‘गुडी पाडवा’. हिन्दू नववर्षाचा प्रथम दिवस. ‘गुढी पाडवा’ या शब्दातला ‘पाडवा’ हा शब्द, तिथी ‘प्रतिपदा’चं अपभ्रंशीत रुप आहे. ‘गुढी’ या शब्दाचा जन्म कसा झाला असावा याचा शोध घेताना काही मनोरंजक माहिती मिळत गेली. या शब्दाचा शोध सुरू केला तो श्री. कृ. पां. कुलकर्णी यांच्या ‘मराठी व्युत्पत्ती कोशा’पासून व त्याला जोड म्हणून ज्येष्ठ संशोधक श्री. दामोदर कोसंबीचं ‘पुराणकथा आणि वास्तवता’, लोकदैवतांचे अभ्यासक श्री. रां. चि. ढेरे यांची व लोकसंस्कृतीचे अभ्यासक श्री. द. ता. भोसले यांच्या विविध पुस्तकांतून संदर्भ मिळत गेले.
‘गुढी पाडवा’ हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. देशाच्या बहुतेक भागात चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा दिवस वेगवेगळ्या नावांनी व प्रकारांनी साजरा केला जातो. परंतू महाराष्ट्रात आपण जसा गुढी उभारून हा दिवस साजरा करतो, तसा इतर कुठे साजरा होत नसावा.
आपल्या अगदी शेजारी असलेल्या आंध्र प्रदेश आणि कर्नाटकात चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजऱ्या करण्यात येणाऱ्या सणाला ‘उगादी’ असे म्हणतात. हा शब्द उच्चारावरून तरी आपल्या ‘गुढी’चा अगदी सख्खा भाऊ वाटतो. ‘उगादी’ हा दाक्षिणात्य शब्द काही ठिकाणी ‘युगादी’ असाही लिहीला जातो व ह्या शब्दाची फोड शब्द ‘युग’ आणि ‘आदी’ अशी आहे. ‘युग’ म्हणजे काळ आणि ‘आदी’ म्हणजे सुरूवात (संस्कृत तज्ञानी कृपया अधिक खुलासा करावा). नविन काळाची अथवा नविन वर्षाची सुरूवात या अर्थाने ‘उगादी’ अथवा ‘युगादी’ शब्द आला असावा असा तर्क करता येतो. आपण वापरतो तो ‘गुढी’ शब्दही बहुदा ‘युगादी’ या शब्दाचाच अपभ्रंश असावा असं मानण्यास जागा आहे. नाहीतरी आपल्या मराठी भाषेवर तुळू, तेलुगू वा कन्नड अशा दाळिणात्य भाषांचा मोठा प्रभाव आहे हे लक्षात घेतल्यास ‘गुढी’ हा शब्द ‘युगादी’ शब्दाचाच अंश असावा याची खातरी पटते.
हिंदूंच्या ‘शालिवाहन’ नामक राजाने ‘शक’ नामक शत्रूवर याच दिवशी विजय मिळवला. या विजयाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो ही या दिवसाशी निगडीत शालिवाहन राजाची कथा बहुतेकांना माहित आहे. म्हणून याची इथे उजळणी करत नाही.
याच दिवसापासून हिंदूंचं ‘शालिवाहन शक’ हे नविन वर्ष सुरू होत. हिंदू पंचांगाची सुरूवात याच दिवसापासून होते. इंग्रजी दि. २८ मार्च २०१७ पासून सुरू होणार हिन्दू वर्ष ‘शालिवाहन शक १९३९’ हे अाहे.
‘गुढी’ वा ‘गुडी’ हा शब्द कानडी भाषेतही सापडतो. कानडी भाषेतील त्याचा अर्थ ध्वज, बावटा, निशाण असाही असला तरी या शब्दाचा मुख्य अर्थ ‘मंदीर’ असा आहे. आपण उभारतो ती गुढी बांबू, वस्त्र, गडू, फुलमाळा यामुळे तीचा भास मंदीरासारखा भासला असावा व म्हणून तीला ‘गुढी’ म्हटलं गेलं असावं असं श्री. कृ. पां. कुलकर्णी यांनी त्याच्या व्युत्पत्तीकोशात म्हटलंय.
हिंदीत आढळणा-या ‘गुड्डा-गुड्डी’ या बाहुला आणि बाहुली साठी उपयोगात आणल्या जाणा-या शब्दांच मुळ आपल्या कानडी ‘गुढी’ या शब्दातचं असावं असंही अनेक कोशकार म्हणतात. ‘गुढी’ या शब्दाचा एक अर्थ ‘निशाण’ आहे हे लक्षात घेतलं, तर तसं खरंच असाव कारण ‘गुड्डा’ किंवा ‘गुड्डी’ म्हणजे लहान बाळाची किंवा बाळाचा प्रतिकृती म्हणजे ‘निशाण’च नव्हे काय?
ते काही असलं तरी मला मात्र ‘गुढी पाडवा’ ह्या शब्दाचा जन्म दाक्षिणात्य ‘उगादी’ किंवा ‘युगादी’ शब्दाच्या पोटीच झाला असावा असं वाटतं.
बाकी व्हाट्सअॅपवर येणाऱ्या खोडसाळ व समाजात तेढ पसरवू पाहाणाऱ्या मेसेजेसवर अजिबात विश्वास ठेवू नका. आपले सर्व सण समारंभ पावित्र्याशी जोडले गेलेले आहेत.
तुम्हा सर्वांना साडेतीन मुहुर्तापैकी एक व अख्खा मुहूर्त असलेल्या ‘गुढी पाडव्या’च्या शुभेच्छा..! (हा बाकी विनोदच. जो दिवसच अख्खा ‘शुभ’ असतो, त्याच्या शुभेच्छा का द्याव्यात? शुभेच्छांच्या ऐवजी दुसरा शब्द शोधायला हवा..!!)
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply