आज ख्यातनाम संगीतकार, पेटीवादक गोविंदराव टेंबे जन्म यांचा ५ जून १८८१ रोजी कोल्हापूर येथे झाला. गोविंदराव टेंबे अगदी बालवयातच ते संगीताकडे आकर्षित झाले. ते बहुतांशी स्व:शिक्षित पेटी वादक होते. गोविंदराव देवल क्लबला स्व:ताच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील जडणघडणीचे श्रेय देत असत. गोविंदरावांनी भास्करबुवा बखले यांच्याकडून कला आत्मसात केली. जयपूर घराण्याचे अल्लादिया ख़ाँ यांच्याकडून वास्तविक त्यांनी कधीच शिक्षा घेतली नाही पण तरीही गोविंदराव ख़ाँसाहेबांना आपला गुरु मानत.
गोविंदराव भास्करबुवा बखले यांना साथ द्यायचे आणि बहुतांशी पेटीचा एकपात्री प्रयोग ही करायचे. गोविंदरावांनी संगीत दिलेल्या संगीत मानापमान नाटकातील पदे आजही लोकप्रिय आहेत. त्यांनी अयोध्येचा राजा या पहिल्या मराठी बोलपटालासुद्धा संगीत दिले. काही वर्षांनी त्यांनी स्वत:ची शिवराज नाटक मंडळी सुरु केली. त्यांनी स्वत: नाटके आणि त्यातील पदे लिहिली. गोविंदराव टेंबे उत्कृष्ठ टेनिसपटु होते व त्यानी सर्कसचे मॅनेजर म्हणूनहि काम केले होते! त्यानी बावीस श्रुति वाजवता येतील अशी पेटीहि बनवली होती. ’पटवर्धन’ हे त्यांच्या एका नाटकाचे नाव. त्यातील ’तारिणी नववसनधारिणी’ हे पद अजूनहि लोकप्रिय आहे.
चंद्रिका हि जणू, शूर मी वंदिले सारख्या उत्तमोत्तम गाण्यांना त्यांनी संगीत दिले. ना.सी. फडके यांनी तर त्यांना मराठी नाट्यसंगीताचा शिल्पकार म्हटले होते. बालगंधर्व मा.गोविंदराव टेंबे यांना गुरु मानायचे. गोविंदरावांनी ‘अयोध्येचा राजा’ या बोलपटात हरिश्चन्द्राची भूमिका केली होती. मा.गोविंदराव टेंबे यांनी खूप लिखाण केले होते. माझा संगीत व्यासंग हे त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांतील एक उत्कृष्ठ पुस्तक आहे. ‘माझा जीवन विहार’ या आपल्या पुस्तकात मा. गोविंदराव टेंबे यांनी आपल्या आयुष्याचा आढावा पुढील शब्दात घेतलेला आहे.
”मी आज यावेळी माझ्या आयुष्याचा आढावा घेत असतांना मला असे दिसून येत आहे की लाभ, हानि, सुख, दुःख, यशापयश इत्यादी महत्वाच्या प्रसंगापासून तो नित्याच्या क्षुल्लक गोष्टीपर्यंत प्रत्येक बाबतीत यशाच्या शैल शिखरावरून मी निराशेच्या खोल गर्तेत आदळायचे आणि अचानक तेथून पुन्हा मला कोणीतरी अज्ञात शक्तीने शिखरावर आणून बसवायचे, अशा सतत अनुभवांमुळे बुद्धीच्या टोचणीविरुद्ध देखील माझा परमेश्वरावरील विश्वास अढळ राहिला आहे.
आचारात मी नास्तिकातला नास्तिक आहे आणि विचारामध्ये भावी पिढीच्याही पुढे आहे. मात्र पुरातन आचार विचारांना केवळ पुरातन म्हणून लाथाडायचे ही माझी वृत्ती नाही. परमेश्वर आहे की नाही, या विषयीची मी पंचाईत करत नाही. पण तो मजेने मला खाली पाडतो, माझी धडपड पाहतो आणि मी हताश झाल्यावर कारुण्याच्या एका कटाक्षाने मला वर काढतो ही एकच भावना माझ्यात दृढमूल झालेली आहे, आणि कोणत्याही कारणाने ती मुळातून यत्किंचितही सुटलेली नाही. अर्थात या विश्वासामुळे मी कोणत्याच गोष्टीचा विधीनिषेध मानीत आलो नाही. जे जे प्राप्त होईल ते ते भोगायचे; त्याच्या परिणामाचा विचार करावयाचा नाही — मग तो परिणाम इष्ट असो वा अनिष्ट असो. यामुळे कोणाचेही बरे केले हा अहंभाव नाही व कोणाचे वाईट व्हावे व माझे बरे व्हावे ही आतून रुखरुखही नाही. मनात आलेली गोष्ट योग्यच असणार तेव्हा ती करायची; मग ती बरी असो के वाईट असो. वाईट असेल तर त्यातून ईश्वरेच्छेने आपोआप मुक्तता होईलच; तोपर्यंत ती मला मानवतेच.
चांगल्या वस्तूला मी मुकलो तर त्याहीपेक्षा अधिक चांगली वस्तू मला मिळणार आहे अशीही खात्री ठेवायची; आणि ती केवळ अंधविश्वासाची खात्री नव्हे, तर अनुभवाची खात्री. या मीमांसेनंतर माझ्या वरवर दिसणा-या बेपर्वा व बेगुमान बेछूट वृत्तीची तरफदारी करण्याचे क्वचितच कारण पडेल. गोविंदराव टेंबे यांचे ९ ऑक्टोबर १९५५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply