मराठी भाषा ज्यांच्या मुखातून ऐकावी आणि ज्यांच्या लेखणीतून कागदावर उतरलेली वाचावी अशी माझ्या यादीत फार थोडी ” लेखकू ” मंडळी आहेत –
विठ्ठलपंतांचे चिरंजीव ज्ञानोबा माउली , पानवलकर , दुसरे कुळकर्णी (जी .ए .), तेंडूलकर ,आरती प्रभू आणि ग्रेस ! यांची मराठी काहीतरी वेगळीच आहे- इतके अनवट मराठी शब्द यांच्या पदरी आहेत की थक्क व्हायला होतं.
ग्रेस यांच्या कवितावाचनाची एक CD मी काही वर्षांपूर्वी विकत आणली आणि हे व्यक्तिमत्व माझ्यावर प्रभाव टाकून गेले. सो कॉल्ड “दुर्बोधतेचा “शिक्का त्यांच्यावर मारून मराठीजन मोकळे झाले असले तरी ही व्यक्ती मराठी शब्दांना ज्या अलौकिक उंचीवर नेऊन ठेवते त्याचे विस्मयकारक अनुभव मी अनेकवेळा घेतले. “निवडुंग “सारख्या चित्रपटातून हृदयनाथांनी त्यांच्या शब्दांना श्रवणीय करून घराघरात पोहोचविले आणि माझ्यासारख्यांना ते आवाक्यात आल्यासारखे वाटले. पण कुतूहल कायम वाटत राहिले. १९९५ साली नागपूरला एका परिषदेसाठी गेलो असता तीन अजेंडे मनात ठेवून गेलो होतो – सुरेश भट , माग्रसचे सुधीर भाऊ आणि ग्रेस यांना भेटण्याचे ! पैकी पहिले दोन हाती आले -मनसोक्त भेटलो /गप्पा झाल्या. ग्रेस मात्र भेटले नाही.
माणूस “फुकट ” पण “स्वस्त “नाही या कॅटॅगरीतला !
त्यासाठी २००१ साल उजाडावे लागले. ग्रेस त्यांच्या कन्येकडे मुलुंडला आले होते. मी त्यावेळी सियाट मध्ये होतो. मित्र – श्रीयुत अनिल कुसूरकर यांचा सांगावा आला – “ग्रेस मुंबईत आहेत, चला भेटायला जाउ या. ” मी एका पायावर तयार !
त्यांच्या कन्येच्या घरी गेलो -पहिल्या भेटीचे दडपण होतेच. थोडया परिचयात्मक गप्पा झाल्या, पण तरीही औपचारिकपण जात नव्हते. कुसूरकरांनी टूम काढली – “चला बाहेर जेवायला जाउ या .” सगळ्यांची एक प्रकारे सुटका झाली.
मुलुंड स्टेशन जवळच्या एका हॉटेलमध्ये आम्ही जेवायला गेलो. आता ग्रेस खुलले. हळुवार आवाज पण त्यातही खर्जाची नजाकत ! खूप आठवणी ,प्रसंगोपात्त सुचलेल्या कविता, शिक्षकी पेशातील सहकाऱ्यांविषयी आत्मीयतेने होणारे उल्लेख, काही खोलवर दुखावणारे सल पण त्याचे तटस्थ उल्लेख ! आम्हीही किंचित साहित्यिक, त्यामुळे आमचे इवलाले अनुभव बिनदिक्कत त्यांच्याशी शेअर करत होतो. सारेजण जेवण विसरून मॆफिलीत गुंग. साधारण अडीच तास खुललेले ग्रेस आणि आम्ही श्रोते ! बरेच खुलासे झाले, काही उत्तरे मिळाली, काही घटनांवरील पडदे दूर झाले. एकच भेट पण अभिजात !
नंतर भेटीचा योग नव्हता आणि खरं सांगू – गरजही वाटली नाही.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply