आज मला ऑफिसला येताना बऱ्याच वर्षांनंतर, वाटेत एक नेपाळी गुरखा दिसला. त्याचा तो टिपिकल पेहराव व राजेश खन्नाने ‘आराधना’ चित्रपटातील ‘मेरे सपनों की रानी…’ हे गीत गाताना घातलेली, तशी काळी तिरपी टोपी पाहून मी भूतकाळात गेलो..
माझ्या लहानपणी मी सदाशिव पेठेत रात्री हातात मोठी बॅटरी घेऊन फिरणारा गुरखा पाहिलेला आहे. त्याचा तो खाकी गणवेश, डोक्यावरील काळी तिरपी टोपी, त्या टोपीवर असलेले दोन खुकरीचे मेटलचे लावलेले चिन्ह अजूनही आठवतंय. त्यांचे चायनीज सारखे दिसणारे बारीक डोळे आणि गालावरील उभ्या असंख्य सुरकुत्या हीच त्यांची ओळख असायची. त्याच्या उजव्या हातात एक दंडुका असायचा.
महिन्यातून एखादेवेळी तो आमच्या घराच्या दारावरील पडदा सारुन सलाम करायचा. मग त्याला दोन पाच रुपये दिले जायचे. हे गुरखे मितभाषी असायचे. कधी त्याला त्याचं नाव विचारलं तर ‘बहादूरसिंग’ असंच उत्तर मिळायचं. त्यांची ड्युटी रात्री असायची. मध्यरात्री किंवा पहाटे त्यांचा रस्त्यावर काठी आपटण्याचा आवाज हमखास झोपमोड करीत असे.
त्या काळी आताच्या सारखे सीसी टीव्ही नव्हते. त्यामुळे दुकानदारांना त्याला महिन्याचे पैसे देऊन राखण करायला सांगणे परवडायचे. विशेषतः सराफी दुकानांना त्यांची जास्त आवश्यकता असायची.
नेपाळी माणसं तशी काटकच. त्यांचा जन्म जरी नेपाळमधील असला तरी नोकरीसाठी त्यांनी भारतभरात कुठेही जाण्याची तयारी ठेवलेली असायची. त्याकाळी खाजगी सिक्युरिटी गार्डची संकल्पना मोठ्या प्रमाणात नव्हती. मुंबईत काही मोठ्या बंगल्यावर, सिने कलाकारांच्या निवासस्थानी अशी गुरखा मंडळी कायमस्वरूपी नोकरीला असायची.
सत्तर ऐंशीच्या दशकातील हिंदी चित्रपटात देखील गुरख्याची भूमिका एखादा विनोदी कलाकार करीत असे. मेहमूद, जॉनी वॉकर, जगदिप, मोहन चोटी, इ. नी या भूमिकेतून प्रेक्षकांना मनमुराद हसवलेलं आहे. अभिनेता प्राणने देखील ‘कसौटी’ चित्रपटात गुरख्याची भूमिका साकारली आहे.
डॅनी डॅन्ग्जोपा हा हिंदी कलाकारही तिकडचाच. त्याने नेपाळी व हिंदी चित्रपट सृष्टीत नाव कमावले. गिर्यारोहक शेर्पा तेनसिंग याने एडमंड हिलरी बरोबर एव्हरेस्ट शिखर सर केले. तो देखील नेपाळचाच.
गेल्या वीस वर्षांपासून आता शहरात पहिल्यासारखा गुरखा दिसत नाही. बहुधा ती पिढी संपल्यानंतर पुन्हा कुणीही ते काम स्वीकारलेले नसावे.
तंत्रज्ञान सुधारलं. सीसी टीव्ही मुळे व्यापाऱ्यांच्या दुकानांची सुरक्षितता वाढलेली आहे. सीसी टीव्हीच्या फुटेजवरुन चोराला लागलीच पकडले जाते. सायरन लावल्यामुळे चोरी करतानाच चोर पकडला जाऊ शकतो. त्यामुळे गुरख्यांची गरज राहिली नाही. मग त्यांनी वॉचमनची कामे स्वीकारली. इतर उद्योग व्यवसायापेक्षा अशाच कामात त्यांची संख्या अधिक आहे.
सध्या पुण्यातही अनेक नेपाळी माणसं राहतात. आता ते सोसायटी मधील बिल्डींगसाठी चोवीस तासांची नोकरी करतात. वाढत्या पुणे शहरातील अनेक मोठ्या सोसायट्यांची देखभाल नेपाळी लोकच करीत आहेत. आता त्यांची सध्याची पिढी ही नेपाळी न दिसता महाराष्ट्रीयनच दिसते. वाकड, कोंढवा अशा ठिकाणी त्यांची संख्या जास्त आहे.
माझ्या पिढीतील सर्वांना गुरखा माहित होता, यापुढील पिढ्यांना तो आता चित्रांतूनच दाखवावा लागेल..
© सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
५-७-२१.
Leave a Reply