सफेद वालावर जलरंगाने रंगविलेला श्रीगणेश
भारताच्या उत्तर सीमेजवळ असलेल्या चीनमध्ये श्री गणेश कसा गेला हे एक न सुटणारे कोडेच होय. चीन, तुर्कस्थान, नेपाळ किंवा तिबेट मधून हा प्रवास झाला असला तरी चीन मधील श्री गणेशाचे व येथील मूर्तीत विलक्षण फरक आढळतो. विनायक हा एक प्रकार व दुसरा कात्रीतेन असे दोन प्रकार जपान प्रमाणेच येथे आढळतात. भारताला माहित नसलेला कात्रीतेन प्रकार (द्वि गणेश) चीन व जपान शिवाय इतरत्र आढळत नाही.
तुंग हॉन मधील लेण्यांच्या भिंतीवर कोरलेली मूर्ती तर कु हिस्वेन येथील खडकातून बनविलेली मूर्ती हे चीन मधील अतीप्राचीन मूर्ती होय. अजंठा लेण्यातील कला ही ह्याच शकतील आहे असे आढळून येते.
५ व्या शकाच्या आरंभी श्री गणेशाची उपासना येथे होत असावी असे वाटते. गुढ विद्येच्या शोधात निघालेल्या बौद्ध भिक्षुकांनी ही मूर्ती येथे आणली असावी किंवा भारतीय पंडितांनी ही प्रथा येथे सूरु केली असावी. चीनी भिक्षुक चुगणशी ह्यांनी इ.स. ७७४ च्या पुस्तकात ह्या गणेशाचे तपशीलवार वर्णन आढळते. मूर्ती कशी बनवावी, तिचे पूजन कसे करावे, प्रार्थना कशी करावी त्यामुळे कोणते यश प्राप्त होईल ह्याची संपूर्ण माहिती सांगितली आहे. ह्या पूजनाला ११ व्या शतकात चीनच्या राजाने बंदी घाल्याने हा प्रकार बंद झाला.
श्री गणेश मूर्तीची बसण्याची पद्धत बौद्ध प्रकारा प्रमाणे पाय एकमेकाला छेदून गेलेले, हातात, दंडात व गळ्यात दागिने असताना शिरावर मुकुट नाही तर बौद्ध भिक्षुकाप्रमाणे किंवा भारतीय पंडितांप्रमाणे त्याची ठेवण आहे. कारण मागे जो वलय दाखविला आहे तो पर्शिय पद्धतीप्रमाणे आहे. घट्ट पितांबर नसून तो चुणीदार आहे तर अंगात चीन देवते प्रमाणे शेला आहे. उजव्या हातात त्रिशूळाचा वेगळा प्रकार तर डाव्या हातात मुळा आहे असे वाटते पण तो शंख सुद्धा असावा असे वाटते.
।। ॐ गं गणपतये नम: ।।
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply