महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त सहा वर्षांपूर्वी, १ मे २०१० रोजी लिहिलेलें हें काव्य आजही कालानुरूपच (रेलिव्हंट) वाटतें.
१.
सुवर्णमहोत्सव हा
सुवर्णाक्षरांनी लिहा
क्रमांक पहिला’ फलक वाहा
असूं देत क्रम नऊ-दहा.
‘महाराष्ट्र हें राज्य महा’
फलद्रूप होईल मंत्र हा
अनंत वाट पहा ।।
२.
नंभर-नंबरी सोनें नच हें , फक्त मुलामा वरचा
घोडा-पहिला, कधीच झाला शर्यतीत शेवटचा
मस्तक उन्नत, समारंभ शत, वाद्यघोष उन्मत्त
इमल्याचा या खचतो पाया, कुणां खबर ना खंत ।।
३.
संदर्भ : उष:काल होतां-होतां काळरात्र झाली
अरे पुन्हां आयुष्याच्या पेटवा मशाली ।
(कवी – सुरेश भट)
उष:काल होणें नच , ना संपणार रात्र
चुडे पेटवाया , आशा नुरे नाममात्र
महाराष्ट्रीं दिवा ना समई, काजवा न तारे
वाट उजेडाची बघतां जीव चालला रे !
४.
कालचा अभिमान उज्ज्वल, आज पण अंधारलें
फोल, तरिही ढोल हा – ‘भवितव्य फारच चांगलें’!
उंचवाया मान अमुची झुंजला राजा शिवा
लढत राजे आज-उद्याचे कापण्यां अमुचे गळे ।।
५
वाचत भ्रामक प्रगतीपाढा , प्या कटु दुर्गतिकाढा
कळे न तरि – पळतोहे परि गर्तेत चालला गाडा ।।
६ –
राष्ट्राचें-महाराष्ट्राचें नच आतां काहिं खरें
आम्ही बापडे, बांधु झापडें ; आम्हां तेंच बरें ।।
७
सगळी पानें गळती , तरिही पुनश्च रानें फुलती
जरि हत झाली आशा, तरि जागेल पुन्हां खचितच ती
आज जरी महाराष्ट्र-प्रगतिची खात्री नाहीं आम्हां
तरि ठाउक, अवसेमागुन येतिल पुनवेच्या राती ।।
– सुभाष स. नाईक
Leave a Reply