ज्येष्ठ अभिनेते गोवर्धन असरानी ऊर्फ असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर येथे झाला. असरानी यांनी जवळपास पाच दशकापासून ते आजपर्यंत सिनेरसिकांना आपल्या विनोदी अभिनयाने खळखळून हासायला भाग पाडले आहे. असरानी हे सिंधी परिवारातील आहेत. त्यांचे वडील फाळणीनंतर जयपूर येथे स्थलांतरीत झाले. असरानी यांना चार बहिणी आणि तीन भाऊ होत. त्यांचे शिक्षण सेंट झेव्हिअर्स स्कूल आणि राजस्थान कॉलेज, जयपूर येथे झाले. आपल्या शिक्षणाचा खर्च त्यांनी जयपूर आकाशवाणी येथे कार्यक्रम करीत पूर्ण केला.
लहानपणापासूनच असरानी यांना अभिनयाचे वेड होते. १९६३ मध्ये अभिनेता होण्याची इच्छा मनात घेऊन असरानी मुंबईला आले. यावेळी त्यांची भेट किशोर साहू आणि ऋषिकेश मुखर्जी यांच्यासोबत झाली. त्यांनी असरानी यांना पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये अभिनायचे शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्यांनी १९६६ मध्ये आपले अभिनयाचे शिक्षण पूर्ण करून असरानी पुन्हा मुंबईत आले. त्यावेळी त्यांनी ‘हरे कांच’ या पहिल्या सिनेमात काम केले.
१९७१ मध्ये ‘मेरे अपने’ या सिनेमातून त्यांनी प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. परंतु १९७३ मध्ये आलेल्या अमिताभ बच्चन यांच्या ‘अभिमान’ या सिनेमाने असरानी यांना आपली आपली ओळख करून दिली. या सिनेमात त्यांनी अमिताभ यांच्या मित्राची भूमिका केली होती ज्यासाठी त्यांना फिल्म फेअरचा उत्कृष्ठ सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. दरम्यान, त्यांच्या अभिनयाला १९७५ हे साल एक वेगळे वळण देणारे ठरले. कारण याच वर्षी रमेश सिप्पी यांचा ‘शोले’ सिनेमा प्रदर्शित झाला आणि यातील असरानी यांची जेलरची भूमिका ही त्यांच्या आयुष्यातील मैलाचा दगड” ठरली. शोले चित्रपटातील ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ ही भूमिका आणि चुपके चुपके मधील प्रशांत किशोर श्रीवास्तव ही भूमिका खूप गाजली. यानंतर त्यांनी अनेक सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. तसेच उडान, सलाम मेम साब, चला मुरारी हिरो बनने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.
कोशिश आणि तेरी मेहरबानी या चित्रपटात त्यांनी गाणेही म्हटले आहे. असरानी यांना दोन वेळा सर्वश्रेष्ठ विनोदी अभिनेत्याचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत २५ सिनेमे केले तर महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत सर्वात जास्त सिनेमात काम केले आहे. आपल्या करिअरमध्ये असरानी यांनी तब्बल ४०० सिनेमात काम केले आहे. ते आजही तेवढ्याच जोशाने आजच्या पिढीसोबत अभिनय करताना दिसतात. ‘फॅमिली ४२०’ या मराठी चित्रपटात सुद्धा असरानी यांनी काम केले आहे. २००४ साली लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेसकडून उभे राहिले होते. मात्र ते राजकारणात अधिक काळ राहिले नाहीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट