लहानांपासून वृद्धांनाही आवडणारी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे गोळी. लहानपणी खाऊ म्हणून आमीष दाखवलं जातं ते याच गोळीचं. ‘तू जर शांत बसलास तर मी तुला एक गोळी देईन’ असं म्हटलं की, दंगा करणारा बबड्या हाताची घडी व तोंडावर बोट ठेऊन शांत बसतो.
लहान मुलांची कटींग करुन घेणे हे फार अवघड काम असते. अशावेळी त्याला रंगेबेरंगी गोळ्यांचं पाकीट हातात दिलं की, ते मुकाट्यानं कटींग करुन घेतं. कळायला लागल्यापासून हे गोळीचं आकर्षण वाढतच जातं. माझ्या लहानपणी पहिली ते चौथी पर्यंत, वर्गात कुणा मुलाचा वाढदिवस असेल तर तो वर्गात सर्वांना गोळ्या वाटत असे.
मी पाचवीपासून न्यू इंग्लिश स्कूलमध्ये होतो. तेव्हा माझेच नव्हे तर शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे आवडते शिक्षक ‘तात्या’ उर्फ ग. म. गोखले हे भेटणाऱ्या प्रत्येकाला श्रीखंडाची गोल चपटी केशरी रंगाची गोळी द्यायचे. त्या शाळेतून बाहेर पडलेल्या प्रत्येकाच्या जिभेवर अजूनही त्या श्रीखंडाच्या गोळीची चव रेंगाळते आहे.
बालपणी कोणत्याही दुकानात गेलं की, विविध प्रकारच्या गोळ्यांनी भरलेल्या बरण्या नजरेत भरायच्या. गोळ्या छोट्या असो की मोठ्या त्यांचा गोडवा हा नेहमीच हवाहवासा वाटतो. अगदी साधी गोळी म्हणजे नारंगी रंगाची आॅरेंजची गोळी. आपण एसटी प्रवासाला निघालो की, अशा गोळ्या विकणारे बसच्या खिडकीशी येऊन गोळ्यांची पुडी घेण्याचा आग्रह करतात. आम्हाला लहानपणी प्रवासात वडील पेपरमिंटच्या पांढऱ्या गोळ्या द्यायचे. ती गोळी तोंडांत ठेवून हवा आत घेतली की, थंड वाटायचं. कधीकधी पाॅपिन्सच्या गोळ्यांची ‘नळकांडी’ वडील द्यायचे. मग त्यावरील चांदीचा कागद गोलाकार फाडत, एकेक वेगवेगळ्या स्वादाची गोळी गट्टम होत असे. अशाच प्रकारच्या नंतर मध्ये होल असलेल्या ‘पोलो’ नावाच्या पांढऱ्या पेपरमिंटच्या गोळ्या मिळू लागल्या.
कॅडबरी जेम्सच्या, चाॅकलेटच्या आवरणाच्या गोळ्या देखील मला फार आवडत असत. काही गोळ्या रंगीत कागदात गुंडाळलेल्या मिळायच्या. पार्ले कंपनीच्या आॅरेंजच्या मोठ्या गोल गोळ्या पारदर्शक कागदात असायच्या. काही वर्षांनंतर ‘पानपसंद’, ‘कच्चा आम’ गोळी तशी मिळू लागली. हाॅल्सच्या गोळ्या घशासाठी किंवा तशाही चघळायला आवडत असत.
पुण्यातील बुधवार पेठेत गांधी कन्फेक्शनरी नावाचं एक दुकान आहे, ते अशा अनेक प्रकारच्या गोळ्यांचे उत्पादक आहेत. गोळ्यांसारखेच आकर्षण बडीशेपच्या रंगीत गोळ्यांचे वाटते. त्या रंगीबेरंगी छोट्या लांबट गोळ्या चवदार लागतात.
खेडेगावात देखील गोळ्यांचे लहान मुलांना आकर्षण असतेच. आम्ही सुट्टीला गावी गेल्यावर चिल्लर हातात आली की, दुकानात जाऊन गोळ्या घ्यायचो. त्यामध्ये पूर्वीच्या पाच, दहा पैशाच्या छापाच्या गोळ्या मिळायच्या. काही मोठ्या गोळ्यांना आम्ही दोन भोकं पाडून त्याची भिंगरी करायचो. भिंगरीचा दोरा लांब ओढला की तो वेगाने पुन्हा जवळ यायचा.
मोठे झाल्यावर गोळ्यांचं आकर्षण कमी होऊन ते वयानुसार चाॅकलेटकडे वळतं. लग्न झाल्यावर आपल्या मुलांसाठी पुन्हा गोळ्यांचं आमिष दाखवून त्यांच्याकडून मनासारखं काम करुन घेतलं जातं. कधी आजारी पडल्यावर डाॅक्टरांच्या सांगण्यानुसार वेळेवर औषधाच्या गोळ्या घ्याव्या लागतात. तब्येतीकडे दुर्लक्ष केलं, व्यायाम केला नाही तर ‘बीपी’ची गोळी चालू होते. पन्नाशीला शुगर आढळली तर त्यासाठी ‘कडू गोळ्या’ घ्याव्या लागतात.
हिंदीमध्ये गोळीचा उच्चार ‘गोली’ होतो आणि त्याचे वेगवेगळे अर्थ निघू लागतात…’गोली’ मार भेजे में…असं टपोरी गाणं होतं तर कधी अखियोंसे ‘गोली’ मारे…सारखं रोमॅंटिक गाणं साकारतं. गब्बर आपल्या साथीदारांना ‘अब गोली खा..’ असं म्हणून टपकावतो.
मराठी भाषेत ‘गोळी’ हा शब्द अनेक अर्थांनी वाक्प्रचारात येतो. गोळी लागली म्हणजे काय ‘फत्ते’ झालं. गोळी चुकली, म्हणजे अंदाज चुकला किंवा औषध घेण्यात खंड पडला. काहींना झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोपच येत नाही. त्याच गोळीचा ओव्हरडोस घेऊन काहीजण आपली जीवनयात्रा संपवतात.
तुम्हाला म्हातारपणात कडू गोळ्या खाण्याची वेळ येऊ नये असे वाटत असेल तर आजपासूनच तब्येतीची काळजी घ्या, माझ्यासारखं भरपूर चाला. मग खुशाल आवडतील त्या गोड गोळ्या खात सुटा.
© सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
२७-११-२०.
Leave a Reply