नवीन लेखन...

गुरुदक्षिणा

प्रति,
आदरणीय जे. एन .पुराणिक सर,

आज हे पत्र लिहायलाच हवं. एक वर्ष उशीर झालाय. मागील गुरुपौर्णिमेला संकल्प सोडला होता या पत्राचा आणि वर्षभरानंतर तो पूर्ण होतोय. उशिराला कारण काहीच नाही. सारंगकडून तुमचा पत्ता मिळाला पण तो लिफाफ्यावर असणार. आतमध्ये काय? हे सगळं “आतलं ” तुमच्यासारख्या गुरुजनांनी दिलेल्या ओसंडून वाहणाऱ्या पोतड्यांची देणगी आहे. हे व्यक्त व्हायला गुरुपोर्णिमेसारखा मुहूर्तच हवा.

झालं असं – किशोर निमकरने पुढाकार घेऊन आम्हां सर्व “भुसावळी ” मित्रांचा (न्यू इंग्लिश स्कूल वाल्या ) एक ग्रुप केला आहे. मागीलवर्षी एका रात्री आम्हीं सगळेच ट्रान्समध्ये गेल्यासारखे झालो. सुमारे तासभर शाळेच्या,शिक्षकांच्या आठवणी आठवत राहिलो,शेअर करीत राहिलो. सगळे पांगलेले, आपापल्या वळणा वाटांनी निघालेले ! सामाईक दुवा म्हणजे बालपण ,शाळा आणि त्यातील गोडांबट अनुभव ! ते मात्र साऱ्यांच्या मनाशी तसेच -रसरशीत, अनाहत आणि कोवळीक जपलेले !

खूप लहान झाल्यासारखे वाटले त्या रात्री!

त्या उर्मीत आपल्याला एक पत्र लिहावे असं माझ्या मनात आलं -निव्वळ कृतज्ञता व्यक्त करणारं!आमच्या सर्व गुरुजनांचे प्रतिनिधी म्हणून आणि मी आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा प्रतिनिधी म्हणून ! आपल्या उदंड देणगीबद्दल आम्हांला अजूनही जे वाटतं ते व्यक्त करणारं!

सर, आपलं व्यक्तिमत्व उग्रमधुर ! आवाजात पोलिसी जरब !

आठवीत आपण आम्हांला संस्कृत शिकवायला आलात. अतिशय सुंदर उच्चार, भाषेतला गोडवा आमच्यापर्यंत झिरपविणारे ! वर्गातील पाठांतर – राम शब्द चालविणे ! चुकीवर करडी नज़र ! आणि हातातील घडयाळ तुम्ही काढून टेबलावर ठेवलं की त्या मुलाच्या पाठीची खैर नसे. ही शिक्षेची अभिनव पद्धत आम्ही तुमच्या “हातून “अनुभवली.(त्यामानाने नंतर संस्कृतसाठी आलेले खांडवेकर सर बरेच सोबर होते.) पण आजच्या पाठांतराचे, स्मरणशक्तीचे सारे श्रेय तुमचे !

काही वर्षांपूर्वी आपली अचानक भुसावळ स्टेशनवर गाठ पडली. सारंग मला भेटायला आला होता. अचानक आपण प्लॅटफॉर्मवर दिसलात. सारंग म्हणाला –
” सर,ओळखलंत का याला ? हा नितीन देशपांडे !”

आपण जुन्या खर्जातील आवाजात पटकन म्हणालात – ” होय. हा नितीन हनुमंत देशपांडे. याला कसा विसरेन ?”

“सर, खरंच अजून आठवतंय तुम्हांला ?” मी स्तिमित होऊन विचारलं .

” मग! तू -नितीन हनुमंत देशपांडे , हा -सारंग वामन चौधरी ! झालंच तर विकास सोपान कोळंबे ,शिरीष यशवंत महाबळ, संजय मधुकर मुळे , उल्हास श्रीधर पाटील , प्रवीण तुकाराम नारखेडे, सतीश कालिदास चौधरी, मुकुंद कृष्णराव जोशी !!!”

सरांनी संथेप्रमाणे आमची पूर्ण नांवे घेतली -वर्गात हजेरी घ्यायचे तशी !

सारंग माझ्याकडे बघत नेहमीचं “गोबरं ” हंसत होता. त्याला हे नवं नसावं.

माझ्या दृष्टीने मात्र मधला ३०-३५ वर्षांचा काळ धूसर झाला होता. आम्ही सारे “आपल्या ” शिक्षकांच्या इतक्या स्मृतीत असणं हे गहिरं होतं. अविश्वसनीय होतं.
” तुमच्या बॅचला मी कसा विसरू शकेन?” सरांचा किंचित ओला प्रश्न !

आता काळाचे हात आम्हां सर्वांवरून फिरले आहेत सर ! आमच्या सर्वांच्या पूर्ण नावातील (वडिलांचं) “मधलं ” नांव अस्तंगत झालंय. (अगदी नुकतंच विकास च्या बाबतीत हे घडलंय). तुम्ही मात्र काळ १९७३-७४ मध्येच थोपवलाय. मागील वर्षी “राजा पळणीटकर “(तुमच्या भाषेत “नरेंद्र महादेव पळणीटकर ” मध्येच गेला.)

हे पत्र म्हणजे आम्हां सर्वांच्या वतीनं गुरुपोर्णिमेची छोटीशी आठवण -आम्ही कोणीच तुम्हां शिक्षकांना विसरलो नाहीए, विसरणार नाही याची खूण !

२०१९ संपण्यापूर्वी भुसावळला येऊन तुमची भेट घेईन. “घडयाळ ” केव्हां हातातून काढताय, याकडे एक डोळा ठेवून तुमच्याशी गप्पा मारेन. शक्य झाल्यास गांवातील मित्रांनाही घेऊन येईन.

आधीच उशीर झालाय पत्र लिहायला !आता आवरतं घेतो.

आपणांस आणि आपल्या कुटुंबियांना सादर नमस्कार !

आपला

— नितीन हनुमंत देशपांडे

डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
About डॉ. नितीन हनुमंत देशपांडे 378 Articles
शिक्षणाने अभियंता, व्यवसायाने व्यवस्थापन सल्लागार, आवडीने लेखक ! माझी आजवर अकरा पुस्तके ( ८ मराठीत, २ इंग्रजीत आणि १ हिंदीत) प्रकाशित झालेली आहेत. आणखी चार पुस्तकांवर काम सुरु आहे. सध्या दोन मराठी वृत्तपत्रात साप्ताहिक सदर लेखन सुरु आहे. कथाकथन,काव्यवाचन, वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धांमध्ये राज्यपातळीवर सहभाग आणि पारितोषिके !

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..