आज सकाळी नाभिकाकडे (Hair Cutting Saloon) डोक्यावरचे ओझे कमी करण्यासाठी गेलो होतो. नेहेमीचा नाभिक, नेहेमीचे माझे वाढणारे केस आणि नेहेमीचा मी ! पण आज त्याच्याकडे (बहुधा)नवा कारागीर (हा त्यांचा आवडता शब्द असतो) असावा. उत्साहाच्या भरात बागडत,मला इंप्रेस करण्यासाठी असावे कदाचित, तो हातातील कैचीइतकाच जिभेनेही कार्य करीत होता. असं करा,ते चांगलं दिसेल, हा नवीन कट आलाय वगैरे मार्केटिंग करीत होता. मी मुळातच माझ्या लुक्स (बाय द वे -त्या केशकर्तनालयाचे नांवही “लुक्स” असेच आहे) बाबत प्रचंड उदासीन आहे आणि “ठेविले अनंते “या मनोवृत्तीचा (दिसण्याच्या बाबतीत तरी) असल्याने तो हिरमुसला होईपर्यंत मी गप्प राहिलो आणि त्याला बजावले- ” सांगितलंय तेवढं करा.” तो गप्प झाला. कटींग झाल्यावर तो नव्या दमाने ” फेशिअल, ग्लो ” वगैरे वगैरे अधिकच्या खर्चिक सेवांबद्दल सशुल्क ऑफर्स सांगू लागला.
मी त्याला शांतपणे म्हणालो- ” बाबारे, डोकं माझं, त्यावरील केस माझे, (बरेवाईट)लुक्स माझे ! यारुपासह पुढील एक-दोन महिने मला वावरायचे आहे. मी स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतो. त्यांवर कोणी अतिक्रमण केलेले मला चालत नाही.”
त्याने उत्साह आवरता घेतला आणि कसेबसे हातातील काम संपविले.
काही वर्षांपूर्वी माझ्या घराचे रंगकाम सुरु होते. मी माझ्या पसंतीची रंगसंगती सुचविली होती. आर्किटेक्ट महोदय त्यांत ढवळाढवळ करीत होते आणि उगाचच रंगांच्या सूचना करीत होता. शेडकार्ड माझ्यासमोर फिरवत तो इकडून तिकडे फिरत होता.
मी त्याला शांतपणे म्हणालो- ” बाबारे, घर माझं, त्याच्या भिंती माझ्या, रोज मी येथे चोवीस तास राहणार त्यामुळे या भिंती,त्यावरचे रंग सतत माझ्या नजरेसमोर असणार. माझ्या घरी येणाऱ्या मंडळींना बघता क्षणी हे माझं घर आहे, हे माझ्या आवडीनुसार सजलंय असं जाणवायला हवं.”
“साहेब, पण aesthetics चा विचार करा नं ! रंगांचं एक शास्त्र असतं, काहींचं एकमेकांशी जुळतं, काही एकमेकांशी फटकून वागतात.”
मी त्यांना मध्येच तोडून म्हणालो- ” हे सगळं मी वर्गात आणि प्रशिक्षणांच्या दरम्यान सांगत असतो. मला पाठ आहे सारं ! पण मी सांगतो तसं करा.”
Leave a Reply