भारतीय सर्कस ही युरोप-अमेरिकेच्या तुलनेत काहीशी उशिरा सुरू झाली.मराठी उद्योजक आणि आशियातील पहिले भारतीय सर्कसचे जनक होते विष्णुपंत मोरेश्वर छत्रे !
छत्रे घराणे मूळचे बसणीचे. हे छोटेसे खेडेगाव गणपतीपुळे देवस्थानापासून सात-आठ किमी अंतरावर आहे. विष्णुपंतांचे वडील संस्थानी चाकरी करीत. त्यानिमित्त फिरत असताना, त्यांच्या मातोश्री व पत्नी, मुलेबाळे अंकलखोप येथे रहात असत. सांगली जिल्ह्यातील तासगावजवळ हे गाव आहे. इ.स. १८४० मध्ये विष्णुपंत छत्रे यांचा जन्म येथे झाला.
विष्णुपंत शाळेत फारसे रमले नाहीत. सवंगड्यांबरोबर हुंदडण्यात आणि कुत्री, माकडे, ससे, कबुतरे यांच्यात ते रमून जात. १६व्या वर्षी त्यांचे लग्न झाले. जमखिंडीकर पटवर्धन संस्थानिकांच्या घोड्यांच्या पागेत, घोड्यावर स्वार होऊन घोडदौड करायला ते शिकले. पाठोपाठ रामदुर्ग संस्थानात चीफसाहेब श्रीमंत भावे यांच्या आश्रयाखाली ते चाबुकस्वार म्हणून नेमले गेले. मात्र, तेथे ते दोन वर्षेच राहिले. दररोजच्या कसरतीमुळे काटक व पिळदार बनलेली शरीरयष्टी, घौडदौडीतील चपळाई आणि धाडस करण्याची वृत्ती त्यांना स्वस्थ बसू देईना. शास्त्रीय संगीताचेही त्यांना विलक्षण आकर्षण होते. त्यामुळे नशीब आजमावयाला ते ग्वाल्हेर संस्थानाकडे निघाले. तेथे श्रीमंत बाबासाहेब आपटे हे घोडी शिकवून तयार करण्याच्या कामात वाकबगार होते, तर नावाजलेले गायक हदद खाँ तेथेच दरबारी होते. आपली दोन्ही स्वप्ने पूर्ण होतील; म्हणून विष्णुपंत ग्वाल्हेरला निघाले. पैशाचे पाठबळ नव्हते. जेमतेम जळगावपर्यंत त्यांनी रेल्वेने प्रवास केला. पैसे संपले. मग माधुकरी मागत ते चक्क पायी काही महिन्यांनी ग्वाल्हेरला पोहोचले.
श्रीमंत बाबासाहेब आपटे यांचे व विष्णुपंतांचे गुरु-शिष्याचे नाते जडले. घोड्यांच्या कसरतीत त्यांनी अथक मेहनत घेऊन प्रावीण्य मिळवले. अनेक अवघड कसरती ते लीलया करू लागले. सुमारे ८ ते १० वर्षांच्या या कालावधीत श्रीमंत बाबासाहेब आपटे यांचे ते पट्टशिष्य बनले आणि महाराष्ट्रात परतले, ते ‘अश्वविद्या पारंगत’ म्हणूनच! इंदूर, विंचूर, कुरुंदवाड, जव्हार अशा अनेक संस्थानांत ते घोड्यांना चाल आणि कवायतीचे शिक्षण देऊ लागले. त्यांची आर्थिक स्थितीही सुधारली. अनेक संस्थानिकांच्या गळ्यातील ते ताईत बनले.
याच सुमारास मुंबईत बोरीबंदरसमोर चर्नी विल्सन या इंग्रज कलाकाराने सुरू केलेली ‘हर्मिस्टन सर्कस’ सुरू होती. भारतात आलेली ही कदाचित पहिलीच सर्कस होती. चित्रपट, टीव्ही नसणाऱ्या युगात सर्कसला खूप गर्दी व्हायची. साऱ्या इलाख्यातून लोक यायचे. जव्हार आणि कुरुंदवाडचे संस्थानिक, त्यांचे कुटुंबीयही दरमजल करीत मुंबईत सर्कस बघायला आले. सोबत विष्णुपंत छत्रेही होते. या सर्कसचा शो सुरू झाला. सगळेजण रमून गेले होते. घोड्यांच्या कसरती अतिशय प्रेक्षणीय होत्या. सर्कस शो संपल्यानंतर, झालेल्या गप्पांत चर्नी विल्सन काहीशा आढ्यतेनेच म्हणाले, की घोड्यांच्या अशा कसरती हे आमचे वैशिष्ट्य आहे. त्या युरोपियन साहेबाने,’या एतद्देशीय भारतीय काळ्या लोकांना हे सर्कस काढणे, खेळ करणे कधीच शक्य होणार नाही!!’ असे उद्गार काढले!. हे ऐकताच विष्णुपंत छत्र्यांमधील अस्सल भारतीय जागा झाला. कुरुंदवाडच्या संस्थानिकांनी त्याला प्रोत्साहन दिले आणि त्यातूनच भारतीय सर्कसचा पाया रचला जाऊ लागला. विष्णुपंत छत्र्यांनी तरुण कलाकार आणि तेजदार घोडे घेऊन कुरुंदवाड येथे सर्कशीची तालीम सुरू केली आणि अवघ्या ८-१० महिन्यांत सर्कस मूर्त स्वरूपात आणली.
मुंबई प्रांताचे तेव्हाचे गव्हर्नर फर्ग्युसन हे कुरुंदवाडकरांकडे आले होते. त्यांच्यासमोर ‘खास अदाकारी’ म्हणून विष्णुपंत छत्र्यांच्या घोड्यांच्या कसरती सादर करण्यात आल्या. जेमतेम १० मिनिटे हे खेळ पाहण्यास वेळ देणाऱ्या गव्हर्नर फर्ग्युसनांना विष्णुपंत छत्र्यांच्या खेळांमुळे वेळेचे भानच राहिले नाही अन् ४५ मिनिटे ते हा शो बघत राहिले. विष्णुपंतांचे त्यांनी भरभरून कौतुक केले. यामुळे विष्णुपंतांची उमेद वाढली. त्यांच्या मित्रांनी आणि आश्रयदात्यांनी मुंबईत जाऊन शो करण्याचा आग्रह धरला आणि त्यातूनच नोव्हेंबर १८८२ मध्ये ‘ग्रँड इंडियन सर्कस’ ही विष्णुपंत छत्र्यांची सर्कस मुंबईच्या क्रॉस मैदानावर उभी राहिली. २६ नोव्हेंबर १८८२ मध्ये या सर्कसचा पहिला शो म्हणजे ‘भारतीय सर्कसचा जन्म’ होता.
मुंबईत बोरीबंदर येथे चर्नी विल्सनची ‘हर्मिस्टन सर्कस’ही चालूच होती. मात्र, छत्र्यांच्या ‘ग्रँड इंडियन सर्कस’ला तुफान प्रतिसाद मिळाला. खुद्द छत्र्यांच्या घोड्यांच्या कसरतींनी सारे अवाक् व्हायचे. यामुळेच हर्मिस्टन सर्कसपुढची गर्दी ओसरली आणि अखेरीस ती सर्कसच बंद पडली. हर्मिस्टन सर्कसचे तंबू, गॅलरी व इतर साहित्य छत्र्यांनी विकत घेतले; शिवाय त्या सर्कशीतील परदेशी कलाकारही आपल्या सर्कशीत कामाला ठेवून घेतले. छत्र्यांच्या या पहिल्या भारतीय सर्कसने नवा इतिहास घडवला होता. विष्णुपंत छत्रे यांच्या या पहिल्या भारतीय सर्कशीत पाश्चात्यांचे कसलेही अनुकरण नव्हते, तर स्वतंत्र अशा भारतीय बाण्याने ती उभी होती. देशभक्ती हा जणू तिचा आत्माच होता. या सर्कशीत एका खेळात एक तरुणी भारतमाता होऊन रथात बसून येई. तो रथ दोन सिंह ओढून आणत आणि रिंगणात आल्यावर ‘गणा’ नावाचा हत्ती त्या भारतमातारूपी तरुणीस व गणपतीस हार घालून पूजा करी. अशाप्रकारे छत्रे यांची सर्कस स्वातंत्र्यभावनेने प्रेरित होऊन काम करीत होती.
त्यानंतर ‘छत्रे सर्कस’ देशभर फिरत राहिली. नवनवीन प्रयोग, नवनवीन तंत्रांचा वापर करत राहिली. गॅसच्या बत्त्यांचा वापर करून त्यांचा शो सायंकाळीही व्हायचा. छत्र्यांनी ही सर्कस अधिक आकर्षक केली. पुढे कालौघात त्यांनी सर्कसची सारी धुरा त्यांचे बंधू काशिनाथपंत यांच्याकडे सोपवली व ते त्यांचे गायकीतील गुरूबंधू रहिमतखाँसाहेब यांच्याबरोबर देशाटनास निघून गेले. भारतीय सर्कसचा हा जनक स्वतःचे नाव अजरामर करून गेला.
या महान विष्णुपंतांचा एक दंडक होता. ज्या गांवांत सर्कशीचा खेळ होईल त्या गांवातील एका शिक्षण संस्थेला उदारहस्ते देणगी देऊनच खेळ सुरु होई!! अशा थोर व्यक्तिमत्वाला काय म्हणावे; सुरात श्रेष्ठ! स्वारात (घोड्यावर) श्रेष्ठ आणि दानातही श्रेष्ठ!! अशा ह्या दिव्य आत्म्याला मृत्यू आला माघ कृष्ण १२ मंगळवार शके १८२७ या दिवशी. भारतीय सर्कशीचा जनक अनंतात विलीन झाला!!
— श्री. काशिनाथपंत छत्रे.
— श्रुती तिवारी.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply