आम्ही गोरेगांवच्या आरे काॅलनीतल्या ‘फिल्म सिटी’ची सैर केली..सोबत श्री. पेडणेकर नांवाचे फिल्मसिटीचे कर्मचारी मार्गदर्शक म्हणून आले होते..
दुपारी १२ वाजता आमची ट्रिप सुरू झाली व सायंकाळी ४ वाजता संपली..
सिरियल, चित्रपटात दिसणारे भव्य बंगले, त्यातील राजेशाही दिवाणखाने, प्रचंड मोठे राजमहाल, गांवं, रस्ते हे प्रत्यक्ष पाहताना खुप मजा वाटली..आम्हाला ‘जय मल्हार’ या लोकप्रिय मराठी सिरियलमधील ‘बानू’ची झोपडी प्रत्यक्ष आतून बाहेरून बघायला, अनुभवायला मिळाली..त्याच बानूला मल्हारीने बांधून दिलेला प्रचंड महाल आतून बाहेरून प्रत्यक्ष स्पर्श करून बघता आलं..’महाराणा प्रताप’ सिरियल मधील महाराजा उदयसिंगांच्या महालाचं प्रवेशद्वार, राणा प्रतापची राणी अजबदे हिच्या महालाचं प्रवेशद्वार अगदी शेजारी शेजारी उभारलं होतं..प्रत्यक्षात सिरियल मध्ये या दोघांची गांवं एक मेकांपासून खुप दूर दाखवलेली आहेत..ही सर्व कॅमेऱ्याची किमया..कॅमेरा काय कमाल करू शकतो हे अनुभवायचं असेल तर शुटींग एकदा तरी पाहावं..
पडद्यावर दिसणारी प्रचंड, श्रीमंती दुनिया प्रत्यक्षात साधं, तकलादू प्लायवूड, लाकूड आणि थर्माकोलच्या आधाराने उभारण्यात येते हे माहीत होतं पण प्रत्यक्ष बघताना काही वेगळंच वाटत होतं..अक्षरक्ष: हजारो कुशल कारागीर या निर्मितीत गुंतलेले असतात..या कसबी कारागीरांना सलाम..कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांना मिळणारं ग्लॅमर आणि पैसा आपल्याला दिसतं..कधी कधी त्यांचा हेवाही वाटतो..पण त्या सीनमधील एक एक वाक्य बोलताना त्यांची मेहेनत, होणारी दमछाक सिरियल किंवा पिक्चर बघतांना आपल्या लक्षातही येत नाही..
आम्हाला ‘बाल गणेश’ या सिरियल मधील एका शाॅटची शुटींग पाहता आली..८-१० वर्षाच्या बाल गणेशाला एक-दोन वाक्य बोलायची होती..सर्व मिळून १०-१२ शब्दं असतील-नसतील..पण तेवढी दोन वाक्यांचं रिटेक करता करता २० मिनिटं गेली..आम्हाला नुसतं बघुनही कंटाळा आला पण ते १० वर्षाचं गोडं पोर न थकता, शाॅट दिग्दर्शकाच्या मनासारखा होई पर्यंत, परत परत करत होतं..सर्व सपोर्ट स्टाफही त्या पोराचं कोतुक करत होता..प्रत्यक्षात पडद्यावर पाहताना हे वाक्य फ्रॅक्शन सेकंद येवढं पण नसेल..काय ती मेहेनत, काय ती चिकाटी आणि काय ती निष्ठा..!!
खरं सांगायचं तर ही ‘वेड्यां’ची दुनिया आहे..’वेडं’ झाल्याशिवाय असली ‘क्रिएटीव्ह’ कामं नाही करता येत..आणि वेडं असल्याशिवाय ती अनुभवताही येत नाही…इथ कलेची नशा असते आणि पैसा दुय्यम..
फिल्म सिटी तर्फे दररोज या ठिकाणी टूर आयोजीत केली जाते..प्रत्येकांने हे बघण्यासाठी, अनुभवण्यासाठी फिल्मसिटीला जरूर भेट द्यावी..महाराष्ट्र शासन आणि फिल्मसिटी मॅनेजमेंटने तीथे उपलबद्ध करून दिलेल्या सोयी सुविधा केवळ अप्रतिम..!!
-गणेश साळुंखे
Leave a Reply