भारतात सोने गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत . गुंतवणूकदार सध्या ‘ सोने ‘ गुंतवणूक करण्यास जास्त पसंती देत आहेत . कोविड- १ ९ च्या साथीने जागतिक बाजार कोलमडला असताना जागतिक उत्पन्नातही निरंतर घट होत आहे . त्यामुळे बहुतांश मालमत्तांकडून परतावे कमी मिळत आहेत . बाजारातील स्थिती पाहून धोक्याची सूचना मिळालेले गुंतवणूकदार सोन्याकडे वळत आहेत . संकट काळात इतर मालमत्ता अस्थिर असतात तेव्हा सोन्याने नेहमीच स्थिर मूल्य धारण केलेले दिसून येते .
पारंपरिक गुंतवणूदार मालमत्ता म्हणून ज्या गोष्टी विचारात घेतो , ते सर्व गुण सोन्यात असतात . सोन्याच्या बाजाराने सोन्याच्या किंमतीत घसरण अनुभवली. त्यांनतर मात्र आता मजबूत पुनरागमन केले आहे . अगदी काही अंशी शेअर्स आणि बाँडपेक्षा चांगली कामगिरी दर्शवली . तसेच सोन्यावर आधारित मालमत्तांद्वारे एखादी व्यक्ती त्याचे रोख रकमेत रूपांतर करू शकते . स्टॉक्स आणि बाँड यासारख्या इतर मालमत्तांपेक्षा वेगळी कामगिरी दर्शवणारे , अशी सोन्याची ख्याती आहे . त्यांचे मूल्य घसरले की सोन्याचे मूल्य वधारते . इतर मालमत्तांशी कमी परस्परसंबंध असल्याने , बाजारातील स्थिती प्रतिकूल असताना नुकसान भरून काढणारा उत्कृष्ट पोर्टफोलिओ डायव्हर्सीफायर म्हणून सोने काम करतो . महागाईवर मात करणाऱ्या वैशिष्ट्यांमुळेही सोने मौल्यवान आहे . आर्थिक मंदीच्या काळात , सरकार अमर्याद पैसे छपाई करण्याची शक्ती वापरते.
अर्थव्यवस्थेत जास्त पैसे असले , तर महागाई येते . लोकांच्या खिशातील पैशांचे व मालमत्तांचे मूल्य कमी होते , त्या काळात सोन्याची किंमत वाढते . तुम्ही सोन्यात गुंतवणूक ( Gold Investment ) करण्याचा विचार केला असेल तर पुढील पाच मार्गांनी ती करता येईल .
सोने गुंतवणुकीचे पाच पर्याय
१. भौतिक सोन्यात गुंतवणूक ( Physical gold ) :
सोन्याची नाणी , बार आणि दागिन्यांच्या रूपात भौतिक स्वरूपात सोने खरेदी करता येते . भारतीयांना सोन्याचे दागिने आवडतात , मात्र खरेदीपूर्वी सुरक्षा , विमा खर्च आणि जुने डिझाइन या गोष्टींवर लक्ष दिले पाहिजे . भारतात घडणावळीचे शुल्क ६ ते २५ % पर्यंत आहे , तर दुसरीकडे ज्वेलर्स , ई – कॉमर्स वेबसाइट्स , गैर – बँकिंग वित्तीय कंपन्या व सरकारकडून सोन्याची नाणी खरेदी केली जाऊ शकतात . भारत सरकारने स्वदेशी मिंटेड कॉइन लाँच केले असून , यात एका बाजूला अशोक चक्र आणि दुसरीकडे महात्मा गांधींची प्रतिमा आहे .
२. ईटीएफमध्ये गुंतवणूक ( Exchange Traded Funds ) :
पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे गोल्ड ईटीएफ खरेदी करणे . ईटीएफमध्ये गुंतवणूक करताना सुरुवातीची महागडी खरेदी , विमा आणि एवढेच नाही , तर विक्रीचा खर्चही लागत नाही . त्यामुळे ते अधिक कॉस्ट – इफेक्टिव्ह ठरते . ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी लोकांना ऑनलाइन स्टॉक ब्रोकर आणि डीमॅट खात्यातून ट्रेडिंग अकाउंटची आवश्यकता असते . एकदा खाते उघडल्यानंतर फक्त गोल्ड ईटीएफ निवडणे आणि ब्रोकरच्या ट्रेडिंग पोर्टलवरून ऑर्डरच द्यावी लागते .
३. जीएपी ( Gold Acumulation Plan – GAP ) :
स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोल्डरश प्लॅननुसार , मोबाइल वॉलेट्ससारख्या गूगल पे , पेटीएम , फोन पेद्वारेही सोने ऑनलाइन खरेदी केले जाऊ शकते . ‘ डिजिटल गोल्ड ‘ खरेदी करण्यासाठीचे हे पर्याय एमएमटीसी – पीएएमपी किंवा सेफगोल्ड किंवा या दोहोंच्या सहयोगातून दिले जातात . डिजिटल गोल्डला भौतिक सोन्याच्या रूपात पाहता येऊ शकते किंवा विक्रेत्याला पुन्हा विकता येऊ शकते .
४. सुवर्ण सार्वभौम रोखे ( Sovereign Gold Bond scheme SGB ) :
कागदी सोन्यात गुंतवणुकीचा हा दुसरा मार्ग आहे . सरकार एसजीबी जारी करते , जे दर काही महिन्यांमध्ये खुल्या होणाऱ्या इंटरव्हल्समध्ये खरेदीसाठी उपलब्ध होतात . हे रीडंप्शनवर टॅक्स – फ्री आहेत . मॅच्युरिटी पीरिएड असल्यामुळे , हे दीर्घकालीन गुंतवणूक योजनांसाठी आदर्श पर्याय आहेत . भारत सरकारने ५ नोव्हेंबर २०१५ रोजी गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम सुरू केली असून जनतेला बँकेतील लॉकर्समध्ये असलेल्या सोन्यावर व्याजरूपाने कमाईचा मार्ग मिळू शकेल .
५. गोल्ड फ्यूचर्स : गोल्ड फ्यूचर्समध्ये गुंतवणूक म्हणजे वास्तविकत : सोन्याच्या किंमतीवरील अंदाज लावला जातो आणि मूल्य अस्थिरतेचा लाभ कमावता येतो . सोने अपेक्षित दिशेने पुढे गेले तर फ्यूचर्स मार्केटमध्ये कुणीही लवकर पैसा कमावू शकतो . मात्र , असे झाले नाही तर खूप कमी वेळेत पैसा ळेत पैसा गमावू शकतो . सोने एखाद्याच्या गुंतवणुकीची सुरक्षा , लिक्विडिटी आणि लाभाची हमी देते . कोव्हिड – १ ९ दरम्यान जागतिक मंदीमुळे अनिश्चितता वाढत आहे . इतर मालमत्ता वर्गावरही गुंतवणूकदारांचा विश्वास कमी आहे . अशा काळात लोक मदत का करत नाहीत , असे म्हणण्यापेक्षा लोक सोन्याकडे धाव घेत आहेत , या दृष्टीने पाहणे अधिक हितकारक ठरेल ….
कोविड – १ ९
शेअर बाजार आणि सोन्याची दरवाढ
कोविड – १ ९ नंतर जगभरातील अर्थव्यवस्था मंदावली त्यामुळे बहुतेक सर्व देशांनी अर्थव्यवस्थेस उभारी देण्यासाठी ज्या योजना योजल्या त्यातील बरीचशी रक्कम ही थेट मदत या स्वरूपात होती . त्यामुळेच मोठ्या प्रमाणावर पैसा हा बाजारात आला . याचा परिणाम म्हणून कोसळलेला शेअर बाजार सावरून तो लवकरच नवा उच्चांक गाठेल . आजवरील अनुभव असा की जेव्हा शेअर बाजार वाढतो तेव्हा सोन्याचा भाव स्थिर राहतो . यावेळी प्रथमच शेअर बाजार आणि सोने उच्चांकी भाव दर्शवित आहेत . अलीकडे हा भाव किंचित खाली आला व भाववाढीच्या तुलनेत तो अत्यल्प आहे . अर्थव्यवस्था अस्थिर असली की लोकांचा चलनावरील विश्वास कमी होतो व ते गुंतवणुकीचे पर्यायी मार्ग शोधतात . त्यामुळे जगभर असुरक्षिततेच्या भावनेतून सोन्याची सातत्याने खरेदी होत आहे . गेल्या ६/७ महिन्यात ज्या गतीने भावात वाढ झाली ती पाहता या दिवाळीत १० ग्रॅम सोन्याचा भाव ८०,००० पर्यत जाऊ शकेल असा या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे . आंतरराष्ट्रीय बाजारातही १ औस सोन्याचा भाव १,५१ ९ वरून २,००० वर गेला आहे जो लवकरच २,५०० वर जाईल असा अंदाज व्यक्त केला जातो . बहुतेक सर्व देशाच्या मध्यवर्ती बँका पर्यायी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करीत असतात . याप्रमाणे आपली रिझर्व्ह बँक ही सोन्याची नियमित खरेदी करीत असते . जुलै १ ९९ १ मध्ये आपल्याकडे आर्थिक पेचप्रसंग निर्माण झाला त्यावेळी आयातीसाठी आणि परकीय कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडे काहीच शिल्लक नव्हते . जागतिक बँकेने कर्ज देण्यास नकार दिला . अशा वेळी आपल्याकडील सोने गहाण ठेवून पैशांची उभारणी करण्यात आली . फेडरल रिझर्व्ह बँक ही अमेरिकेची मध्यवर्ती बँक सोने खरेदी न करता सरकारच्या मालकीच्या सोन्याचे विश्वस्त म्हणून काम पहाते . बाकी बहुतेक सर्व देशांच्या मध्यवर्ती बँका नियमित स्वरूपात सोने खरेदी करीत असल्याने . सोन्याच्या दुर्मिळता , रोकड सुलभता आणि सर्वमान्यता या गुणांमध्ये आता मोठ्या परताव्याची शक्यता हा गुणधर्म जोडला गेल्याने त्याच्या भावात उत्तरोत्तर वाढ होत राहील .
अमेरिकेत नवीन सरकार स्थापन होऊन त्यांचे जे औद्योगिक धोरण ठरेल तोपर्यंत या भावाला लगाम बसणे अशक्य वाटते . तेव्हा आज जास्त वाटणारा भाव अजून सहा महिने वर्षभरात खूप कमी होता असे होण्याची शक्यता जास्त आहे . आपल्या गुंतवणुकीतील ते १० % वाटा सोन्यामध्ये असावा असे गुंतवणूक तज्ज्ञांचे मत आहे . त्या दृष्टीने ज्यांना शक्य असेल त्यांनी यात आपली गुंतवणूक करायला आणि असलेल्यांनी ती वाढवायला हरकत नाही .
— उदय पिंगळे
सौजन्य – अर्थसंकेत
Leave a Reply