हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘शापित गंधर्व’ मानले गेलेल्या गुरुदत्त यांचा जन्म ९ जुलै १९२५ रोजी झाला. गुरुदत्तचा सिनेमा हा अनेकांच्या आवडीचा विषय. लोकांनी त्याला शोमन, डिरेक्टर ऑफ मिलेनिअम अशा काही पदव्या दिल्या नाहीत. पण हिंदी सिनेमाच्या संवेदनशील रसिकांचा तो जिव्हाळ्याचा विषय. मग तो त्यांचा सिनेमा असो वा त्याचं वैयक्तिक आयुष्य. सिनेमा या माध्यमावरील पकड, संगीताची जाण आणि नव्या प्रवाहात सामावून जाण्याची सहजता यामुळेच मा.गुरुदत्त कालातीत ठरले.
त्यांचे बालपणीचे नाव वसंत कुमार शिवशंकर पदुकोण होते. वसंत कुमार शिवशंकर पदुकोण यांच्यावर बंगाली संस्कृतीचा इतकी मोठी छाप होती, की त्यांनी बालपणीचे नाव बदलून गुरुदत्त ठेवले.
गुरुदत्त हे सिनेसृष्टीत १९४४ पासून १९६४ पर्यंत सक्रिय होते. यादरम्यान त्यांनी अनेक उत्कृष्ट सिनेमे दिले. त्यामधील काहींमध्ये त्यांनी अभिनयसुध्दा केला. एका सर्वेनुसार, त्यांना सिनेसृष्टीच्या १० वर्षांच्या इतिहासात उत्कृष्ट दिग्दर्शकसुध्दा मानले गेले आहे. टाइम मासिकानुसार त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘प्यासा’ सिनेमा जगातील १०० उत्कृष्ट सिनेमांपैकी एक आहे. असे म्हटले जाते, की गुरुदत्त कधीच संतुष्ट नव्हते. कितीही चांगला सिनेमा तयार झाला किंवा ते प्रसिध्द झाले तरी आणखी जास्त असायला हवी अशी इच्छा असायची. क्रिएटीव्हीची त्यांची तहान कधीच कमी झाली नाही.
गुरुदत्त यांच्या आयुष्यातील अनेक क्षण आहेत, ज्याविषयी अनेकजण अज्ञात आहेत. गुरुदत्त यांचे सर्वात पहिले गीता यांच्यावर प्रेम झाले, दोघांचे लग्नदेखील झाले. त्यानंतर त्यांना वहीदा रहमान आवडायला लागल्या. दोघींवर एकाचवेळी प्रेम करण्याच्या प्रयत्नात दोघीही त्यांच्यापासून दूर होत गेल्या. गीता यांच्यासोबत लग्न केल्यानंतर गुरुदत्त यांचे सिनेमे हिट होऊ लागले होते. मात्र गीता यांच्या करिअरचा आलेख घसरला होता. यादरम्यान गुरुदत्त यांच्या आयुष्यात वहीदा रहमान आल्या. वहीदा यांना स्टार करण्याची जबाबदारी गुरुदत्त यांनी घेतली. अभिनेत्री होता होता कधी वहीदा आणि गुरुदत्त यांना एकमेकांवर प्रेम झाले हे त्यांनासुध्दा माहित नाही. दोघांनी कधीच हे नाते स्वीकारले नाही. मात्र त्यांच्या या नात्याने गीता नाराज झाल्या होत्या. गुरुदत्त यांना ना गीता यांना सोडण्याची इच्छा होती ना वहीदाला. कदाचित या सर्वातून सुटका करण्यासाठी त्यांनी आत्महत्या केली.
खरं तर देव आनंदच्या आणि त्याच्या मैत्रीबाबत लोकांना माहिती आहे. दोघांनी बोलताना एकमेकांना शब्द दिला होता. गुरुदत्त म्हणाले, की जर ते निर्माते झाले तर देवानंद यांना हीरो म्हणून घेतील. देवानंद यांनी सांगितले होते, की जर ते निर्माता झाले तर सिनेमाचे दिग्दर्शन गुरुदत्त यांच्याकडूनच करून घेतील. देवानंद यांनी आपला शब्द पाळला. निर्माता बनताच ‘बाजी’ सिनेमाचे दिग्दर्शन गुरुदत्त यांच्याकडे दिले. मात्र गुरुदत्त यांनी आपला शब्द अर्धवट पाळला. गुरुदत्त यांच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनलेल्या ‘सीआयडी’ सिनेमात देवानंद हीरो होते, मात्र सिनेमाचे दिग्दर्शन गुरुदत्त यांनी सहायक दिग्दर्शक राज खोसला यांच्याकडून करून घेतले. नंतर गुरुदत्त यांनी ‘जाल’ सिनेमात देवानंद यांना डायरेक्ट केले होते. पण बलराज साहनीशी त्याच्या मैत्रीचा उल्लेख फार कमी ऐकायला मिळतो.
बलराज साहनी आणि गुरुदत्त यांची दोस्ती एवढी होती की त्याच्या पहिल्या सिनेमाची कथाही बलराज साहनीने लिहिली होती. नसरीन मुन्नी कबीर यांनी लिहिलेल्या ‘ गुरुदत्त : अ लाइफ इन सिनेमा ‘ या पुस्तकात, गुरुदत्तचं एक माणूस म्हणून असलेलं वागणं आणि त्याचे चित्रपट याचा विचार त्यात केला आहे. केवळ सिनेमाचे पोस्टर्स रंगवणारे त्याचे काका एवढीच काय ती गुरुदत्तची सिनेमाशी ओळख होती. पण जणू काय त्याच्या रक्तातच सिनेमा होता , अशी कामगिरी त्यानं करून दाखवली. अगदी पहिल्या सिनेमापासून त्याचं सिनेतंत्र काही और आहे , हे लक्षात आलं. प्रवाहाविरोधात जाताना लोकांना काय आवडतं , याचा विचार करणाऱ्या गुरुदत्तची ओळख या पुस्तकाच्या निमित्ताने होते. गुरुदत्त यांचे १० ऑक्टोबर १९६४ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. विकी पिडीया
Leave a Reply