११ जानेवारीला अल्वार हून पंतनगर च्या वाटेवर असताना, मित्राने व्हाट्सअपवर कळविले – ” लता मंगेशकर आय सी यू त -कोरोनाची बाधा !” व्हाट्सअप विद्यापीठावर मी शक्यतो विश्वास ठेवत नाही म्हणून घरी पत्नीला तातडीने फोनलो – ” टीव्ही वर काही वृत्त आहे का बघ आणि कळव. ”
ती म्हणाली – ” होय, एक लंगोट दिसतोय चॅनलवर ! बातमी खरी आहे.”
आज आठवडा होत आलाय, मी ट्रॅक करतोय प्रकृतीचे अपडेट आणि मिळवतोय हेल्थ बुलेटिन ! हात जोडलेले आहेत आणि ओठ अस्वस्थ आहेत.
जो स्वर जीवनाचा कणा बनलाय, ज्याने माउलींच्या शब्दांनी साक्षात देवांना आकृष्ट केलंय, ज्याने आयुष्यातील प्रत्येक प्रसंगाला आवाज दिलाय, ज्याने आख्खं आयुष्य सुश्राव्य केलंय, ज्याने प्रत्येक भावना अलंकृत केलीय त्याच्यासाठी प्रार्थना करा असं आवाहन काल वाचनात आलं.
अशा व्यक्तीच्या वाट्याला जाताना काळाने,व्याधींनी त्या व्यक्तीचा इतमाम सांभाळायला हवा एवढंच मला वाटतं. जेव्हा केव्हा असेल तेव्हा ” अलविदा ” साजेसा असावा, अशी माफक अपेक्षा आहे.
“अनुरोध “मध्ये खन्नाच्या आवाजात किशोर धमकी देतो- ” यारो का गम क्या होता हैं ! ” आणि बजावतो– “माझ्या मित्राला ( विनोद मेहेराला) काही झाले तर मी गायचं सोडून देईन.”
सचिन सेवानिवृत्त झाल्यावर मी क्रिकेट पाहणे सोडलंय. आता कदाचित गाणे गुणगुणायचे सोडावे लागेल——- !
गोष्ट ” अशी “संपायला नकोय !
बस्स !
लेखन सीमा
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply