२००१ साली मला ‘मराठी बाणा’ चे निर्माता अशोक हांडे याचा फोन आला, ‘नावडकर, मी तुम्हाला महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवातील पारितोषिक विजेते तंत्रज्ञ व बालकलाकार यांची यादी देतो. त्यांचे मला फोटो काढून द्या.’ मला मिळालेल्या यादी प्रमाणे मी प्रत्येकाची वेळ घेऊन फोटो काढू लागलो. त्या वर्षी ‘लेकरु’ चित्रपटातील निमीष काठाळे याला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून पारितोषिक जाहीर झाले होते. मी फोन करुन निमीषच्या घरी गेलो. त्याचे फोटो काढले. तेव्हा त्याचे वडील दिपक काठाळे यांची पहिल्यांदा भेट झाली.
नजरेत भरणारी उंची, शिडशिडीत अंगयष्टी, गोरा रंग, डोक्यावर डाय न केलेल्या चंदेरी केसांसारखीच दाढी व मिशा, डोळ्यांवर चष्मा, पांढरा फुलशर्ट व पांढरीच पॅन्ट.अगदी चित्रपटात शोभावं असं व्यक्तिमत्त्व! कमर्शियल आर्टिस्ट असलेले दिपक यांच्या टिळक रोडवरील ‘स्पाॅट अॅडव्हर्टायझिंग’ बद्दल मी ऐकून होतो. या निमित्ताने भेट झाली आणि पुढे भेटतच राहिलो.
दिपक यांचा जन्म शिरवळचा. सव्वीस जणांच्या मोठ्या एकत्र कुटुंबातील दिपकचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घरच्या किराणा दुकानात पुड्या बांधत, गाई-म्हशी यांची देखभाल करत, पिठाची गिरणी, भात सडणी यंत्रावरील कामं करत पार पडलं. शाळेतील चित्रकलेच्या मास्तरांनी दिपकची कला पाहून त्याला ग्रेडच्या दोन्ही परीक्षा देण्यास सांगितले.
जुनी मॅट्रीक पास झाल्यावर दिपक, आई-वडील व इतरांसोबत पुणे शहरातील कसबा पेठेत आला. त्यावेळी अभिनव कला महाविद्यालयाची इमारत बैठीच होती. प्राचार्य डेंगळे सरांनी चाळीस विद्यार्थ्यांनंतर, उरलेल्या चाळीस मधील दिपकला प्रवेश नाकारला. त्यावेळी शंतनुराव किर्लोस्करांच्या आर्थिक सहकार्याने डेंगळेंनी वरचा मजला वाढवला व दिपक बरोबरच इतरांनाही कमर्शियलला प्रवेश मिळाला.
पाच वर्षे कमर्शियल शाखेचा अभ्यास करताना दिपकने बाहेरची कमर्शियल कामं करुन अर्थाजन करत स्वतःच्या अनुभवामध्ये भर घातली.
अभिनव मधील या पाच वर्षांत दिपकला गिरीश घाटपांडे हा जिवलग मित्र लाभला. दोघांचं ट्युनिंग इतकं चांगलं जुळलं की, गेली एकावन्न वर्षे त्यांची शरीरं दोन असली तरी मनं एकच आहेत.
या ‘राम और श्याम’ जोडीने काॅलेजमध्ये शिकत असतानाच, मिळतील ती कमर्शियल कामे केली. फोटो फिनिशिंगच्या कामांचा अनुभव घेतला. काॅलेजमधून बाहेर पडल्यावर कुमठेकर रोडला एका छोट्या जागेत व्यवसायाचा श्रीगणेशा केला.
तुळशीबागेजवळील एकाकडे दोघेही काम मिळवण्यासाठी गेल्यावर त्या गृहस्थाने त्यांना व्हिजिटींग कार्ड मागितले. कार्ड तर केलेलेच नव्हते. दुसऱ्या दिवशी भेटण्याचे आश्वासन देऊन दोघेही बाहेर पडले. आॅफिसवर आल्यावर कार्डाचा मजकूर लिहिण्यासाठी फाऊंटन पेन उघडलं, तर घेतलेल्या कागदावर त्यातून शाईचा एक ठिपका पडला. तो ठिपका पाहून दोघांनाही नाव सुचलं ‘स्पाॅट’ अॅडव्हर्टायझिंग! लागलीच दोघांनी मिळून व्हिजिटींग कार्डचं डिझाईन केलं. सकाळी ब्लाॅक करुन अर्जंट छपाई करुन घेतली व संध्याकाळी त्या गृहस्थाकडे जाऊन त्याच्या हातावर ते नवं कोरं करकरीत कार्ड ठेवलं.. ते काम तर दोघांना मिळालेच, शिवाय पुढच्या चाळीस वर्षांच्या उत्तुंग भरभराटीची ती एक ‘सुवर्ण नांदी’ ठरली!
टिळक रोडवरील खरं आॅफिस सुरू झालं ८४ साली. मात्र बिल्डरच्या स्नेहसंबंधामुळे इमारतीचे काम चालू असतानाच त्याने पहिल्यांदा दोन रुम तयार करुन या दोघांना वापरायला दिल्या. पक्के जिने होईपर्यंत लाकडी जिन्यावरुन ये जा करावी लागत होती.
त्यावेळी निगेटिव्ह ब्रोमाईडसाठी ग्राफिनामध्ये जावं लागे. दिपकने आॅफिसमध्येच डार्करुम केली. डायऱ्यांवरती कंपनीची नावं टाकण्याचे मोठे काम मिळाले, म्हणून स्क्रिन प्रिंटींगचे युनिट सुरू केले. ज्या काळात मार्केटमधील स्क्रिन प्रिंटर्स पन्नास रॅकवरती काम करीत होते, तेव्हा ‘स्पाॅट’कडे मात्र दोनशे रॅकही कमी पडायचे. प्लॅस्टीक फाईल्स व फोल्डरची कामं जेव्हा मोठ्या प्रमाणात मिळू लागली तेव्हा त्यासाठी मशिनरी घेऊन ट्वेंटीनाईन्थ सिस्टीम नावाने युनिट सुरु केले.
याच कालावधीत अभिनव मधील मुलं व मुली पार्टटाईम नोकरी मागण्यांसाठी ‘स्पाॅट’कडे येत असत. त्यातील कित्येकांना या दोघांनी अनुभव घेण्याची संधी प्राप्त करुन दिली.
दिपक हे मार्केटींगमध्ये ‘किंग’ होते. त्यांना भोसरी, आकुर्डी, हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेटमधील मोठी कामं मिळाली. याशिवाय राजगुरूनगर, सातारा, कोल्हापूर, कोपरगाव, सावंतवाडी या ठिकाणची देखील कामं मिळाली.
कंपन्या टेंडर मागवून कामं देत असत. अशावेळी आपण टेंडरमध्ये लिहिलेली किंमत इतरांपेक्षा जास्त असूनही ती किंमत कशी योग्य आहे, हे पटवून देण्याचे कसब दिपककडे होते. याबाबतीत एक किस्सा असा घडला होता…
कंपनीला साध्या सुतळीचे एकाच ठराविक मापाचे तुकडे हवे होते. मागविलेल्या टेंडरमध्ये त्याचा दर दीड रुपये, दोन रुपये असा आलेला होता. दिपकने मात्र साडेचार रुपये दिला होता. साहेबांनी विचारले, ‘काठाळे साहेब, तुमच्या टेंडरमध्ये एवढा फरक कसा काय?’ दिपक यांनी पॅडवर लिहिण्यासाठी खिशातून पेन काढले व साहेबांना विचारले, ‘साहेब, तुमचा महिन्याचा पगार किती?’ साहेबांनी आकडा सांगितला. दिपकने त्यावरुन पगाराची एका दिवसाची रक्कम काढली. सुतळी आण्यासाठी मार्केटमध्ये जाणे, त्यासाठी येणारा खर्च, सुतळी घेऊन त्यांचे तुकडे करण्याची मजुरी, पुन्हा त्याचे पॅकींग व ट्रॅव्हलिंग असा सर्व खर्च विचारात घेता साहेबांना त्या सुतळीचा तुकडा साडेसात रुपयांना पडतोय हे आकडेवारीने काढून दाखवले. साहेबांचे तीन रुपये वाचतात, हे पटवून दिल्यावर ते काम तर मिळालेच शिवाय साहेबांनी रेटबाबतीत नंतर कधीही ढवळाढवळ केली नाही.
प्रत्येकाला जीवनात काही ना काही शौक असतोच. दिपकला टु व्हिलर गाड्यांची फार आवड. बाजारात नवीन गाडी आली की, आधीची गाडी काढून टाकायची व नवी घ्यायची हे ठरलेले! आजपर्यंत वेगवेगळ्या दहा टु व्हिलर व सात फोर व्हिलर गाड्या वापरून त्यांनी आपली हौस मनमुराद भागवली आहे.
१९९० साली दिपकने पहिल्यांदा एव्हरेस्ट कॅम्पसारखी एक्स्पीडीशन केल्यानंतर हा अनुभव आपल्या कुटुंबाला व इतरांना मिळावा म्हणून पुढील पंधरा वर्षे, दरवर्षी पन्नास सहभागींना घेऊन हिमालयातील मनाली, धर्मशाळा, डलहौसी, नैनीताल, दार्जिलिंग, पठाणकोट, सिक्कीम असे निरनिराळ्या ठिकाणचे ट्रेक केले.
‘स्पाॅट’ला कामांची कमतरता नव्हती. इतरांपेक्षा यांचा दर जास्त असूनही काम मिळतच राहिली. दोनाचे चार, चारांचे आठ, असे वाढत पंचवीस वर्षांनंतर चव्वेचाळीस जणांचा स्टाफ काम करीत होता. मिलीट्रीची देखील कामे मोठ्या प्रमाणात केली.
या कलाप्रवासात चोवीस तासातील अठरा तास व्यस्त राहताना दिपकची पत्नी, सौ. मृगाक्षीने मोलाची साथ दिली. लग्नानंतर दिपकच्या आई-वडीलांचं, मुलांचं पाहून शिक्षिकेची नोकरीही केली. मुलगा निमीष व कन्या छटा यांची शाळा, काॅलेज, आवडी निवडी, छंद सर्व काही तिनं विनातक्रार सांभाळलं.
निमीषनं सात मराठी चित्रपटांत अभिनयाची चुणूक दाखवली. ‘लेकरु’साठी राज्य पुरस्कार मिळाला. नंतरही चित्रपटांच्या अनेक आॅफर आलेल्या असताना, त्या न स्वीकारता करीयरवर लक्ष दिले. त्यामुळेच आज तो आपल्या पत्नीसह अमेरिकेत सेटल आहे मुलीने प्रिंटींग टेक्नाॅलाॅजीची डिग्री मिळविल्यावर, लग्नानंतर सासरी सुखाने नांदत आहे.
दहा वर्षांपूर्वी दिपकने हौस म्हणून चित्रपटात छोट्या भूमिका करायला सुरुवात केली. कॅमेऱ्याच्या समोर आत्मविश्वासाने वावरल्यामुळे दिपक पडद्यावर एखाद्या मुरब्बी कलाकाराप्रमाणे प्रेक्षकांना भासले. हा हा म्हणता दहा वर्षांत अनेक मराठी चित्रपट, अॅड फिल्म्स, शाॅर्ट फिल्म्स, सिरीयल्स, वेब सिरीज केल्या.
या कोरोनाच्या संकटकाळात कित्येकांचे आर्थिक नुकसान झाले. लाॅकडाऊनमुळे आवक ठप्प झाली. अशा परिस्थितीमध्ये आपण जेवतो आहोत, पण शेजारच्या घरात कोणी उपाशी तर रहात नाही ना? असा विचार करणारी माणसं फारच दुर्मिळ.. दिपक यांनी तो विचार केला. आपल्या कलाकार मित्रांना फोन करुन विचारले, ‘अडचण असेल तर खुल्या मनानं सांगा. मला शक्य होईल, ते मी नक्कीच करेन..’ सोनु सूद हा काही देवदूत नाही, ती एक वृत्ती आहे..आणि ती दिपकमध्ये दिसते. इतरांना आपल्याबरोबर घेऊन मोठं करायचं, याला आभाळाएवढं मन लागतं…
निमीष अमेरिकेत असल्यामुळे दोन वेळा अमेरिकेची सफर झाली. परदेशातील जी ठिकाणं पाहण्याची एखादा माणूस स्वप्नच बघू शकतो ती दिपकने प्रत्यक्ष अनुभवली.. सदुसष्ट वर्षांच्या या जीवन प्रवासात प्रसंगी पुण्यातील फुटपाथवर झोपलेला हा माणूस अमेरिकेत जाऊ शकतो हे कुणाला सांगितलं तर, खरं वाटेल का? जर माणसाच्या अंगी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम करण्याची तयारी, दृढ आत्मविश्वास आणि जिवलग मित्रांचा सहवास असेल तर सर्व काही शक्य आहे.
टिळक रोडवरील आॅफिस हे एक दिवस आपल्याला पेन्शन देऊन जाईल, हा दोघांचा होरा २०१४ साली खरा ठरला व नंतर व्यवसाय दोन जुन्या सुहृदांना देऊन, दोघेही बाहेर पडले.
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२४-९-२०.
Leave a Reply