गोविंद वासुदेव कानिटकर हे कवी आणि भाषांतरकार म्हणून प्रसिद्ध होते. त्यांना चित्रकला आणि संगीतातही गती होती.
त्यांनी काही दीर्घकाव्यं लिहिली होती. त्यांचा जन्म ९ जानेवारी १८५४ पुणे रोजी झाला. कानिटकरांचे सुरुवातीचे शिक्षण पुण्यात आणि उच्च शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजात झाले. १८७६ मध्ये ते बी.ए. झाले.
एल्एल.बी झाल्यावर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात तीन वर्षे वकिली केली. नंतर ते सरकारी न्यायालयात मुन्सफ झाले. त्यांच्या पत्नीचे नाव काशीताई कानिटकर. या लेखिका होत्या. प्रसिद्ध नाटकककार नारायण बापूजी कानिटकर हेही त्यांच्या कुटुंबीयांपैकी एक होते. इचलकरंजीचे संस्थानिक बाबासाहेब घोरपडे ह्यांच्या स्नुषा अनुताई घोरपडे ह्या कानिटकरांच्या कन्या होत्या. स्वतः गोविंद वासुदेव कानिटकर हे चित्रकला आणि संगीत या कलांचे ज्ञाते होते. त्यांचा व हरी नारायण आपटे यांचा स्नेह होता.
अकबर बादशाह, श्रीमंत नारायणराव पेशवे यांचा वध, संमोहलहरी अशी दीर्घकाव्यं आणि कविकूजन हा त्यांच्या कवितांचा संग्रह, तसंच ‘भट्ट मोक्षमुल्लर कृत धर्मविषयक व्याख्याने’ हे व्याख्यानांचं भाषांतर प्रसिद्ध आहे. मॅक्समुल्लरच्या व्याख्यानांचं भाषांतर करताना त्याच्या नावाचे ‘मोक्षमुल्लर’ असं मराठीकरण त्यांनी केले होते.
शेक्सपियरच्या ‘हॅम्लेट’, ‘कोरिओलेनस’ आणि ‘मर्चंट ऑफ व्हेनिस’ या नाटकांचे, तसंच जॉन स्ट्युअर्ट मिलच्या ‘सब्जेक्शन ऑफ वूमन’चे त्यांनी केलेले अनुवाद गाजले होते. १९०६ साली पुण्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. गोविंद वासुदेव कानिटकर यांचे ४ जून १९१८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply