एक आजी , आईची आई . शिक्षण जेमतेम दुसरी तिसरी. तिच्या उमेदीच्या काळात तिने खूप कष्ट केले. त्यावेळी बहुतेक एकत्र कुटुंबात सगळ्या स्त्रियांना करावे लागत. ती माझ्या आठवणीत असल्या पासून दमा वगैरे असल्यामुळे असेल जास्त बाहेर जायची नाही. पण बसल्या जागी कुठे काय चाललय तिला पक्क ठाऊक असायचं. कारण छान नऊवारी साडी नेसणारी ती अगदी पोलीस फाईल मध्ये दाखवतात त्या पद्धतीने दोन-चार लोकांशी एकाच गोष्टीविषयी गप्पा मारून त्यांच्या नकळत तिला हवी ती माहिती बरोबर काढून घ्यायची. इतकी चाणाक्ष !
तर तिच्या छोटेखानी घराला दोन पायऱ्या आणि लगेच वरती जायला जिना होता. प्रवेश दाराच्या दोन्ही बाजुना सरकारी (बहुदा ) कचेरी होत्या, त्यात दोन चार लोक कामाला होते. एकदा दुपारी आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तर बाजूच्या ऑफिसमधले दोघे घाबरे घुबरे होऊन पळतच आले. “वहिनी साप! वाहिनी साप!”
झालं वाहिनी उठल्या. सापाची मला तर इतकी भीती वाटते माझी तर घाबरगुंडीच उडाली. पण आजी म्हणजे काय? ती त्यांच्याबरोबर तडक बाहेर निघाली. मग न राहवून आम्ही पण दबकत थोड पुढे सरकलो . बाहेरच्या जिन्याच्या खाली एक साप मुटकुळं करून बसला होता. “वाहिनी बघा ! काय करायचं? ” लोकं म्हणेपर्यंत तिने एक दांडू हातात घेतला आणि एका झटक्यात सापाला मारून टाकले . ( सर्प मित्रानो हा काळ ३०-३५ वर्षांपूर्वीचा त्यावेळी सर्प मित्र हि संज्ञा आमच्या ऐकिवात नव्हती) आम्ही सगळे अवाक होऊन बघतच बसलो. तिने हसत हसत तो साप कुठे लांब नेऊन टाकला (असावा) . त्या दिवसापासून ती माझ्या साठी SHERO च झाली.
***
दुसरी आजी , बाबांची आई. नऊवारी साडी नेसणारी. ती मात्र त्या वेळच्या मॅट्रिक पर्यंत शिकलेली ( पण काही घरगुती अडचणीमुळे परीक्षा न देऊ शकलेली). अत्यंत धोरणी आणि खमकी . घर, शेत (जे घरापासून बरच लांब होत, बसने अर्धा-पाऊण तास लागे ) सगळं एकहाती सांभाळायची.
आमचं घर म्हणजे कौलारु, जुन्या काळचा वाडा. साधारण अर्ध्या एक एकरचा. घर रस्त्यापासून साधारण शंभर एक फूट आत, दोन पायऱ्या चढल्या कि ओटी . आणि मग घराचा मुख्य दरवाजा जो माजघरात उघडायचा, तो इतका जड आणि बळकट, जणू बुलंद दरवाजाच. घराच्या दोन्ही बाजूंना पन्नास साठ फूट रिकामी जागा मग तारेचं कुंपण . वाड्याच्या दोन्ही बाजूना एकेक घर. ती घरे पण सधारणतः अशीच . घरामागे (वाड्याची) बाग, टोकाला कॉंक्रिट सिमेंटचा कोट आणि त्या पलीकडे समुद्राच्या दिशेने जाणारा रस्ता ( वाळूच सूर व्हायची). घरात कोणी काही बोलले, ओरडले तरी कुठे ऐकू जायची शक्यता नाममात्र.
गाव तस बऱ्यापैकी लहान पण गावाबाहेर हळूहळू कारखाने येऊ लागले.GIDC वाढू लागली.
गावात माणसे कमी होऊ लागलेली. शेजारचे एक घर तर रिकामेच असे.
गावाला मध्ये हा काही काळ थोडा विचित्र होता. GiDC मध्ये , गावालगतच्या आजूबाजूच्या गावांमध्ये दरोडे पडू लागले होते. साधी सुधी चोरी मारी नाही तर शोले मध्ये वगैरे दाखवलेत त्या प्रकारचे . दरोडेखोरांची टोळी यायची वीस एक जणांची. हातात कुर्हाडी वगैरे घेऊन यायचे. पूर्ण घराला वेढा द्यायचे. घर पूर्ण साफ करून जायचे. विरोध केला तर कुर्हाडी डोक्यात घालायला मागे पुढे बघणार नाही, अशी गत. कोणी कानातून सोन्याचे डूल काढायला उशीर लावला म्हणून तिचा कानच कापला अशा कहाण्या लोकं चघळत बसायचे. इतकी दहशत पसरली होती.
पण आमची आजी त्या परिस्थितीतही खंबीरपणे तिकडे एकटी रहात होती. तिचा एकच नियम, साधारण चार वाजता मागचा विहिरीकडचा, तुळशीच्या अंगांकडंचा (बाजूचा) दोन्ही दरवाजे बंद करायचे. ते उघडत एकदम सकाळी उजाडलं कि. दिवेलागणीच्या वेळी घराचा मुख्य दरवाजा बंद होई. आणि तो ती फक्त सकाळी उघडे. मध्ये कोणीही आलं, कितीही जवळच तरी त्यांना दार उघडत नसे. अगदी “गडाचे दरवाजे सकाळ पर्यंत उघडणार नाहीत ” थाटात ती त्यांना परतून लावे. एकदा नियम म्हणजे नियम .
आता शहरात एवढ्या गर्दीत दोन तीन खोल्यांच्या घरात सुद्धा जेव्हा लोकं एकटं राहायला घाबरतात तिकडे, एवढ्या मोठ्या घरात, फोन, मोबाइल यासारखी साधने नसताना, बोंब ठोकली तर कोणाला ऐकू जाणार नाही अशी परिस्थिती असताना , दरोडेखोरीची टांगती तलवार डोक्यावर असताना ती कुठल्या हिमतीने त्यावेळी राहिली असेल?? कदाचित तीचा तो गणपती बाप्पाच तिला हे बळ देत असावा. तिच्या हिमतीला, शिस्तीला, धीराला दंडवत !!
Leave a Reply