गोपबालक :
लई वांड पोर ह्यो
दही-लोनी-चोर ह्यो
आईबापाच्या जिवा
लावतो घोर ह्यो ;
हा खेळगडी
गोपाळसौंगडी ,
लई आवडतो समद्यांना.
माहाऽ किसनाऽ, माहाऽ कान्हाऽ ।। १
पोट्ट्याची हौसच मोपऽ
डोईवरी पिसांचा टोपऽ ,
सावळा जरी
तोंडीं तरतरी
धोतर भरजरी,
ऐटीत चालतो गडीऽ
खांद्यावरती घोंगडीऽ ,
लटके काठीला जाडऽ ,
दशमीचं जड गाठुडं
लोट्यात दूध थ्वाडं
बगा बगा आईचं लाडऽ ;
करुन न्याहरी
येइ रोज हरी
आमच्या संगं राना.
माहाऽ किसनाऽ, माहाऽ कान्हाऽ ।। २
लईऽ खेळाची हौसऽ
घालतो लई धुडगूसऽ
सोडतो चराया ढोरंऽ
भरभरा जमवतो पोरंऽ
सूरपारंब्या, आट्यापाट्या
लगोर्या, शर्यती, नि गोट्या ,
कधि लपाछपी कधि विटीदांडू
कधि शिवाशिवी कधि तण-चेंडू ,
संध्याकाळपत्तूर बाळ हा
खेळ खेळतो नाना .
माहाऽ किसनाऽ, माहाऽ कान्हाऽ ।। ३
कधि झाडावर येंगतो
कधि फांद्यांना लोंबतो
कधि पाखरांना पांगतो ,
कधि झटुन खेळतो झोंबी
कधि फकस्त बोंबाबोंबी
भन्नाट कधी धावतो
कधि कच्ची फळं चावतो ,
आमची दशमी-चटनी खातो
आमच्यासंगं गानी गातो
आमच्या मागं येतो-जातो,
करतो खोड्या मोठ्या
खातो थपडा खोट्या ,
पोरगं जरि लई द्वाडऽ
वाजवी बासरी ग्वाडऽ
ह्यो खट्याळ बहुगुनी बाळ-कन्हैया
याड लावतो मना .
माहाऽ किसनाऽ, माहाऽ कान्हाऽ ।। ४
– – –
माहा : माझा मोप : खूप
तण-चेंडू : गवताचा चेंडू येंगतो : चढतो
झोंबी : कुस्ती याड : वेड
–
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(022)-26105365. M – 9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
Leave a Reply