कळायला लागल्यापासून आठवतो तो म्हणजे आमच्या आईच्या माहेरी असलेला समुद्र. मुंबईच्या विरुद्ध किनाऱ्यावर वसलेले मांडवा गाव जे हल्ली मांडवा बंदर म्हणूनच ओळखले जाते. मांडव्याच्या समुद्र किनाऱ्यावर घालवलेले बालपण आणि शाळेतल्या मोठ्या सुट्ट्या याच्यामुळे समुद्र, भरती, ओहोटी, लाटा, वाळू यांच्याशी कदाचित जन्म झाल्यापासूनच ओळख झाली होती. मालेगावला पाचवीत असताना बाबांची नाशिक जिल्ह्यातून थेट रायगड जिल्ह्यात बदली झाली आणि श्रीवर्धन येथे पोस्टिंग मिळाली. श्रीवर्धन येथील समुद्र किनाऱ्या जवळ असलेल्या माध्यमिक शाळेत एक वर्ष गेल्यामुळे समुद्रा जवळील शाळा सुद्धा अनुभवायला मिळाली. श्रीवर्धनच्या शाळे जवळ असलेल्या समुद्र किनारा आणि शाळेमध्ये केवड्याचे घनदाट बन होते. शाळेच्या मधल्या सुट्टीत केवड्याच्या बनात जाऊन डबा खाल्ल्याचे प्रसंग अजूनही आठवतात. केवड्याच्या बनात सकाळी सकाळी केवड्याचा दरवळणारा अप्रतिम सुगंध आजही केवड्याच्या कुठल्याच अगरबत्तीपासून किंवा अत्तरा पासून अनुभवता आला नाही. श्रीवर्धन मधील नारळी पोफळीच्या गच्च आणि हिरव्या
गर्द वाड्या आणि त्यांच्याधून जाणारे अरुंद रस्ते. भर दुपारी सुद्धा सायकल घेऊन फिरताना ऊन अस कधी जाणवल नाही अशी सगळ्या रस्त्यांवर सावली. संपूर्ण एक वर्षभर शाळेत यायला जायला, समुद्रावर आणि श्रीवर्धन च्या वाड्यांमध्ये भटकायला सायकल सोबत असायची. बाबांच्या प्रमोशन मुळे बदली झाल्याने वर्षभरात श्रीवर्धन सोडावे लागले पण श्रीवर्धनचा समुद्र किनारा आणि बाबांना मित्र म्हणून लाभलेले आणि भावापेक्षा जास्त माया लावणारे आमचे काशिनाथ काका आजही मनात घर करून आहेत. समुद्रात लाँचने प्रवास करायला मिळायचा पण काशिनाथ काकांच्या स्वतःच्या तीन मासेमारी करणाऱ्या बोटी होत्या. जीवना कोळीवाड्यात त्यांच्या घरी गेल्यावर ते घरी नसले की त्यांना शोधत शोधत जीवना बंदराच्या जेट्टीवर सायकल घेऊन जायचो. त्यांची बोट आलेली असली की ते स्वतः बोटीवर राऊंड मारायला सोबत घेऊन जायचे. जेट्टीवरून बोट बाहेर काढून दिली की त्या बोटीच्या इंजिनला असणारी अक्सीलेटर ची दोरी आणि सुकाणू ते माझ्या हातात देत असत. वयाच्या बाराव्या वर्षी एका मासेमारी होडीचा संपूर्ण कंट्रोल हातात आल्यावर खूप गम्मत यायची. मासेमारी करणाऱ्या होडी चा कंट्रोल तो काय एक लांब लाकडाचा सुकाणु आणि इंजिनचा स्पीड कमी जास्त करण्यासाठी अक्सीलेटर ला बांधलेली दोरी. दोरी खेचली की इंजिन चा आवाज वाढायचा आणि बोट वेग घ्यायला सुरवात करायची. पण दोरीला कमी जास्त ताण देऊन इंजिन स्पीड कमी कमी होत जाऊन एकदम धाड धाड धाड करत वाढवायला मजा यायची. असे करत असताना काशिनाथ काका पण हसायचे. काशिनाथ काकांची मायाच वेगळी होती. काशिनाथ काका श्रीवर्धन सोडल्यानंतर आम्ही जिथे असू तिथे वर्षातून दोन तीन वेळा तरी येत किंवा आमची तरी त्यांच्याकडे फेरी होत असे. आल्यावर नेहमी जो भेटेल त्याला कौतुकाने मी त्यांना लहान असताना संक्रांतीला घरापासून अडीच किलोमीटर लांब असलेल्या त्यांच्या जीवना बंदरावर सायकलवर नेऊन दिलेल्या तीळगुळाबद्दल सांगत असत. काकांचं सांगणं पण कसं की, बंदरावर आम्ही उभे असताना बघितल तर समुद्रावरून एक लहान पोरगा दुडू दुडू सायकल चालवत येताना दिसला जवळ आल्यावर बघितलं तर अरे हा तर आपला प्रथमच.
वयाच्या बाराव्या वर्षापासून त्यांचे हे कौतुक तिशी ओलांडली तरी ऐकायला मिळायचे. कोळी असून सुद्धा मच्छी किंवा मांसाहार न खाणारे त्यांचे संपूर्ण कुटुंब माळकरी पण कोणी पाहुणे जेवायला असले की शेजारी बसून आग्रह करून जेवायला लावणार. त्यांच्या बोटीत एखादी मच्छी नसली तर दुसऱ्याकडून घेऊन किंवा प्रसंगी विकत आणून ते सगळ्या प्रकारची मच्छी खाऊ घालत. श्रीवर्धन सुटलं पण काशिनाथ काकांशी असलेलं नातं काही तुटलं नाही. दहावी झाल्यानंतर, बारावी आणि कॉलेज झाल्यानंतर श्रीवर्धन ला जाऊन काशिनाथ काकांकडे मित्रांसोबत चार चार दिवस आठ आठ दिवस जाऊन राहायचो. एकदा तर चार दिवस राहायला म्हणून गेलो आणि आठ दिवसांनी जीवावर येऊन परत आलो. काशिनाथ काकांच्या घरीच मुक्काम असायचा आमच्या सगळ्यांचा. जीवना कोळीवाडा एकदम समुद्राला खेटून आहे. काशिनाथ काकांचे घरापासून समुद्र काही फुटांवर आहे. समुद्राची पातळी नेहमीपेक्षा एक मीटर ने जरी वाढली तरी त्यांच्या घरात पाणी येईल इतक्या जवळ आहे. काशिनाथ काका गेल्याचे जहाजावर असताना समजल्यावर त्यांच्या आठवणीने डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या. आजही जहाजाच्या बाजूने मासेमारी बोट इंजिनची धाड धाड करत जाताना दिसली की काकांची आठवण येउन गलबलायला होते. कोणतेही रक्ताचे नाते नसताना मित्राच्या मुलावर एवढी माया लावणारे काशिनाथ काका नेहमी हसतमुख असायचे कपाळावर नेहमी काळी अभिराची रेघ आणि मुखात सतत देवाचे नामस्मरण. कदाचित काकांच्या मायेपोटी नेहमी श्रीवर्धन ला जायची ओढ असायची. वात्सल्य आणि मायेचे भांडार असणारे आमचे काशिनाथ काका आज जरी नसले तरी त्यांचा मोठा मुलगा महेश दादा आज त्यांचा वारसा पुढे चालवतो आहे. श्रीवर्धन मध्ये असताना काशिनाथ काकांच्या मासेमारी बोटीवर इंजिन चालवण्याचा अनुभव केवळ मजा म्हणून घेत होतो. त्यांच्या लहानशा बोटीत फिरताना श्रीवर्धन च्या समुद्रात संध्याकाळी पाहिलेल्या सोनेरी लाटा आणि जहाजावर असताना दिसणाऱ्या सोनेरी लाटा यांच्यात कितीतरी फरक आहे.
एका वात्सल्य मूर्तीच्या मायेत आणि आशीर्वादात पाहिलेल्या सोनेरी लाटा आणि ताण तणावात वेळ जावा म्हणून पाहिलेल्या गोल्डन वेव्ह्ज. गोल्डन वेव्ह्ज अशासाठी की हे गोल्डन करियरच असे आहे की धड धरताही येत नाही की सोडताही येत नाही. सहा महिन्यातले तीन महिने जवळच्या सगळ्यांपासून लांब राहून काम करण्याचे दुःख करावं की सहामाहीत मिळणाऱ्या तीन महिन्यांच्या सलग सुट्टीचे सुखं मानावं.
© प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
B.E. (mech),DIM.
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply