नवीन लेखन...

जाहिरात क्षेत्रातला एक ‘कल्पक संकल्पनकार’ गोपीनाथ कुकडे

जन्म. २८ एप्रिल १९५४ मुंबई येथे.

१९८० च्या दशकामध्ये जाहिरातकलेच्या क्षेत्रात विविध ब्रॅण्ड्सच्या जाहिरा-तींतून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे गोपीनाथ कुकडे यांचे शालेय शिक्षण मुंबईच्या अँटोनियो डिसिल्व्हा हायस्कूलमध्ये झाले. सातवीनंतर तांत्रिक (टेक्निकल) विषयांचे शिक्षण घेतल्याने आणि चित्रकलेची आवड असल्याने गोपी कुकडे यांना आर्किटेक्टच व्हायचे होते. पण शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर प्रवेशाचा अर्ज घेण्यासाठी गोपी कुकडे हे सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या आवारात गेले, तेव्हा आर्किटेक्टच्या प्रवेशअर्जाबरोबरच नव्याने माहीत झालेल्या उपयोजित कलेच्या (अप्लाइड आर्ट) पदविकेसाठीचा अर्जही त्यांनी भरला. त्यांना दोन्ही ठिकाणी प्रवेश मिळाला. पण उपयोजित कलेचा अभ्यासक्रम आठवडाभर आधी सुरू झाला व कुकडे तिथेच रमले आणि पुढील आयुष्यात ‘दृशसंवादकला’ हेच त्यांचे कार्यक्षेत्र बनले.

कुकडे १९७१ च्या जूनमध्ये विद्यार्थी म्हणून सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमध्ये दाखल झाले. जे.जे.मध्ये रीतसर कलाशिक्षण घेण्यापूर्वी दृश्यकलेचे संस्कार कुकडे यांच्यावर झालेले होते. गुणवंत मांजरेकरांच्या रांगोळी प्रदर्शनातील सहभाग, एकनाथ गोलिपकर यांच्या गणपतीच्या कारखान्यात घडलेले मूर्तिकलेचे संस्कार आणि ‘बाळकृष्ण आर्ट्स’मध्ये सिनेमाचे भव्य जाहिरातफलक (होर्डिंग्ज) रंगविण्याची मिळालेली संधी यांतून कुकडे यांची नजर तयार झाली.

जे.जे.मध्ये शिकत असताना कुकडे यांनी ‘हमराही’, ‘गुस्ताखी माफ’ यांसारख्या चित्रपटांसाठी तनुजा, सुजित कुमार अशा नटनट्यांची दहा फुटांपासून पंचवीस फुटांपर्यंतची होर्डिंग्ज रंगवली. शेवटच्या वर्षाच्या आधीच्या सुटीत कुकडे यांना चित्रकार रवी परांजपे यांच्याकडे तीन महिने काम करण्याची संधी मिळाली. जे.जे.मध्ये शिकत असताना कुकडे यांचा ‘आर्ट जत्रा’ व इतर उपक्रमांमध्येही सहभाग असे. पदविकेच्या शेवटच्या वर्षाला विद्यार्थ्यांना एखादे उत्पादन घेऊन त्याची संपूर्ण जाहिरात मोहीम करायची असते. गोपी कुकडे यांनी त्यासाठी गुलजार यांच्या येऊ घातलेल्या ‘मीरा’ या चित्रपटाची प्रॉडक्ट म्हणून निवड केली. एखाद्या चित्रपटावर अशा प्रकारे काम करणे ही त्या काळात नावीन्यपूर्ण गोष्ट होती.

कुकडे यांना होर्डिंग्जचा अनुभव होताच, त्याला शास्त्रशुद्ध संकल्पनाची जोड दिली की त्याला कलात्मक उंची प्राप्त होते, याचा अनुभव ‘मीरा’च्या निमित्ताने आला. कुकडे यांच्या या कामाला त्या वर्षाचे सुवर्णपदक मिळाले. साठ-सत्तरच्या दशकात चित्रपटांची जाहिरात मुख्यतः भित्तिपत्रके (पोस्टर्स) आणि होर्डिंग्जच्या माध्यमातून व्हायची. पब्लिसिटी हेच त्यांचे माध्यम होते. ऐंशीच्या दशकानंतर चित्रपटांचे बॅ्रण्ड म्हणून संकल्पन आणि मार्केटिंग होऊ लागले. लोगोपासून छायाचित्रणापर्यंत कलात्मक धोरणाचा विचार होऊ लागला. कुकडे यांची ‘मीरा’ या चित्रपटाची निवड या दृष्टीने अर्थपूर्ण म्हणायला हवी.

१९७६ मध्ये उपयोजितकलेतील पदविका घेतल्यानंतर गोपी कुकडे ‘चैत्र’ या जाहिरात संस्थेत रुजू झाले. वास्तवातले जाहिरातीचे जग कसे असते याचा त्यांना अनुभव आला. नंतर क्लॅरियन, एव्हरेस्ट, ॲ‍सव्हेन्यूज, अशा प्रसिद्ध जाहिरातसंस्थांमध्ये त्यांनी काम केले. त्यांनी एशियन पेन्ट्स, ग्लॅक्सो, सेन्टॉर हॉटेल, हॉकिन्स प्रेशर कुकर अशा विविध कंपन्यांच्या आणि ब्रॅण्ड्सच्या जाहिराती केल्या. पण कुकडे यांची कल्पक आणि यशस्वी संकल्पनकार म्हणून वेगळी ओळख निर्माण झाली ती ‘ॲ‍ व्हेन्यूज’मध्ये आल्यानंतर.

ॲ‍खव्हेन्यूज ही जाहिरातसंस्था गौतम रक्षित आणि अशोक रॉय यांनी सुरू केली होती. तिथले वातावरण मोकळे आणि अनौपचारिक होते. दृक्श्राव्य माध्यमांचा प्रभाव असलेल्या, भोगवादी आणि मुक्त अशा ग्रहकप्रधान संस्कृतीची चाहूल लागलेल्या नव्या पिढीचे प्रतिबिंब ॲ‍ व्हेन्यूजच्या वर्क कल्चरमध्ये पडलेले होते.

ॲ‍गव्हेन्यूजमध्ये असताना कुकडे यांनी अनेक ब्रॅण्ड्ससाठी जाहिराती केल्या, त्यांपैकी ओनिडा टीव्ही, पानपसंद ही पानाचा स्वाद असलेली गोळी, स्कायपॅक कुरियर्स, यूएफओ जीन्स, व्हीआयपी फे्रेंचीसारखी अंडरवेअर्स ही कामे विशेष गाजली.
‘ॲ‍ेड फिल्म्स’ हे कुकडे यांचे आणखी एक कार्यक्षेत्र. ॲ‍ाव्हेन्यूजसाठी कुकडे यांनी डझनावारी ॲ‍ेड फिल्म्स केल्या.
१९८२ साली रंगीत दूरचित्रवाणीचे आगमन झाले. दूरदर्शनवर जाहिराती (टीव्ही कमर्शिअल्स) येऊ लागल्या. यापूर्वी जाहिरातपट (ॲ‍ेड फिल्म्स) चित्रपट-गृहांमध्ये दाखविण्यासाठी तयार केल्या जात. दूरचित्र-वाणीमुळे त्या घराघरांत जाऊ लागल्या आणि त्यांचा प्रभावही वाढला. कुकडे यांनी या संक्रमणाच्या काळात जाहिरातपटांच्या नव्या शक्यता शोधल्या. गोपी कुकडे यांच्या मते जाहिरातीने माणसाला विचार करायला लावले पाहिजे. माणूस जेव्हा डिवचला जातो आणि अस्वस्थ होतो, तेव्हा तो विचाराला प्रवृत्त होतो. अशा डिवचणार्यास, अस्वस्थ करणार्याल जाहिराती कुकडे यांनी यशस्वी करून दाखवल्या.
‘ओनिडाचा सैतान’ ही गोपी कुकडे, कॉपिरायटर अशोक रॉय आणि मार्केटिंगचे गौतम रक्षित यांची निर्मिती अशीच कमालीची यशस्वी झाली. १९८२ साली ‘ओनिडा’च्या जाहिरातींमधून सैतानाचे पदार्पण झाले व चौदा वर्षे तो टिकून राहिला. मधल्या काही काळातल्या अनुपस्थितीनंतर २००४ मध्ये त्याचे पुनरुज्जीवन करण्यात आले आणि २००९ मध्ये २६ वर्षांनंतर तो कायमचा पडद्याआड गेला. सैतान हा माणसातल्या असूयेचे मूर्तिमंत प्रतीक होता. त्या सोबतची ओनिडाच्या जाहिरातीतली ओळ होती, ‘नेबर्स एन्व्ही ओनर्स प्राइड’; ‘शेजार्याचची असूया, विकत घेणार्या्चा अभिमान’. हा सैतान ऐंशीच्या दशकात बदललेल्या मध्यमवर्गीय मानसिकतेचे प्रतीक होता.

अमेरिकन भोगवादी संस्कृतीची ओढ, आत्मकेंद्रित मनोवृत्ती आणि बंडखोरीतून व्यक्त होणारा आत्मविश्वास अशा तामसी वृत्तीला कुकडे यांच्या सैतानाने मूर्तरूप दिले. त्यामुळे ओनिडाचा ‘सैतान’ एक पारंपरिक ‘आयकॉन’ बनला. इलेक्ट्रॉनिक्स, संगणक, कुरियर सर्व्हिस, फॅशन, गृहोपयोगी उपकरणे अशा विविध प्रकारची उत्पादने बाजारात येण्याचा तो काळ होता, आणि ग्रहकवर्गाची मानसिकता आणि आर्थिक स्तरही त्याला अनुकूल होता. या बदलत्या ग्रहकपेठेची नस कुकडे यांना सापडली आणि नव्या पिढीची दृश्यभाषादेखील.

१९८५ नंतर गोपी कुकडे रोपवाटिकेमध्ये (नर्सरी) रमले आणि मृदकला (सिरॅमिक्स आर्ट) शिकले. गोरेगावला त्यांनी सिरॅमिक्स स्टूडिओ सुरू केला. विलेपार्ल्याला ‘यूजलेस सिरॅमिक्स’ नावाची गॅलरी त्यांनी काही काळ चालवली आणि ते पुन्हा जाहिरातीच्या जगात परतले. १९८४ मध्ये ‘कॅग’ या संस्थेतर्फे सर्वोत्कृष्ट आर्ट डायरेक्टर म्हणून गोपी कुकडे यांचा सन्मान करण्यात आला. हॉकिन्सच्या ‘फ्युचुरा प्रेशर कुकर’चे संकल्पन (डिझाइन) कुकडे यांनी केले होते आणि न्यूयॉर्कच्या ‘म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट’मध्ये हा कुकर प्रदर्शनात ठेवण्यात आला होता.

कुकडे ‘कॅग’च्या व्यवस्थापन समितीचे अनेक वर्षे अध्यक्ष होते. जाहिरात क्षेत्रातला एक ‘कल्पक संकल्पनकार’ म्हणून ते ओळखले जातात.

— शिरीष मिठबावकर, दीपक घारे.

संकलन: संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..