट्रोकेमिकल पद्धत वापरली जाते, ज्यात टेस्ट स्ट्रीपमध्ये कॅपिलरी असतात व त्या रक्त शोषून घेतात, नंतर रक्तातील ग्लुकोजची विकरयुक्त (ग्लुकोज ऑक्सिडेज किंवा डिहायड्रोजेनेस) इलेक्ट्रोडशी अभिक्रिया होते, विकराचे मीडियेटर रिएजंटच्या मदतीने पुन्हा ऑक्सिडीकरण केले जाते व त्यात निर्माण होणाऱ्या विद्युत्प्रवाहाने ग्लुकोजचे प्रमाण समजते.
एखादी व्यक्ती दारू प्यायली असेल तर तिच्या रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण ब्लड अल्कोहोल सेन्सर्सनी समजते त्यात अशाच प्रकारे अल्कोहोल डिहायड्रोनेस विकराचा वापर केला जातो.
Leave a Reply