नवीन लेखन...

गुहा ते घर

व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला प्रा. शमिका सरवणकर यांचा लेख


ये ये “तेरा घर ये मेरा घर,
किसी को देखना हो गर
तो पहले आ के माँग ले,
मेरी नज़र तेरी नज़र

या गाण्याच्या ओळी अनेकांच्या मनाला भावणाऱ्या आहेत. घर कसेही का असेना, ती झोपडी असो वा बंगला, की अजून काही…; त्या घरात वास्तव्यास असणाऱ्या माणसासाठी ते घर विशेषच असते. कोणतेही घर असो, ते अनेक गोष्टींचा निश्चितच एक संचय असते. त्यात भाव-भावना, इच्छा-आकांक्षा, महत्त्वाकांक्षा या सारख्या संमिश्र भावना आणि क्रिया प्रतिक्रियांचा समावेश होतो. किंबहुना त्यांची पाळेमुळे याच घराच्या अंगणात बहरास आलेली असतात म्हणूनच घर हे मानवी स्मृतींचे अविभाज्य अंग मानले जाते. घराच्या चार भिंती या केवळ माणसाला छतच देत नाहीत तर त्याच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचे बळही देतात. त्यामुळेच, रिकामे घरही तिथे राहून गेलेल्या माणसांच्या असंख्य गुजगोष्टी सांगते, प्रश्न इतकाच असतो की आपण त्या गोष्टी ऐकण्यास किती समर्थ आहोत. म्हणूनच मानवी उत्क्रांतीतील घरांचा इतिहास समजून घ्यायचा झाल्यास माणसाच्या पहिल्या घरापासून सुरुवात करावी लागते. मानवी इतिहासाचा मागोवा घेतला की, एक महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे काळ कोणताही असो अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा कधीही न बदलणाऱ्या आहेत, परंतु त्यांचे प्रारूप मात्र सतत बदलणारे आहे. याच मूलभूत गरजांमधील एक गरज म्हणजे निवारा, त्यामुळे घर या वास्तूला मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार, पुरातत्वज्ञ या सर्वांच्या दृष्टिकोनातून अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.

मानवी इतिहासाची सुरुवात ही अश्मयुगापासून होते. अश्मयुगीन माणूस हा मुक्त होता. एखाद्या वन्य प्राण्याप्रमाणे स्वच्छंदी आयुष्य व्यतीत करत होता.

मानवाच्या या भटकंतीच्या काळात निसर्ग हेच मानवाचे घर होते. परंतु गरज ही शोधाची जननी असते व याच गरजेपोटी भटक्या मनुष्याला संरक्षणासाठी निवाऱ्याची गरज भासली, म्हणूनच माणसाने प्रगतीच्या प्रारंभिक टप्प्यात नैसर्गिकरित्या तयार झालेल्या गुहांचा वापर आपले निवासस्थान म्हणून केला. सर्वसाधारणपणे आपण गुहा हा शब्द ऐकला की डोळ्यासमोर येतात ते वाघ, सिंह हे वन्य प्राणी माणूस हा देखील एक प्राणीच आहे. म्हणून त्यानेही याच गुहांचा वापर घर म्हणून केला.

अश्मयुगीन मानवाने गुहा या वास्तूचा घर म्हणून स्वीकार करत असताना सभोवतालच्या निसर्गाला प्राधान्य दिल्याचे लक्षात येते. आपण जेथे राहतो ती जागा आपल्याला आपल्या आवडीनिवडीनुसार ठेवायला आवडते. असेच काहीसे अश्मयुगातही दिसून येते. माणसाचे मन हे मुळातच कलात्मक असते, घराच्या भिंती दगडाच्या असल्या तरी त्यांना घरपण देण्याचे काम तत्कालीन मानवाने केले. आपल्या कल्पक बुद्धीने व निसर्गाच्या साथीने जे शब्दात व्यक्त करता येत नाहीत ते चित्रांच्या रूपाने दगडी गुहांच्या भिंतींवर चितारले. ही चित्रे निर्जीव असली तरी सजीव मनुष्याच्या भावविश्वातील अनेक रहस्य ती आपल्याला आजही सांगतात. म्हणूनच या दगडावरील चित्रांचे वर्णन करण्यासाठी ‘साँसों के तार पर, धड़कन की ताल पर, दिल की पुकार का, रंग भरे प्यार का, गीत गाया पत्थरों ने’ या गाण्याच्या ओळी समर्पक वाटतात.

या दगडी गुहेचे आपल्या कलात्मकतेने माणसाने घरात रूपांतर केले. याचे सर्वोत्तम उदाहरण मध्य प्रदेशातील भीमबेटका येथील गुहांमध्ये पहावयास मिळते. येथील मानवाने या गुहांच्या सुशोभीकरणासाठी व त्यातून अभिव्यक्त होण्याकरता चित्रांचा वापर केला. आपल्या आयुष्यात घडणाच्या रोजच्या घटनांचे चित्रण त्याने गुहांच्या भिंतींवर केले. यासाठी निसर्गात उपलब्ध असणाऱ्या माती तसेच पाने – फुले या नैसर्गिक घटकांपासून रंग तयार केले. आपल्या सुदैवाने आजही आपण ही चित्रं पाहू शकतो.

दगडी गुहेला घरपण देण्याच्या मानवाने पुढे जाऊन निसर्गाने दिलेल्या वस्तूचा त्याग करून आपल्या बौद्धिक सामर्थ्याच्या बळावर विटा माती यांच्या साहाय्याने एक स्वतंत्र वास्तू उभी केली. व त्याचेच प्रगत स्वरूप आपण आजच्या गृहरचनेत पाहत आहोत.

इथे एक महत्त्वपूर्ण गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे ज्या क्षणापासून मनुष्य या पृथ्वीतलावर वावरू लागला त्या क्षणापासून निसर्गाने त्याला भरभरून दिले. सभोवताली निसर्गात उपलब्ध असलेलेल्या गोष्टींचा वापर करूनच मनुष्य या जगात आजतागायत तग धरू शकला हे विसरता येणार नाही. माणसाने आज भरपूर प्रगती केली आहे. कमी वेळेत जग पादाक्रांत करू शकेल इतके सामर्थ्य कमावले आहे. भिन्न टोकावरील माणसे एकमेकांच्या जवळ आली आहेत. त्यामुळे विचारांची व संस्कृतीची देवाण घेवाण होऊ लागली. अनेक अर्थाने ही देवाण घेवाण फायद्याची होती व आहे. परंतु प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे जिथे फायदे तिथे तोटेही सहन करावे लागतातच. मानवी परिश्रमाने जग तर जवळ आले परंतु आकर्षण व मोह यांच्या साथीने डोळ्यांना सुखावणाऱ्या सुखावणाऱ्या अनेक गोष्टींची देवाण घेवाण परिणामाचा विचार न करता झाली. ही देवाण घेवाण घराच्या बाबतीतही दिसून येते, भारतीय संस्कृतीतील घरांचा त्याग करून आपण पाश्चिमात्य संस्कृतीतील गृहरचनेचा स्वीकार केला परंतु हा स्वीकार केवळ बाह्य सौंदर्यावर अवलंबून होता त्यात आपला निसर्ग, भूगोल, राहणीमान, संस्कृती यांना दुय्यम ठरविण्यात आले. परंपरा या अनुभवातून घडत असतात, भारतातील गृह रचनेची परंपरा ही देखील याच अनुभवाअंती अस्तित्वात आली आहे. ज्यात निसर्ग, भूगोल, राहणीमान या सगळ्यांचा विचार येतो. भारतासारख्या देशात भरपूर सूर्यप्रकाश व त्यामुळेच उष्णताही असते. अलीकडे आपण विदेशासारख्या बाहेरून काचबंद असलेल्या इमारती तयार करत आहोत आणि असलेली उष्णता वाढवून वातानुकूलन यंत्रणेचा वापर करून विजेचा भार वाढवत आहोत. अनेक इमारतीच्या रचनेत लोखंड, स्टील यांचा वापर वाढला आहे. हे सारे उष्णता वाढविणारे आहेत व दुसऱ्या बाजूला या आधुनिकतेचा स्वीकार करताना वृक्ष तोड करून प्राणवायूचा निर्माण तुटवडा करून निसर्गाला हानी पोहचवत आहोत. प्राचीन काळी आपल्या पूर्वजांनी गृहनिर्मितीमध्ये मातीच्या विटा, शेण, गवत, नारळाच्या झावळ्या, दगडाचा वापर केला जायचा. भारतीय धाटणीची ही घरं उन्हाळ्यात गार तर हिवाळ्यात उबदार राहावी अशा पद्धतीने तयार केली जात होती. पण आताचा समाज दिखाव्याला भुललेला आहे.

जर प्राचीन मानवाला निसर्गाचे महत्त्व कळू शकते तर आपल्याला का नाही? अश्मयुगीन काळानंतर मानवाने आपल्या वापरात अनेक घरे आणली. भारतापुरता विचार करावयाचा झाला तर त्यात प्रांत-भौगोलिकदृष्ट्या या गृहरचनेत विविधता आढळते. त्या त्या प्रांतातील निसर्गाला अनुसरून गृहरचना निर्माण झाली. परंतु हेच निसर्गाशी असलेलं सख्य आज मात्र आपण गमावून बसलेलो आहोत.

( पुरातत्त्व विषयाच्या व्याख्याता. प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व विषयात एम. ए पदव्युत्तर पदवी. भारतीय पुरातत्त्व खात्याच्या पदव्युत्तर पुरातत्त्वशास्त्र पदविका अभ्यासक्रमात सुवर्णपदक. सध्या डेक्कन महाविद्यालय पुणे संशोधन केंद्रातून पी एच डी करत आहे. विविध दैनिके, साप्ताहिके आणि नियतकालिकांतून तसेच संशोधन पत्रिकांमध्ये पुरातत्त्व व ऐतिहासिक विषयांवर संशोधनपर लेखन.)

(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी  २०२० च्या अंका मधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..