२६ जानेवारी हा भारताचा स्वातंत्र्यदिन. आनंदाचा दिवस. मात्र याच दिवशी भारत एका महान व्यक्तिमत्त्वाला मुकला. महान व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांची पुण्यतिथी आजच्या दिवशीच.
भारतीय व्यंगचित्रांची ओळख असलेल्या प्रत्येक जण रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांना आर.के. लक्ष्मण या नावानेच ओळखतो.
सुप्रसिद्ध लेखक आर.के. नारायण यांचे लहान भाऊ आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ व्यंगचित्रकार रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण म्हणजेच आर. के. लक्ष्मण यांचा जन्म २४ आक्टोबर १९२१ रोजी म्हैसूर येथे झाला. वडील म्हैसूर येथील शाळेत मुख्याध्यापक होते. वडिलांच्या शाळेसाठी अनेक नियतकालिके त्यांच्या घरी येत असत. ‘हार्पर्स’, ‘पंच’, ‘ऑन पेपर’, ‘बॉइज’, अॅ्टलांटिक’, अमेरिकन मर्क्युरी’, ‘द मेरी मॅगझिन’, स्ट्रॅन्ड मॅगझिन’, अशी मासिके त्यांना तिथे पहायला-वाचायला मिळत असत. लक्ष्मण यांना त्यांतील विविध विषयांवरील चित्रे पाहण्यात रस होता. तशी चित्रे आपणही काढून पाहावी असे त्यांना वाटू लागल्याने लक्ष्मण चित्रे काढू लागले. अगदी सुरुवातीच्या काळात लक्ष्मण यांची चित्रे स्थानिक वर्तमानपत्रातून छापून येऊ लागली. मुंबईमधील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथे शिकण्यासाठी मा.लक्ष्मण यांनी अर्ज केला होता, पण तेथे त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. मग आर.केंनी म्हैसूरच्या विद्यापीठातून बी.ए.ची पदवी संपादन केली. पुढे लक्ष्मण पदवीधर झाल्यावर नोकरी मिळविण्यासाठी दिल्लीला गेले. हिंदुस्थान टाइम्स या वृत्तपत्राने लक्ष्मण यांचे वय कमी असल्याचे कारण पुढे करून नोकरी नाकारली. मग काही काळ ब्लिट्झ मध्ये आणि नंतर फ्री प्रेस जर्नल मध्ये लक्ष्मण यांनी काम केले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे देखील तेथेच काम करीत असत. मात्र कम्युनिस्टांची टवाळी करायची नाही असा फ्री प्रेसच्या मालकांचा दंडक होता. म्हणून त्यांनी ‘फ्री प्रेस’ची नोकरी सोडली. त्यांनी १९५० पासून ‘टाइम्स ऑफ इंडिया’मधून व्यंगचित्रे काढायला सुरुवात केली. त्यानंतर अर्धशतकभर ते ‘टाइम्स ऑफ इंडिया’ मध्ये व्यंगचित्रे काढत राहिले. यू सेड इट नावाने त्यांनी फक्त व्यंगचित्र असलेले एक सदर सुरू केले. या व्यंगचित्रकाराने आपल्या मिश्कील, खुमासदार तर कधी बोच-या, उपरोधिक, धारधार टिप्पणीने समाजातील उणिवांवर, दोषांवर भाष्य केले. दैनिकाच्या मुखपृष्ठावर आजतागायत नियमितपणे प्रकाशित होत असलेले हे सदर लोकांना खूप आवडते. सुमारे ५० वर्षांहून अधिक काळ लोटला, पण त्यांचे व्यंगचित्र या दैनिकात नाही असे एकदाही घडलेले नाही. मा.लक्ष्मण यांनी देश-विदेशांतील थोरामोठ्यांची व्यंगचित्रे काढली आहेत. त्यांचे कॉमन मॅन नावाचे सर्वसामान्य माणसाचे व्यंगचित्र विशेषच म्हणावे लागेल. हा कॉमन मॅन जसा आधी होता तसाच आताही आहे – चौकड्याचा कोट, धोतर, टोपी असा त्याचा साधा पोषाख आहे. लक्ष्मण यांनी असंख्य व्यंगचित्रे काढली आहेत पण त्यांनी कधीही या माध्यमाच्या आडून कोणास दुखावले नाही किंवा कोणाच्या व्यंगावर चित्रे काढली नाहीत.
त्यांनी काढलेल्या व्यंगचित्रांमुळे सर्वसामान्य भारतीय माणूस ‘कॉमन मॅन’ देशभर आणि जगभर पोहोचला आहे. मा.लक्ष्मण यांचा कॉमन मॅन सगळ्यांना इतका आवडतो की त्याचा एक पूर्णाकृती पुतळाही बनविण्यात आला आहे. पुण्यातील सिम्बायोसिस संस्थेच्या मुख्य आवारात लक्ष्मण यांच्या ‘कॉमन मॅन’चा ९ फूट उंचीचा ब्राँझचा पुतळा उभारण्यात आला आहे. तसेच लक्ष्मण यांनी एशियन पेन्ट्स साठी काढलेले गट्टूचे चित्रही लोकप्रिय आहे. त्यांनी रेखाटलेल्या व्यंगचित्रांची पुस्तके म्हणजे भारतीय समाजमनाचा एक ऐतिहासिक ठेवाच आहे. त्यांची अनेक पुस्तके आजही हातोहात खपतात. फक्त व्यंगचित्रकार इतकीच त्यांची ओळख नाही. निबंध, प्रवासवर्णने आणि लघुकथा या प्रांतातही त्यांनी मुशाफिरी केली आहे. त्यांना देशविदेशी पुरस्कार मिळाले आहेत. जर्नालिझम, लिटरेचर अँड क्रिएटिव्ह कम्युनिकेशन आर्टबद्दल त्यांना रॅमन मॅगसेसे पुरस्काराने १९८४ मध्ये गौरवण्यात आले.
आर.के. लक्ष्मण यांना पद्मविभुषण, पद्मभुषण, आणि अन्य राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्वाचे पुरस्कार मिळाले. मा.आर.के. लक्ष्मण यांचे निधन २६ जानेवारी २०१५ रोजी झाले. आपल्या समूहाकडून मा.आर.के. लक्ष्मण यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट
मा.आर.के. लक्ष्मण यांची प्रकाशित पुस्तके
आयडल अवर्स आर.के. लक्ष्मण.: दि अनकॉमन मॅन : कलेक्शन ऑफ वर्क्स फ्रॉम १९४८ तो २००८
द इलोक्वेन्ट ब्रश (व्यंगचित्रसंग्रह) अ डोज ऑफ लाफ्टर( विनोदी अर्कचित्रे) दि डिस्टॉर्टेड मिरर (कथा, निबंध, प्रवासवर्णने -२००३)फिफ्टी इयर्स ऑफ इन्डिपेन्डन्स थ्रू दि आईज ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रह) बेस्ट ऑफ लक्ष्मण (व्यंगचित्रसंग्रहांची मालिका, ४ पुस्तके) द मेसेंजर (कादंबरी -१९९३)अ व्होट ऑफ लाफ्टर (विनोदी अर्कचित्रे) द हॉटेल रिव्हिएरा (कादंबरी -१९८९)
मा.आर.के. लक्ष्मण यांनी The Tunnel of Time : An Autobiography या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचा ’लक्ष्मणरेषा’ नावाचा मराठी अनुवाद अशोक जैन यांनी केला आहे.
Leave a Reply