भारतातील देवस्थानांभोवती असणाऱ्या देवराया ही जैवविविधतेची केंद्रे आहेत. अनेक सजीवांचे वसतिस्थान असणाऱ्या अशा जागा जगात इतरत्रही काही ठिकाणी आढळतात. इथिओपियातल्या देवराया हे अशा देवरायांचेच एक उदाहरण. इथिओपियात जी थोडीफार वनसंपत्ती टिकून आहे, ती या देवरायांमुळेच. या देवराया टिकून राहाव्यात म्हणून इथिओपियात प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांची ही माहिती…
मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील किशोर कुलकर्णी यांचा हा पूर्वप्रकाशित लेख
आपल्या महाराष्ट्रात अनेक देवस्थानांभोवती राखीव वन असते. त्यांना आपण ‘देवराया’ म्हणतो. या देवरायांचे व्यवस्थापन देवस्थानचे विश्वस्त किंवा मालक करत असतात. काही ठिकाणी या वनांतील उत्पादन हे देवस्थानांचा कारभार चालवण्यासाठी उपयोगात आणले जाते. सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम देवरायांच्या परिसरात पार पाडले जातात. देवरायांत वेली, झुडपे आणि वृक्ष, तसेच वेगवेगळे गवतांचे प्रकारही असू शकतात. अर्थात, देवराई ही ज्या भौगोलिक प्रदेशात आहे, त्यानुसारच त्या देवराईत वनस्पतीचे प्रकार आढळतात. अशा देवराया अनेक वर्षांपासून देवस्थानांनी सांभाळून ठेवलेल्या आहेत. या देवरायांचे महत्त्व म्हणजे, या देवरायांत जैवविविधतेला मुक्त वाव मिळालेला असल्याने, इथे वनस्पतींच्या विविध प्रजातींचा खजिनाच असतो. या विविध प्रजातींच्या संरक्षित वाढीमुळे तिथे विविध प्रकारच्या पक्ष्यांचा, कीटकांचाही वावर होत असतो.
अशा देवराया जगात इतरही काही ठिकाणी आढळतात. यांतलेच एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण म्हणजे, आफ्रिका खंडातील इथिओपिया या देशातल्या देवराया. दुष्काळी देश म्हणून गणल्या गेलेल्या या देशात अशा प्रकारच्या हिरव्यागार देवराया दृष्टीस पडणे, म्हणजे एखाद्या ओअॅसिसचेच दर्शन ठरते. इथिओपियात हिंडताना, जर कुठे वन आढळून आले तर खुशाल समजावे, की वनाच्या मध्यभागी एक चर्च असेल. कारण, या देवराया इथल्या चर्चनी राखल्या आहेत. आपल्याकडच्या देवरायांची ज्या पद्धतीने जोपासना केली जाते, अगदी त्याच तत्त्वावर चर्चभोवतालची वने वाढवली जाऊन उपयोगात आणली गेली आहेत.
उन्हापासून संरक्षण देणाऱ्या, काहीसे थंडगार वातावरण निर्माण करणाऱ्या चर्चभोवतालच्या या देवराया विविध कारणांसाठी वापरल्या जातात. धार्मिक कारण हे जरी याचे मुख्य प्रयोजन असले, तरी या जागांचा सामाजिक कारणांसाठीही वापर होतो. ‘इथिओपियन ऑर्थोडॉक्स तेवाहेडो चर्च’ या संघटनेद्वारे इथल्या चर्च आणि त्याभोवतीच्या, धार्मिकदृष्ट्या पवित्र मानल्या गेलेल्या या वनांचे व्यवस्थापन केले जाते. यांतील काही चर्च तर चवथ्या शतकातली, म्हणजे दीड हजार वर्षांपूर्वीची आहेत. त्यामुळे त्यांच्या भोवताली असणाऱ्या देवराया यासुद्धा इतक्या जुन्या काळाच्या साक्षीदार आहेत. इथिओपियातील या देवरायांचे सरासरी क्षेत्रफळ पाच हेक्टर इतके भरते. यांतील काही देवराया फक्त अर्धा हेक्टर क्षेत्रफळाच्या असून काही देवरायांचे क्षेत्रफळ मात्र अगदी तीनशे हेक्टरांपर्यंत आहे. यांतील काही देवराया अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बाहिर दार या शहराजवळच्या ताना तलावातील एक छोटे बेट तर पूर्णपणे एका हिरव्यागार देवराईने व्यापले आहे.
इथिओपियाच्या आजच्या दहा कोटींच्या लोकसंख्येपैकी जवळपास चार कोटी नागरिक या इथिओपियन ऑर्थोडॉक्स तेवाहेडो चर्चचे अनुयायी असल्याने, इथिओपियात अशा देवरायांची संख्या तब्बल पस्तीस हजारांच्या आसपास आहे. यांतील बहुसंख्य देवराया या इथिओपियाच्या उत्तर भागात आहेत. असे म्हटले जाते, की वन म्हणून गणले गेलेले आणि शिल्लक राहिलेले, कदाचित हे इथिओपियातले शेवटचे हरित पट्टे असू शकतील. कारण, इथिओपियातील वने मोठ्या प्रमाणात लोप पावली आहेत. इथिओपियाच्या द्रुतगतिने वाढणाऱ्या लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य मिळावे यासाठी शेतीखालील जमीन वाढवण्याचा निर्णय घेतला गेला आणि १९७४-१९९१ या काळात इथे जमिनीचे राष्ट्रीयीकरण केले गेले. त्यानंतर शेतीखालील क्षेत्र वाढवण्यासाठी इथे मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली गेली. वने होती त्या ठिकाणी गव्हाची शेते वा गुरे चरताना दिसू लागली. त्यामुळे जिथे पूर्वी पंचेचाळीस टक्के जागेवर वैविध्यपूर्ण जंगले होती, त्या इथिओपियात आता पाच टक्क्यांहूनही कमी जागेवर वने शिल्लक राहिली आहेत. इथिओपियातील बहुतेक सर्व वने नष्ट झाली असली, तरी तिथल्या चर्चभोवतीच्या देवराया मात्र धार्मिक कारणांमुळे टिकून राहिल्या आहेत. यांतल्या काही देवराया म्हणजे पूर्वी अस्तित्वात असलेल्या वनांचेच अवशेष आहेत.
चर्चभोवतीच्या टिकून राहिलेल्या या देवराया नामशेष होण्यापासून वाचवण्याचे गांभीर्याने प्रयत्न केले जात आहेत. इथिओपिआतील ही जैवविविधता वाचवण्याच्या दृष्टीने एक छोटासा आंतरराष्ट्रीय प्रकल्प हाती घेतला गेला आहे. या प्रकल्पाची जबाबदारी इथल्याच बाहिर दार विद्यापीठात प्राध्यापक असणारे अलेमायेहू वास्सी हे सांभाळत आहेत. वन परिसंस्थांचे अभ्यासक असणारे वास्सी हे, अमेरिकेतल्या निसर्ग अभ्यासक असणाऱ्या मागरिट लोमॅन यांच्या मदतीने या चर्चच्याभोवती असलेल्या वनांतील जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टीने बरेच परिश्रम घेत आहेत.
अलेमायेहू वास्सी यांचा जन्म इथिओपियातील दक्षिण गोंदार प्रदेशात झाला. पदवीपर्यंतचे शिक्षण इथिओपियात पूर्ण करून पदव्युत्तर शिक्षण त्यांनी युरोपात पूर्ण केले. २००७ साली त्यांना नेदरलँडमधील वागेनिंगेन विद्यापीठातून पीएच.डी. पदवी मिळाली. या पदवीसाठी त्यांनी इथिओपियातील चर्चभोवतालच्या देवरायांवर संशोधन केले. या संशोधनात त्यांनी एकूण २८ देवरायांचे तपशीलवार सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात त्यांना एकूण १६८ वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळल्या. त्यांतल्या १६० वनस्पती मूळच्या, स्थानिक स्वरूपाच्या होत्या; तर उरलेल्या ८ वनस्पती या बाहेरच्या होत्या. या १६८ वनस्पतींमध्ये १०० प्रकार वृक्षांचे, ५१ प्रकार झुडूपवजा वनस्पतींचे आणि १७ प्रकार वेलींच्या स्वरूपातील वनस्पतींचे होते. पदवीनंतरच्या काळात त्यांनी आणखी काही देवरायांची सर्वेक्षणे केली. वास्सी यांनी आतापर्यंत एकूण चाळिसांहून अधिक देवरायांचे सर्वेक्षण केले आहे.
मागरिट लोमॅन यांनी तेरा संशोधकांच्या एका गटाला घेऊन, २०१० साली बाहिर दारजवळच्या दोन देवरायांच्या परिसरातील पक्ष्यांची आणि कीटकांचीही पाहणी केली. यात त्यांना अनेक प्रकारच्या पक्ष्यांबरोबर विविध प्रकारचे बीटल, माशा, वास्पही आढळले. अलेमायेहू वास्सी यांनी हा विषय आता जगाच्या नकाश्यावर आणल्यानंतर, वास्सी आणि लोमॅन यांच्याशिवाय यांच्याशिवाय इतर काही संशोधकांनीही इथिओपियातील विविध देवरायांची जैवविविधतेच्या दृष्टीने पाहणी केली आहे. या सर्व सर्वेक्षणांतून इथल्या जैवविविधतेचे चित्र स्पष्ट झाले आहे. या देवराया आज जरी जैवविविधतेने बऱ्यापैकी नटल्या असल्या, तरी ही जैवविविधता भविष्यातही अशीच राखणे महत्त्वाचे ठरणार आहे. कारण या देवरायांना स्थानिक प्रश्नांमुळे धोका उत्पन्न होतो आहे, तसेच या तुकड्यांच्या स्वरूपातील खंडित वनांत प्रजातींचे पुनर्निर्माणही तितक्या सहजपणे होऊ शकत नाही.
अलेमायेहू वास्सी यांनी सुरुवातीला जेव्हा या देवरायांचे महत्त्व स्थानिकांना पटवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वास्सी यांना स्वतःलाच या प्रकल्पातील स्थानिकांच्या सहभागाबद्दल फारशी आशा वाटत नव्हती. याचे कारण स्पष्ट करताना वास्सी म्हणतात, “सन २०००च्या सुमारास मी जेव्हा या देवरायांच्या सर्वेक्षणाचं काम सुरू केलं, तेव्हा इथल्या समाजाला याचा फायदा काय, हाच प्रश्न इथल्या धर्मगुरूंकडून विचारला जात होता. ” त्यानंतर मेक्सिकोमध्ये झालेल्या एका परिषदेत अलेमायेहू वास्सी यांची अमेरिकेतील कॅलिफोर्निया अकॅडेमी ऑफ सायन्सेस या संस्थेतील, पाच खंडांतील वनांचा अभ्यास केलेल्या मार्गारेट लोमॅन या संशोधिकेशी ओळख झाली. या परिषदेनंतर वास्सी आणि लोमॅन या दोघांनी मिळून इथिओपियातील चर्चभोवतीच्या देवरायांच्या संवर्धनासाठी पैसे जमा करण्यास आणि या चर्चमधील धर्मगुरूंना विश्वासात घेण्यास सुरुवात केली. नॅशनल जिऑग्रफिक सोसायटीकडून मिळालेल्या अल्पशा मदतीतून त्यांनी इथल्या धर्मगुरूंना या वनांचे महत्त्व विशद करणाऱ्या कार्यशाळा घेणे सुरू केले. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. आज या चर्चमधील धर्मगुरूंची व त्याचबरोबर तिथल्या स्थानिकांचीही या प्रकल्पास … चांगली मदत होते आहे.
या देवराया पवित्र मानल्या गेल्या असल्यामुळे खरे तर त्या सुरक्षित राहायला हव्यात. परंतु तरीही काही वेळा स्थानिकांची पाळीव गुरे या देवरायांत शिरून तिथल्या वनस्पतींची नासधूस करतात. स्थानिकसुद्धा या देवरायांच्या अगदी सीमेवर असणाऱ्या वृक्षांची लाकडे तोडतात किंवा या सीमेपर्यंत नांगरणीकरून देवरायांचे नुकसान करतात. त्यामुळे वास्सी आणि लोमॅन हे प्रत्येक चर्चला आपल्या देवराईभोवती दगडी भिंत उभी करण्यासंबंधी सुचवीत आहेत. ही दगडी भिंत बांधण्यासाठी आजूबाजूला नव्याने शेताखाली आणल्या जाणाऱ्या जमिनीतील खडकांचाच वापर केला जात आहे. त्यामुळे त्याचा शेतकऱ्यांनाही फायदा होत आहे आणि चर्चलाही! अशी दगडी भिंत बांधून घेणाऱ्या चर्चला, वास्सी आणि लोमॅन देणगी मिळवून देण्याचाही प्रयत्न करत आहेत. वास्सी यांनी घेतलेल्या कार्यशाळांमुळे आता काही धर्मगुरू, देवरायांचे महत्त्व जाणून आपल्या चर्चच्या देवरायांचे क्षेत्र वाढवण्याचाही प्रयत्न करीत आहेत. इतकेच नव्हे, तर काही धर्मगुरू देवरायांचे जतन करण्याच्या या मोहिमेचे प्रसारकही झाले आहेत. पस्तीस हजार देवरायांतील सुमारे पाच लाख धर्मगुरू ही यासाठी एक मोठी फौज ठरू शकते.
ज्या देवराया जोमाने वाढल्या आहेत, त्या देवरायांच्या परिसरातील पाण्याची उपलब्धता वाढली आहे, नव्याने लावलेली झाडांची रोपे जगण्याची शक्यता वाढली आहे, तसेच देवरायांतील आणि शेतातील परागीभवन अधिक जोमाने होत असल्याचे दिसून आले आहे. वास्सी यांना आता इथियोपिआभर पसरलेल्या विविध देवरायांपैकी काही देवरायांना एकत्र जोडून एक अखंड हिरवे जाळे उभारायचे आहे. अर्थात हे काम कठीण आहे. कारण, हे काम प्रचंड तर आहेच, परंतु चर्चच्या मधल्या भागांत अनेक ठिकाणी शेतीखाली असलेली क्षेत्रेही आहेत.
अलेमायेहू वास्सी आणि मागरिट लोमॅन यांच्या प्रयत्नांना काही प्रमाणात यश येत असल्याचे दिसत असले, तरी या प्रयत्नांच्या मर्यादांची या दोघांना पूर्ण जाणीव आहे. या कामाची गती धिमी आहे. परंतु, आता वास्सी यांच्या मदतीला चर्चचे धर्मगुरू आणि स्थानिक लोकही आले असल्यामुळे चर्चभोवतीचे वन कमी होण्याला अटकाव होईल, असे वास्सी यांना वाटते. देवरायांच्या बाबतीत चर्चचे मत आहे, “नैसर्गिक वन हे या पृथ्वीवरील स्वर्गाचे प्रतीक आहे… आणि पृथ्वीवरील प्रत्येक जिवाला योग्य असं वसतिस्थान मिळणं आवश्यक आहे…” आणि म्हणूनच वनस्पती, पक्षी व कीटक यांची वसतिस्थाने असणाऱ्या या देवराया वाचवणे व वाढवणे हे गरजेचे आहे!
-किशोर कुलकर्णी
विज्ञान प्रसारक
Email – krk_1949@yahoo.com
मराठी विज्ञान परिषदेच्या ‘पत्रिका’ या मासिकातील हा पूर्वप्रकाशित लेख
Leave a Reply