अशोक सराफ यांचे गोपीनाथ सावकार हे मामा. अशोक सराफ यांनी गोपीनाथ सावकार यांच्यावर लोकसत्ता मध्ये लिहिलेला लेख.
कलेशिवाय ज्यांनी आयुष्यात कशालाच महत्त्व दिले नाही, असे गोपीनाथ सावकार माझे मामा होते आणि मामापेक्षा म्हणाल तर त्यांचं आणि माझं कलेच्या क्षेत्रातलं नातं द्रोणाचार्य-एकलव्यासारखं होतं.
सबंध आयुष्यात त्यांनी नाटक व सिनेसृष्टीतील माणसं, तिथली अवस्था प्रत्यक्ष पाहिली होती, अनुभवली होती. त्यामुळेच ‘तू या धंद्यात यायचं नाहीस’, असं त्यांनी मला स्पष्ट बजावलं होतं. मात्र, त्यांच्या नाटकांच्या तालमींना मी न चुकता जायचो. त्यांचं काम पाहायचो. त्यांची डायलॉग बोलण्याची पद्धत, त्यांच्या भूमिका सगळ्याचं निरीक्षण करायचो.
अर्थानुकूल डायलॉग कसे बोलायचे? वाक्यातला ऱ्हिदम कसा असावा? हे सगळं त्यांचा अभिनय पाहत शिकत गेलो. नट शब्दापेक्षा डोळ्यांनी कसं वाक्य कमीट करू शकतो, हे ते उत्तमरीत्या दाखवायचे. त्यांच्यासारखा डोळ्यांचा उत्कृष्ट वापर करणारा माणूस आजतागायत तरी मी या इंडस्ट्रीत पाहिला नाही. म्हणूनच अभिनयाच्या बाबतीत ते काळाच्याही पुढे होते. ते जो काही अभिनय करत, त्यातल्या काही अंशी मी अभिनय करू शकलो तरी मी स्वत:ला धन्य समजेन. ‘भावबंधन’ मधला धुंडिराज ते सादर करायचे. त्यातल्या आशीर्वादाच्या प्रत्येक प्रवेशाला मी ढसढसा रडलो आहे. माहीत असायचे की, हे नाटक आहे, पण त्यांचा अभिनय पाहून भावना आवरता यायच्या नाहीत. जितक्या सहजतेने ते विनोदी (भादव्या) भूमिका करायचे, तितक्याच सहजतेने सामाजिक नाटकंही करायचे.
दिग्दर्शक म्हणून सांगायचं झालं तर त्यांची एक सवय होती. इकडे स्टेजवर नाटक चालू झाले की, हे विंगेत डोळ्यांवर हात ठेवून बसायचे आणि तोंडाने नाटकातले संवाद बोलणं चालूच असायचं. त्यांच्या बंद डोळ्यापुढे नाटक चालू असायचं. स्टेजवरचा नट जरा कुठे चुकला, की त्यांना बरोबर समजायचं, मग ते अस्वस्थ व्हायचे. नाटक जराही इकडे तिकडे झालेलं त्यांना चालायचं नाही. इतका गुणवान माणूस, पण त्यांच्या गुणांची योग्य ती कदर झाली नाही. त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे त्यांच्या वाऱ्यालाही कोणी फिरकायचे नाही.
मला आठवतं, तो काळ मराठी संगीत नाटकांचा पडता काळ होता. एकूण नाटय़सृष्टीच मोडकळीला आली होती. त्यावेळी चारच नाटय़संस्था होत्या. पेंढारकरांची ललितकलादर्श, रांगणेकरांची नाटय़निकेतन, संयुक्त महाराष्ट्र कलावंत आणि माझ्या मामांची कलामंदिर. त्यातल्या ललितकलादर्श आणि नाटय़निकेतन यांचा उल्लेख आताही होतो. याचं कारण त्यांनी यशस्वी नाटकं दिली. माझे मामा यशस्वी नाटक देऊ शकले नाहीत. नाटकाच्या इतिहासातही त्यांचं नाव येत नाही. कारण जग इतकं गतिमान आहे, की तुम्ही काय केलं, यापेक्षा तुमचा गवगवा किती झाला, यावर तुमचं यश इथं मोजलं जातं. जसं यशासारखं दुसरं यश नाही, त्याप्रमाणे अपयशासारखं दुसरं अपयश नाही! हा माणूस तर आयुष्यभर अपयशीच ठरला. ही ट्रॅजिडी आहे. त्यांनी कोणाची स्तुती केली नाही. कोणाची हाजी हाजी केली नाही. जो चांगला असेल, गुणी असेल, त्याला त्याच्या योग्यतेच्या भूमिका दिल्या. जे काही तुम्ही आहात ते करा, करून दाखवा आणि यशस्वी व्हा. याशिवाय तरणोपाय नाही, हा धडा मी त्यांच्याकडून अनुभवाने घेतला.
बाळ कोल्हटकरांचं ‘दुरितांचं तिमिर जावो’, हे नाटक त्यांच्याकडे प्रथम आलं होतं. तेव्हा मामा दुसरं नाटक बसवत होते. त्यांनी कोल्हटकरांना सांगितलं की, ‘तुझं नाटक करतो,पण माझ्या हातात दुसरं नाटक आहे. ते स्टेजवर आलं की तुझं नाटक करतो. मला तुझं नाटक आवडलंय.’ पण नंतर काय झालं कुणास ठाऊक! ते नाटक दुसरीकडे गेलं. नाही तर त्यांच्या पुढच्या आयुष्याचं चित्र बदललं असतं.
ह. रा. महाजनींचं ‘शकुंतला’सारखं नाटक त्यांनी बसवलं. अगदी दृष्ट लागण्यासारखं नाटक होतं, पण चांगलं नाटक असूनही पहिले तीन प्रयोग नायगाव ओपन एअर थिएटरला लावलं आणि भर ऑक्टोबर महिन्यात धो-धो पाऊस कोसळला आणि नाटक पुन्हा उठलंच नाही. याला नशीब म्हणायचं, दुसरं काय!
मामांचा पाय कापल्यावर कलामंदिरची मॅनेजमेंट, नाटकाची व्यवस्था वडीलच सांभाळत. पण पाय कापला तरी मामा गप्प बसले नव्हते. लाकडाचा पाय लावून चालताना वेदना व्हायच्या तरी ते तीन मजले चढून धापा टाकत यायचे.. तालमींना जायचे. हे सगळे पाहून मी विचार करायचो, ‘काय त्यांच्या मनाचं सामथ्र्य असावं. जे त्यांना सतत नाटक करायला लावत होतं!’
अशा परिस्थितीतही त्यांना संस्थेसाठी नवीन नाटक करावंसं वाटत होतं. त्यामुळे ते सारखे अस्वस्थ असायचे. त्यांनी शिरवाडकरांकडे नाटक मागितलं. त्यांनी त्यांचं नवीन नाटक ‘सं. ययाती-देवयानी’ मामांना दिलं. नाटय़सृष्टीतील प्रथेप्रमाणे यातही मोडता घालण्याचे चिक्कार प्रयत्न झाले. परंतु शिरवाडकर हे शब्दांचे पक्के! सच्चा माणूस आणि स्पष्टवक्ते! त्यामुळे त्यांनी इतरांना सांगितले, ‘मी तुम्हाला नाटक देऊ शकत नाही. सावकार नाही म्हणाले तर ते तुम्हाला देईन.’ शेवटी ते नाटक मामांनाच मिळालं. सगळ्या बाजूंनी प्रतिकूल परिस्थिती असताना त्यांनी हे नाटक बसवलं. शरीर साथ देत नव्हतं. सांपत्तिक स्थिती साथ देत नव्हती. काही ना काही अडचणी येत होत्या. पण नाटक करण्याच्या दुर्दम्य इच्छेपोटी हे नाटक त्यांनी बसवलं. ‘ययाती आणि देवयानी’चं दिमाखदार प्रॉडक्शन यशस्वीपणे उभं केलं! परंतु दुर्दैवाचा फेरा हा की नाटक चांगलं होतं, प्रयोग भरपूर झाले, परंतु नाटक चाललं असं म्हणता येणार नाही.
ययाती आणि देवयानी नाटकाचा १९६७ मधील बेळगावचा प्रयोग मी आयुष्यात विसरणार नाही. हे नाटक मला अख्खं तोंडपाठ होतं. ‘तू या धंद्यात अजिबात जायचं नाही,’ असं सांगणाऱ्या मामांनीच छोटू सावंत आजारी पडल्यामुळे या प्रयोगासाठी मला बोलावलं. त्यावेळी झालेला आनंद मी शब्दांत सांगू शकणार नाही. अगोदरचा वास्कोचा प्रयोग मामांनी लाकडाचा पाय लावून केला. पण लाकडाच्या पायामुळे त्यांच्या अभिनयात कुठेही कमतरतात आली नव्हती. परंतु जास्त त्रास झाल्यावर त्यांनी मला बोलावून घेतलं. त्या बेळगावच्या प्रयोगात, विदूषकाच्या कॅरेक्टरला मला तुफान रिस्पॉन्स मिळाला. ती माझ्या आयुष्यातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची भूमिका मी माझ्या गावात केली. शिरवाडकरांचा विदूषक उच्च प्रतीचा होता. मराठीत आतापर्यंत असा विदूषक झालेला नाही.
नाटक झाल्यावर मामांकडे मी पाहिलं. काहीतरी शाबासकी मिळेल, वाहवा मिळेल. पण त्यांनी काहीच प्रतिक्रिया दर्शवली नाही. ज्या अर्थी ते वाईट करतोस’ असं म्हणाले नाहीत, त्या अर्थी मी बरं काम केलं असावं, असा मी माझा समज करून घेतला, म्हटलं, छोटू सावंत परत आला की तो हे काम करेल. पण एक दिवस मामा मला म्हणाले, यापुढे हा रोल तूच कर.’ माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं प्रशस्तिपत्र मला त्या दिवशी मिळालं. हा मी माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा गौरव समजतो. मला घेऊन त्यांचे पैसे वाचणार होते असं नव्हतं. माझी नाईट मला व्यवस्थित मिळणार होती. नात्यापेक्षा कलावंतांना महत्त्व देणारा, व्यवहाराला एकदम चोख माणूस!
झालं! माझा रोल ठरल्यावर त्यांनी मला एक दिवस तालमीला बोलावलं. विदूषकाचं पहिलं वाक्य असतं. होय देवी, मी विदूषक.’ मी म्हटलं, ‘होय देवी, मी विदूषक,’ हे ऐकल्याबरोबर ते म्हणाले, ‘थांब, थांब’ काय बोललास, ‘विदुषकमधला दू दीर्घ आहे, तू ऱ्हस्व बोललास दू दीर्घ बोल.’ म्हटलं, माझी पहिल्या वाक्याला ही अवस्था, तर पुढे काही खरं नाही. मी हळूच स्क्रिप्ट बंद केलं. म्हटलं, मामा मला कळलं, तुम्हाला काय म्हणायचं ते! मी करतो, बरोबर करतो.’ आणि हळूच सटकलो. उच्चारांच्या बाबतीत अगदी पर्टिक्युलर. मी नकळत शिकत गेलो! अशी अॅकक्टिंग कर, तशी अॅंक्टिंग कर,’ असं शिकून कुणी नट बनत नसतो. खरं म्हणजे आपण आपल्या गुणवत्तेनुसार ग्रहण करायचं असतं. घडायचं असतं. अभिनयाचे सर्व प्राथमिक धडे मी घेत होतो. ते पुढे डेव्हलप कसे करायचे, हे बघून शिकत होतो. वाक्याला लय किती असावी? पॉज किती असावा? वाक्यात मुव्हमेंट किती असावी? यासाठी ते जीवतोड मेहनत करायचे. कलाकारांकडून स्वत:च्या मनासारखं काम होईपर्यंत काम करून घ्यायचं. त्यांच्याकडे काम करणाऱ्यांना बक्षिसं मिळाली. अजूनही मिळतात. पण मनुष्यस्वभाव असा आहे की, जर तुमचं नाव नाही, तर तुम्हाला कोणी विचारत नाही. माणसांची नावं अभिमानाने केव्हा घेतली जातात? तो यशस्वी असेल तरच! गोपीनाथ सावकार ही व्यक्ती चांगल्या कलाकृती करूनसुद्धा आयुष्यभर अपयशीच राहिली. मग त्यांचा उल्लेख त्यांच्याकडून शिकलेल्यांनी का करावा? गोपीनाथ सावकार हे नाव सांगून त्यांना जर दीडकीचा फायदा होणार नसेल, तर त्यांचं नाव का सांगावं? पण मी मात्र अभिमानानं सांगतो माझे गुरू गोपीनाथ सावकार!
त्यांच्या परखड स्वभावामुळे त्यांच्यामागे स्तुतिपाठक नव्हते. त्यांनी कधी ग्रुपबाजी केली नाही. प्रसिद्धीसाठी वेगळे मार्ग स्वीकारले नाहीत. त्यांना या सगळ्यांची गरजही नव्हती. पण त्यांच्या अंगी करण्याची उमेद असून, पात्रता असूनही त्यांना जास्त चांगलं काही करायला मिळालं नाही.
आयुष्यात शेवटपर्यंत लंगडय़ा पायानं ते झगडत राहिले. नाटक करत राहिले. १९७३ साली त्यांचा मृत्यू झाला आणि १९७४ मध्ये या क्षेत्रात माझा उदय झाला. पण समर्थ कलावंत असलेले माझे मामा मला मार्गदर्शन करायला, घडवायला माझ्यासोबत नव्हते, याचं मला दु:ख आहे. आज माझी नाटकं चालतात, चित्रपट चालतात. दुसरी माणसं पैसे कमावतात. पण मी माझ्या मामांना काहीच मदत करू शकलो नाही. ही माझ्या आयुष्यातील मोठी खंत आहे. माझं सगळं यश त्यांचं आहे आणि त्यांचंच राहणार आहे.
अशोक सराफ
(गोपीनाथ सावकार चरित्र आणि आठवणी पुस्तकातून साभार.)
संकलन. संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply