नवीन लेखन...

गुरू….

‘गुरु’चा महिमा जेवढा आपल्या संस्कृतीत सांगीतला गेलाय, तेवढा क्वचितच इतरत्र सांगीतला गेला असावा. “गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वर..गुरुः साक्षात्परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः:” हे वचन आपल्या नित्याच्या व नैमितिक म्हणण्यात असतं. ब्रम्हा, विष्णू आणि महेश या विश्वाची उत्पत्ती, पोषण आणि लयाला कारणीभुत असणाऱ्या, उभ्या भारत देशाच्या धार्मिक आणि सांस्कृतीक आस्थेचा भाग असणाऱ्या त्रिमुर्तीची बरोबरी, साक्षात एकटा गुरु करतो हे मानणारी आपली संस्कृती, गुरु कोणाला मानावं याचंही यथार्थ मार्गदर्शन करते.

सर्वच प्राणिमात्रांचा आद्य गुरु ‘आई’. आई आपल्या मुलाची स्वयंपाकीण, भंगीण आणि गुरुही असते. वडीलांचा नंबर नंतरचा. आईच्या गुरुत्वाला मनुष्यच कशाला, डोळ्यांना दिसणारा कोणताही प्राणि-पक्षी अपवाद नाही. फक्त त्याची कुणाला जाणीव नसते. थोडंसं विषयांतर करतो. पूर्वी आमच्या घरी आम्ही एक मांजर पाळली होती. मनी तिचं नांव. दर चार-सहा महिन्यांनी तिचं बाळंतपण व्हायचं. प्रत्येक बाळंतपणात तिच्या चेहेऱ्यावरचा भाव, मार्जारवंश वाढवण्याची जबाबदारी नियंत्याने फक्त आपल्यावरच टाकली आहे आणि आपण ती पूर्ण करतोय, असा कृतकृत्य झाल्याचा असायचा. तर, ती तिच्या दिसागणीक मेठ्या होणाऱ्या पिलांना असं काही शिकवायची, की काही विचारू नका. पिल मांजराची असोत की माणसाची की आणखी कोणाची, ती थोडासा वाह्यातपणा करणारच. आमची ही मनी, पिलं शिकत नाहीत असं दिसलं, की खोटं खोटं रागवायची, त्यांच्यावर गुरुगुरायची , त्यांना नखं लागणार नाहीत अशा रीतीने डावली मारायची आणि कधी अति झालंच, तर त्यांच्यावर फिसकारून त्यांना दात न लावता चावायचीही. तीचं ते आईपाणानं, पिलांना शिकवणं, माझ्यासारख्याला तर वेड लावणारं असायचं..

आपली आईही असंच करायची ना? आपण उपडी होणं, घोडा करणं, धडपडत उभ राहायचा प्रयत्न नैसर्गिकरित्या करतानाचं, पहिलं आधाराचं आणि दिशेचं बोट तिचंच तर असायचं. आपण शाळेत जाईपर्यंत, पुढे एक चांगला विद्यार्थी व नंतर देशाचा नागरीक बनण्यासाठी कसं वागावं आणि कस वागू नये याची प्रथमिक शिकवणी तिचीच तर असायची. आपल्याला वय वर्ष पांचपर्यंत, तिनंच तर चापून आणि वडिलांनी चोपून तयार केलेलं असतं. वडीलंही असतात, पण ते सपोर्ट रोल मधे. कारण आपलं मुल ही आपली ‘सोल प्रॉपर्टी’ आहे, ही जगातील कोणत्याही आईची भावना, मुलाचा ताबा काही क्षणासाठीही त्याच्या जन्मदात्याकडे सोपवायला मनापासून तयार होत नसते.

तसं गुरु कोणाला म्हणावं याची काही व्याख्या नाही, परंतु आपण ज्या ज्या व्यक्तीकडून काही शिकतो, ती ती व्यक्ती गुरुस्थानी मानावी, असं मी ज्यांच्याकडे ज्योतिषशास्त्र शिकलो, ते आमचे गुरु श्री. शरदजी उपाध्ये सांगायचे. काही न काही नविन शिकवणार् गुरु दररोज, ते ही पावलो पावली भेटतात. त्यांच्या नकळत ते आपल्याला शिकवत असतात आणि आपल्या नकळत आपण त्यांनी शिकवलेलं शिकत असतो. काही जण समाजात वावरताना कसं वागावं हे शिकवतात, तर काही जण कसं वागू नये हे शिकवतात. घरी कामाला येणारी मदतनीस (मला ‘कामवाली’ आणि ‘मोलकरीण’ हे दोन्ही शब्द अजिबात आवडत नाहीत. हे त्यांचा माणूस म्हणून अपमान करणारे शब्द आहेत असं मी समजतो.) झाडू कशी मारावी (आणि माझ्या आई/पत्नीच्या मते कशी मारू नये) हे न शिकवता शिकवत असते. रोजचा रिक्षावाला, बस कंडक्टर, कटिंग चहा बनवून देणार चहावाला भट, सुलभ शौचालायातला पैसे ‘कलेक्टर’ (होय, कलेक्टरचं. एका सार्वजनिक मुतारीत पैसे घेण्यासाठी बसलेला माणूस स्वतःला ‘कलेक्टर’ म्हणताना मी ऐकलय. काम कोणतही असो, ते करताना फक्त आपणच हे उत्तम करू शकतो ह्या भावनेनं काम कसं करावं, हे मी याच्याकडून शिकलो.) लोकल-बस प्रवासातले घडीचे सोबती, सरकारी हाफिसातला शिपाई ते बडा साहेब. सामान्य भिकारी ते डॉक्टर, वकील आणि बडे सेलिब्रीटी हे व आपल्या दररोज संपर्कात येणारे असेच अनेकजण, पुस्तकं आपल्याला त्यांच्या आणि आपल्याही नकळत काहीतरी शिकवून संपन्न करत असतात. जे आपल्याला काही न काही शिकवतात, ते सर्वचजण गुरुस्थानी मानावेत असं आम्हाला श्री. उपाध्ये सरांनी शिकवलंय. अहो आपलीच पोरं आपल्याला बऱ्याचंदा काय काय शिकवून जातात. ‘बाबा तुम्हाला कळत नाही’ हे माझ वय वर्ष १६चं पोरग मोठ्या तज्ञाचा आव आणून, मला नवीन मोबाईल किंवा कॉम्प्युटर किंवा कसलंही इलेक्ट्रोनिक गॅजेट कस वापरायच ते सांगतं, तेंव्हा मला गंमतही वाटते आणि स्वतःच्या अज्ञानाची जाणीवही होते. पोरांची योजना, मला वाटत, भगवंतान आई-बापाला अधून मधून तळ्यावर आणण्यासाठीच केली असावी, असं त्यांचे बोल ऐकून वाटतं. हे ही गुरूच.

अस असलं तरी गुरु म्हटल्यावर आपल्या नजरेसमोर येतात ते आपले शाळेतले शिक्षक. शाळेतले शिक्षक, काॅलेजातले नव्हे. आईनं शाळेत पाठवलेल्या कच्च्या मडक्यावर, जगाच्या बाजारपेठेचं पाणी पिण्यासाठी पूर्व परंतु पक्की प्रक्रिया करून हेचं गुरु तयार करत असतात आणि म्हणून तर शाळेतले शिक्षक त्यांच्या नवा-लकबींसहित आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. त्यांनी शिकवलेला शब्द न शब्द कानात घुमू लागतो आणि पुन्हा एकदा त्याच्या वर्गात बसल्याचा फील देऊन जातो. मला इयत्ता पाचवीत आम्हाला इंग्रजी शिकवणाऱ्या जयश्री नाईक बाई तर या क्षणालाही नजरेसमोर दिसतात आणि इंग्रजी garageचा मराठी उच्चार ‘गॅरेज’ असा नसून ‘गराज’ असा आहे हे समजावून सांगतायत असं वाटतं. त्यांनी पक्क्या घोटवून घेतलेल्या स्पेलिंग्स, इंग्रजी बाराखडी आजही पक्की आहे. मुख्याध्यापक कोगेकर सरांनी गणित बाजूला ठेवून, सलग दोन पिरियड्स ‘गाॅडफादर’ फिल्मची स्टोरी आजही त्यांच्याच तोंडून ऐकतोय असं वाटतं. नंतर गाॅडफादर खुप वेळा पाहिला, पण कोगेकरसरांनी उभ्या केलेल्या त्या शब्दचित्राची सर काही त्या हलत्या बोलत्या पिक्चरला आली नाही. यांनीच काहीवेळ अभ्यास बाजूला ठेवून जिवनातल्या अनेक गोष्टींचा आनंद घ्यायला शिकवलं. इचत्ता दुसरीत शिकवणाऱ्या वृद्ध, घाऱ्या प्रेमळ डोळ्यांच्या, पाठीत किंचित वाकलेल्या जोशी बाई. मला आठवणारी पहिली शिक्षा करणाऱ्या मिसाळ बाई, बेलसरे बाई, गणित, विज्ञान शिकवणाऱ्या लता नाईक बाई, वेंगुर्लेकरबाई, धायगुडे सर अशी कुणाची कुणाची नांवं घेऊ? या सर्नांनीच आयुष्यभर पुरून वर उरेल एवढं दिलंय..

आमचे शिक्षक त्यावेळी आम्हा मुलांनाच नव्हे, तर आमच्या पालकांनाही छान ओळखायचे. अधनं मधनं आमच्या घरीही यायचे. काय अप्रुप वाटायचं तेंव्हा..! इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मला माझ्या सर्व शिक्षकांकडून मिळालेल्या शिकवणूकीच्या पौष्टीक शिदोरीवरच तर मी इथवर येऊन पोहोचलोय. अशीच भावना तुम्हा सर्वांची असेल यात शंका नाही.

ही झाली माझ्या पिढीची बात. हल्ली ती अॅटॅचमेंट शिक्षक-मुलांमध्ये राहीलीय की नाही कळत नाही. इयत्ता पहिलीपासूनच क्लास नांवाचा राक्षस पोरांच्या मानगुटीवर बसतो, तो थेट पदवी मिळाल्यावरच उतरती, यात शाळेतल्या शिक्षकांचं महत्व कमी होतंय ही चिंतेची बाब आहे. मला तर वाटतं, की शिक्षकांना मुलांना शिकवणं सोडून इतर कामाला वापरता यावं यासाठी क्लासची आयडीया कुठल्यातरी अति पिकलेल्या (म्हणून किडलेल्याही) मेंदूतून बाहेर आली असावी. सर्वच शिक्षक काही शिक्षकपेशाकडे नोकरी म्हणून बघत नसणार, काहीजण ते एक व्रत म्हणून आचरत असतील, पण काळंच असा चालू आहे म्हटल्यावर, ते ही शाळेत वाट्याला येणारा तास यांत्रिकपणे घेऊन, स्वत:ला कुठल्यातरी ट्रस्टीच्या आदेशावरून शिक्षकेतर कामाला जुंपून घेत असतील आणि जास्त पगाराच्या आकड्यावर सही करून अर्धामुर्धा पगार स्विकारत असतील. सगळीकडे नसलं, तरी शिक्षकांचा असा अपमान जराही होणं अत्यंत चुकीचं आहे.

क्लासमधे शिकवतात ते ही गुरुच, पण शाळेतल्या गुरुंची आणि त्यांची बरोबरी निदान मी तरी करणार नाही. शिक्षक मुलं घडवतो. देशाच्या भावी नागरीकांचा, देश चालवणाऱ्यांचा पाया शिक्षक भरत असतात. त्या अर्थानं सर्वात जास्त सन्मान आणि पगारही शिक्षकांनाच मिळायला हवा. पण तसं होताना दिसत नाही. जगण्याची विद्या शिकवणारे शिक्षक आणि जगायचं कशासाठी हे शिकवणारे कलावंत ह्याना समाजात उच्चतम स्थान द्यायला हवं. दुर्दैवाने आपल्याकडे समाजात कसं वागू-जगू नये ह्याची उत्तम उदाहरणं असलेल्यांना सन्मान आणि विशेषाधिकार मिळतात ह्याला काय म्हणावं?

शिक्षक हा पेशा पत्करणारे इतर काही करू शकत नाहीत म्हणून ते करतात असं समजलं जातं. ‘काहीच करत नाहीस तर काय मास्तर व्हायचंय का?’ असं हेटाळणीनं विचारलं जातं. सोशल मिडीयावर येणारे गुरुजी, सर, बाई यांवरचे जोक वाचून तर आपण समाज म्हणून नेमकं कुठं चाललोय असा प्रश्न मला पडतो. ज्या समाजात कुठल्यातरी पाच वर्षांच्या हंगामी पदावर असलेल्या एखाद्या फुटकळ साहेब, दादासाहेब आणि भाईसाहेब यांना त्यांच्या लायकीपेक्षा जास्त मान दिला जातो आणि शिक्षकाला काडीचीही किंमत मिळत नाही, त्या समाजाचं भवितव्य आणि भविष्यही फार उज्वल नसतं.

शिक्षकांना आपल्या समाजात सर्वोच्च आदराचं स्थान द्या हेच या ‘गुरू पौर्णिमे’च्या निमित्ताने सांगेन. व्हाट्सअॅपसारख्या सोशल मिडीयावर सर, बाई, गुरुजींवरचे जोक्स आपण टाळूया. या पेक्षा उत्तम ‘गुरुदक्षिणा’ नाही. आपल्याला एक लक्षात कसं येत नाही, की आपले जे शिक्षक असतात, ते ही कुणाचेतरी आई-वडील-भाऊ-बहीण-मुलगा-मुलगी असतात. त्यांच्यावरचे जोक्स वाचून, त्यांच्या घरातल्यांचं त्यांच्या शिक्षक पेशाविषयी काय मत होईल, याचा आपण कधीतरी विचार करणार की नाही? आपल्याला घडवणाऱ्या शिक्षकांना ‘विनोदा’चा विषय बनवणं आपण कटाक्षाने टाळू. असं केलं तरच “गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णु, गुरुर देवो महेश्वरः गुरुः साक्षात्परब्रह्मा, तस्मै श्री गुरुवे नमः” या वचनाला काहीतरी अर्थ प्राप्त होईल, अन्यथा ते ही फक्त गुरुपौर्णिमेला बोलायचं किंवा फाॅरवर्ड करायचं एक सुभाषित म्हणून राहील.

गुरुपौर्णिमेचं दुसरं काय लिहू..?

— नितीन साळुंखे
9321811091

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..