माझ्या सर्व नातेवाईकांमध्ये दुर्दैवाचे जास्तीत जास्त फेरे ज्या व्यक्तीच्या वाट्याला आले तिचा आणि तिच्या गोष्टीचा शेवट काल झाला. पतीचे लग्नानंतर अवघ्या सहा वर्षांमध्ये अनपेक्षित आणि दुर्दैवी निधन, दोन बाळांचं अबॉर्शन, काही काळ मोठ्या दिराच्या घरी वास्तव्य, नंतर माहेरी आणि शेवटी मुलीच्या घरी असा प्रवास – इथून-तिथून बरेचसे परावलंबी ! आणि कोरोना – त्यातून दवाखाना, आयसीयू , व्हेंटिलेटर आणि मृत्यू असे टप्पे, इथे फरफट संपली नाही. अंत्यविधीसाठी सहा तास रांगेत थांबावे लागणे अशी गोष्ट संपत नसते.
माझ्या तीनही मामांपैकी बबन मामाशी मी खूप जोडलो गेलो आहे. बाकीचे दोघे आईपेक्षा मोठे असल्याने दुरूनच पाहायचो,त्यांना भेटायचो. त्या दोघांचे विवाह माझ्या जन्माआधी झालेले असल्याने त्यांच्या विवाहविषयक कहाण्या मला अपरिचित आहेत. बबन मामाचे तसे नव्हते आणि आशा मामीचेही ! त्यांच्या लग्नाची मंगलाष्टके मी केली होती, माईकवर गेय वाचली होती. आधी बबन मामाबरोबर आणि नंतर त्या उभयतांबरोबर सिनेमे, पूना फाईल मधील उन्हाळ्यातील रात्रीच्या गंमती -जमती, त्यांचेही वारंवार भुसावळला आमच्या घरी येणे ! आशा मामीला “दाखवायला “आमच्याच भुसावळच्या घरी तिच्या आत्याने आणले होते आणि आमच्या दादांनी-मोठया जावयाच्या भूमिकेतून संमती दिल्यावर मग सगळी पुढची जुळवाजुळवी जळगांवला झाली होती.
बुलढाण्याला त्या लग्नासाठी जळगांव ते भुसावळ रेल्वेने आणि पुढे बुलढाण्यापर्यंत एसटीने असा आमचा प्रवास झाला. पांडे मंडळींच्या सढळ हातांच्या साक्षीने झालेल्या त्यांच्या विवाहात आम्ही लुडबुड केली आणि त्या दोघांचे सहजीवन जळगांवला सुरु झाले. बबन मामा काहीसा मोठ्या भावासारखा आणि आशा मामी मोठ्या बहिणीसारखी हक्काची वाटायची. छोटी-मोठी गुपिते त्यांना सहज सांगितली जायची.
रत्नाच्या जन्माच्या आधी ती प्रेग्नन्ट होती, त्यावेळी आईने मोठ्या कौतुकाने तिला डोहाळेजेवणासाठी भुसावळला बोलाविले होते. त्यांत काहीतरी अवचित घडले आणि तिचे भुसावळच्या म्युनिसिपल दवाखान्यात मिसकॅरेज झाले. पुढे बराच काळ म्हणजे पुढच्या बाळाचा- रत्नाचा सुखरूप जन्म होईपर्यंत आई-दादांना ती बोच लागून राहिली होती.
रत्नाने मात्र त्यांचे आयुष्य पूर्ण केले आणि आनंदाने भरून टाकले. पण तिच्या नशिबी पितृसुख फार काळ नव्हते. मग मामीनेच तिला वाढविले -दुहेरी भूमिकेतून ! त्यासाठी ती बुलढाण्याला आपल्या माहेरी राहिली. आमच्या ताईंनीही असेच तिन्ही मुलांना एदलाबादला वडिलांच्या भक्कम आधारावर वाढविले होते. मामीसाठी तिचे मोठे बंधू ठामपणे तिच्या पाठीशी राहिले. त्याकाळात सर्रास माहेरची मदत घेतली जायची आणि त्याचे काही वाटायचे नाही.
वेळप्रसंगी बुलढाण्याच्या शाळेत नोकरी करून तिने स्वतःला आणि मुलीला स्वतःच्या पायावर उभे केले. प्रसंगोपात्त जळगांवच्या-सासरच्या सगळ्या महत्वाच्या घटनांमध्ये अलिप्तपणे हजेरी लावली. सासर तोडले नाही, कायम सगळ्यात धाकटी म्हणून जुळवून घेत राहिली-पतिनिधनानंतर ! अगदी माझा विवाह आणि त्यानंतर माझ्या मुलाचा विवाह आणि अलीकडे माझ्या नातीच्या बारशापर्यंत ती अबोलपणे वावरत राहिली.
रत्नाचा विवाह बुलढाण्यालाच झाला-त्याच शाळेत जिथे ती आणि बबन मामा विवाहबद्ध झाले होते. मितभाषी आणि समंजस अशा शशांकने शेवटपर्यंत सासूबाईंना संसारात महत्वाचे स्थान दिले. मुलीचे पुण्यात छान घर, नातवाची होणारी वाढ हे काही सुखद क्षण तिच्या वाट्याला आले पण त्यांचेही आयुष्य अल्प ठरले.नातवाचे लग्न ती पाहील असं वाटत असताना तिला कोरोना झाल्याचे वृत्त कानी आले. सहव्याधी असल्याने उपचारांमधून बाहेर येणे थोडे अवघड होते, पण दुरूनच आमचे धीर देणे आणि प्रार्थना सुरु होत्या. आणि काही दिवसांनी प्रकृती खालावत गेल्याने तिच्या निधनाची बातमी कानी आली.
आई-वडील, तीनही मामा, एक आत्या, एक मावशी, एक काका, सासूबाई अशी एकेक करून बरीच सावली जाण्याच्या वाटेवरचा मी ते ऐकून फक्त स्तब्ध झालो. तिला शेवटचे भेटताही आले नाही.
बबन मामा गेला तेव्हा महाविद्यालयीन मी खूप अस्वस्थ झालो होतो कारण ते जाणे सर्वथैव अनपेक्षित होते. त्याच्या जाण्यानंतर एका तिरमिरीत ” हॅलो,मि. कमिंग “असे लेखन मी केले. यावेळी उत्कटतेने वाटलेलंही कागदावर आज उतरतंय -आशा मामीच्या पहिल्या वर्ष श्राद्धाच्या वेळी !
आयुष्यात खूप बडबड केल्याची आणि शांत न राहिल्याची खंत आजकाल उसासून वाटते. आपण निःस्तब्ध झाल्यावरच आयुष्याच्या प्रवाहावर सूर्य आणि चंद्र स्वतःचे ठळक प्रतिबिंब मागे विसरून जात असतात. शब्द पोरके झाले की प्रतिमांचा आधार घ्यावा आणि प्रतिमांचे चेहेरे धूसर झाले की शांततेला शरण जावे. मामी शांत झाली म्हणजे यातनांना शरण गेली असा जसा अर्थ होतो, तसेच मला वाटते शांतता म्हणजे भोग नसतात. काहीवेळा आत्म्याचे कान देऊन ऐकण्यासाठीही गप्प बसावेसे वाटते. अस्तित्वाच्या खूप आधी या विश्वाची सुरुवात अथांग शांततेने झाली असावी आणि शेवटी तिचाच तवंग सगळ्या अस्तित्वांवर पसरत असावा.या निमित्ताने सारे निरखत असताना जाणवते की सगळ्याची निर्मिती, सुरुवातच शांततेतून असते. आपले विचार, लेखन शांततेतून तरंगासारखे उमटतात आणि ओठांमधून बाहेर पडणारे पोकळ शब्द बुडबुड्यांसारखे विरून जात असतात.खरे तर आपले “असणे ” एक प्रकारच्या रितेपणातून निर्माण झालेले असते आणि आपल्या नसण्यानंतर ते रितेपणही संपते. आपण फक्त प्रार्थनेमध्ये शब्दरहित हृदय ठेवावे.
कोणतीही गोष्ट “अशी” संपू नये.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply