बचत आणि गुंतवणूक हे शब्द आपण प्रसारमाध्यमांमधून आणि आजूबाजूच्या
लोकांकडून नेहमीच ऐकत असतो . पैशांची बचत करणे आणि कुठेतरी पैसे गुंतवणे महत्त्वाचे आहे हे आपल्याला माहीत असते . पण योग्यप्रकारे आर्थिक नियोजन करण्यासाठी या शब्दांचा नेमका अर्थ समजावून घेणे व ते अंमलात आणणे महत्त्वाचे असते .
बचत म्हणजे काय , गुंतवणूक म्हणजे काय , वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करताना कुठली काळजी घ्यावी , या मार्गात कोणकोणते खाचखळगे असू शकतात व कोणती पथ्ये पाळावीत हे आपण आज पाहूया . बचत व गुंतवणूक यातील फरक काय असतो हे आपण प्रथम समजावून घेऊ .
बचत
समजा एखादी व्यक्ती महिन्याला ५०,००० रुपये कमावते व त्यातले ३५,००० रुपये कुटुंबाचा घरखर्च व इतर दैनंदिन गरजांसाठी प्रत्येक महिन्यात खर्च होतात . याचा अर्थ त्या व्यक्तीने महिन्याला १५,००० रुपयांची बचत केली असा होतो . सोप्या भाषेत सांगायचे तर कमावलेले पैसे खर्च न करता बाजूला काढून ठेवणे म्हणजे बचत .
दर महिन्याला बचत केलेले हे १५,००० रुपये सहसा आपण घरी न ठेवता बचत खात्यात , बँकेच्या मुदत ठेवीत ( FD ) अथवा अल्पकालीन गुंतवणुकीसाठी असणाया म्युच्युअल फंड योजनांमध्ये ( Short Term Debt Funds ) ठेवतो . हे करण्यामागे प्रमुख उद्देश हा असतो की , ते पैसे सुरक्षित रहावेत व हवे तेव्हा वापरायला मिळावेत . पैशांची सुरक्षितता व हवे तेव्हा पैसे काढता येणे हे बचतीत महत्त्वाचे असते . त्यावर किती व्याज मिळते हे महत्त्वाचे असतेच , पण सर्वाधिक महत्त्व सुरक्षितता व हवे तेव्हा उपलब्ध असण्याला असते.
गुंतवणूक
जर दर महिन्याला वरीलप्रमाणे १५,००० रुपयांची बचत केली तर आपली बचत साहजिकच हळूहळू वाढत जाते . या रकमेतील काही भाग आपल्याला अचानक उद्भवणाऱ्या खर्चासाठी लागू शकतो . त्यामुळे काही रक्कम कायमच वर उल्लेख केलेल्या आल्पकालीन बचत योजनांमध्ये ठेवावी लागते . पण आपल्या सर्वच आर्थिक गरजा पुढील काही महिन्यांमध्ये किंवा १-२ वर्षांमध्ये उद्भवणाऱ्या नसतात . उदाहरणार्थ निवृत्तीची तरतूद , मुलांचे उच्च शिक्षण , लग्नखर्च या सर्व खर्चांची तरतूद करण्यासाठी वय कमी असताना अनेक वर्षांचा अवधी असतो . याचबरोबर महागाईमुळे वरील सर्व खर्चांसाठी मोठी रक्कम लागते . विशेषतः मुलांचे उच्च शिक्षण व स्वतःच्या निवृत्तीची तरतूद यासाठी सतत वाढणाऱ्या महागाईमुळे खूप मोठी रक्कम जमवावी लागते . जिथे मोठी रक्कम उभारावी लागणार आहे अशा भविष्यकालीन गरजांसाठी कमी व्याज देणारी बचत पुरेशी नसते . त्यासाठी जिथे पैशाची चांगली वृद्धी होईल अशा
ठिकाणी गुंतवणूक करावी लागते . नेमके सांगायचे झाले तर महागाई ज्या वेगाने वाढते त्यापेक्षा अधिक वेगाने आपल्या गुंतवणुकीचे मूल्य वाढणे आवश्यक असते . यासाठी आपल्या बचतीतला काही भाग दीर्घकालीन गुंतवणुकीकडे वळवणे आवश्यक असते .
गुंतवणूक करणे म्हणजे जमिनीत आंब्याचे बी पेरण्यासारखे असते . बी पेरून त्याची योग्य निगराणी करावी लागते , अनेक वर्षे वाट पाहावी लागते , तेव्हा त्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर होते . हा वृक्ष नेमका किती मोठा होईल व किती वर्षांनी आंबे येतील हे आधीच अचूक सांगता येत नाही . पण वाट पाहण्याची क्षमता व चिकाटी असेल तर भरपूर फळे मिळण्याची खूप शक्यता असते .
जमीन / घर ( रिअल इस्टेट ) , शेअर बाजारात ज्यांची खरेदी / विक्री केली जाते अशा कंपन्यांचे शेयर्स व या शेअर्समध्ये पैसे गुंतवणारे म्युच्युअल फंड या गोष्टींमध्ये तज्ज्ञाच्या सल्ल्याने केलेली गुंतवणूक भविष्यात चांगला परतावा देणारी ठरू शकते .
सोने हा देखील एक चांगला गुंतवणूक पर्याय आहे . आपल्या गुंतवणुकीच्या ५ ते १० टक्के गुंतवणूक सोन्यात करायला हरकत नाही . जेव्हा जागतिक मंदीमुळे , युद्धजन्य परिस्थितीमुळे किंवा अन्य जागतिक संकटांमुळे शेअर बाजार आणि रिअल इस्टेट यांचे भाव पडत असतात , अशा वेळी सोन्यातील गुंतवणूक तारून नेते असा मागील अनेक दशकांचा अनुभव आहे .
दीर्घकालीन गुंतवणूक करताना पुढील तीन मुद्दे लक्षात ठेवावेत :
१ जमीन , घर अथवा चांगल्या कंपन्यांच्या शेयर्समध्ये केलेल्या गुंतवणुकीत दीर्घकाळात खूप चांगल्या वृद्धीची
(म्हणजे महागाईच्या दरापेक्षा अधिक वेगाने भाव वाढण्याची) अपेक्षा ठेवता येते .
२ शेअर्स , म्युच्युअल फंड अथवा रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीत , किती वर्षात पैशांची किती वृद्धी होईल ह्याचा निश्चित आकडा सांगता येणे कुणालाही शक्य नसते . जितका गुंतवणुकीचा अवधी अधिक , तेवढी चांगल्या परताव्याची शक्यता जास्त .
३ गुंतवणूक ही तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावी . चांगल्या कंपन्यांचे शेअर्स अनेक पटींनी नफा देऊन जाऊ शकतात , तसेच खराब कंपन्यांमध्ये गुंतवलेले आपले सर्व पैसे बुडूदेखील शकतात . तज्ज्ञांचा सल्ला , वाट बघण्याची तयारी व बाजाराच्या सतत होणाऱ्या चढ – उताराने विचलित न होणे महत्त्वाचे असते . इक्विटी म्युच्युअल फंडाच्या अनेक योजनांनी मागच्या २० २५ वर्षांमध्ये गुंतवणूकदारांना उत्तम नफा मिळवून दिला आहे . अशा योजनांमध्ये आपण तज्ज्ञांच्या मदतीने पैसे गुंतवू शकतो.
गुंतवणूकदारांची दिशाभूल होण्याची कारणे –
कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात . अन्यथा दिशाभूल होण्याची शक्यता असते . गुंतवणूकदारांची फसवणूक झालेली अनेक उदाहरणे आपण वृत्तपत्रात सतत वाचतो . दिशाभूल होण्याची काही प्रमुख कारणे व ते कसे टाळावे हे आपण बघूया :
१. अधिक व्याजाच्या योजनांमागे धावणे : कुठलीही गुंतवणूक करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी . जेव्हा एखाद्या योजनेत अधिक व्याजदर मिळेल असे सांगितले जाते , तेव्हा तिथे त्या प्रमाणात जोखीमही अधिक असण्याची दाट शक्यता असते . उदाहरण उदाहरण द्यायचे तर सहकारी पतसंस्थांमध्ये मुदत ठेवींवर राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा अधिक मिळत असलेला व्याजदर . याचा अर्थ असा नव्हे की , अशा ठिकाणी पैसे ठेवूच नयेत . पण आपण घेत असलेल्या जोखमीची जाणीव नक्की असावी व इथली गुंतवणूक मर्यादित ठेवावी .
२. पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवणाऱ्या योजना :
झटपट श्रीमंत होण्याच्या नादात भले भले लोक अशा योजनांच्या आहारी जातात . अशा योजनांना इंग्रजीत ‘ पॉन्झी स्कीम ‘ असे म्हणतात . सध्या बाजारात जो व्याजदर प्रचलित आहे , त्यापेक्षा खूप अधिक व्याजदराचे आमिष या योजनांमध्ये दाखवले जाते . त्यात अधिक पैशाच्या हव्यासापायी लोक मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवतात . सुरुवातीला काही महिने लोकांकडून आलेल्या पैशांतूनच नियमितपणे व्याज दिले जाते . त्यामुळे लोकांचा विश्वास बसतो व अधिक लोक या योजनेकडे आकर्षित होतात . अशा प्रकारे पैसे गोळा करून , एक दिवस हे भामटे गुंतवणूकदारांचे पैसे हडप करतात व पसार होतात . दुर्दैव असे आहे की , हे फसवणुकीचे प्रकार अनेक वर्षे चालू आहेत . पण काम न करता अधिक पैसे कमावण्याच्या हव्यासापोटी लाखो लोक दरवर्षी ह्याला बळी पडतात .
३. एजंटांकडून होणारी फसवणूक :
विमा कंपनी , ULIP कंपनी अथवा इतर कुठल्या कंपनीच्या एजंटनी चुकीची माहिती सांगून पॉलिसी विकण्यातून आपली फसवणूक होऊ शकते . स्वतःच्या तात्कालिक फायद्यासाठी कधी कधी लोकांची दिशाभूल केली जाते व त्या योजने / पॉलिसीबद्दल मोठी स्वप्ने दाखवली जातात . कुठल्याही योजनेत पैसे गुंतवताना त्याबद्दल संपूर्ण माहिती पैसे देण्याआधीच करून घ्यावी . त्या योजनेत आधी पैसे गुंतवलेल्या लोकांचा अनुभव माहिती करून घ्यावा . केवळ चुकीची माहिती देणेच नव्हे , तर अर्धवट माहिती देणे व गुंतवणुकीत असलेली जोखीम पूर्णपणे न सांगणे ही देखील फसवणूकच असते .
४. कागदपत्रांची पडताळणी : जमीन अथवा घर खरेदी करताना मालकी व मालमत्तेचा कर भरणा केल्याची सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्यावीत . व्यवहार होऊन गेल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात आले तर पश्चात्ताप करण्याची वेळ येते . नंतर कोर्टात गेलात तरी किती वर्षे खटला चालेल हे सांगता येत नाही .
५. ऑनलाईन व्यवहार : फक्त खात्रीच्या वेबसाईटवर व स्वतःच्या मोबाइल अथवा संगणकावरूनच ऑनलाईन व्यवहार करावेत . आपला पासवर्ड व मोबाइल फोनचा पिन देखील कुणाला सांगू नये . आपले सर्व पासवर्ड नियमितपणे बदलत रहावे व ते ओळखायला सोपे नसावेत . अशा प्रकारे सावध राहून जर आपण गुंतवणुकीचे व इतर आर्थिक व्यवहार केले व दीर्घकाळासाठी गुंतवणूक केली तर आपण नक्कीच लवकर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊन आयुष्याचा आनंद उपभोगू शकतो.
–केदार रायकर (गुंतवणूक सल्लागार)
Leave a Reply