“गुरुतत्त्व ” हे अनादी अनंत आहे यात उत्पती, स्थिती व लय हे सर्व समावीष्ट आहे. हे गुरुतत्त्व जगाच्या कल्याणासाठीच अवतरत असते. एकतर प्रत्येक जीव हा आनंद अवस्थेकडे जावा त्याच प्रकारे त्या जीवाचे-शिवाशी मिलन व्हावे म्हणजे चिरंतन अशा आनंद अवस्थेकडे जावून भगवंत व्हावा या साठी गुरुतत्त्व विविध अवतार घेवून मार्गदशान करत असतात. एकाच वेळी भुतळावर ईश्वरापर्यंत जाणाऱ्या प्रत्येक मार्गाचा गुरु होऊन त्या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या प्रत्येक जीवाला मार्गदर्शन करीत असतो हे म्हणूनच म्हटले आहे. “गुरुतत्त्व एक मार्गदर्शक.”
मानवी जीवन हे सुख दुःखाने भरलेले आहे. कारण हे जीवनात कर्माच्या संचितावर म्हणजेच प्रारब्धावर अवलंबून आहे. त्यामूळे जीवनात चढ उतार होतात. याचे अवलोकन केले तर असेही दिसुन येते की एखादी व्यक्ती ईश्वरी कुठलेच कार्य करीत नाही. उलटत्याच्या विरुद्ध वागते, तरी त्याच्या जीवनात दुखा:चे प्रमाण फार कमी असते. त्याउलट एवादी व्यक्ती ईश्वरासाठी तन, मन, धनाचा त्याग करुन साधना करीत असते, तरी त्यास शारिरीक, मानसिक, अध्यात्मिक स्वरूपाचे त्रास हे दिसून येतात. यामागे कारण काय असेल तर संत महात्मे हेच सांगत असतात की “हा जन्म आपला पहिला जन्म नाही,”ज्यावेळी प्रथम ईश्वराने जे जीव निर्माण केले तेव्हापासूनच आपण जन्माला आहोत. प्रत्येक जन्मात कर्म करीत परत परत जन्म घेऊन प्रारब्ध भोग भोगत या भवसागरात गटांगळ्या खात आहे यातून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे “नामस्मरण”
‘नामस्मरण” म्हणजे फक्त मुखाने नाम घेणे नव्हे तर त्या नामईश्वराला अभिप्रेत असलेले कर्म करीत जीवन जगावे म्हणजेच कोणत्याही जीवाला दुःख न देता सत्कर्म करीत जीवन जगणे हेच नामाशी अनुसंधान साधणे आहे. अशाप्रकारे जीवन जगत असतांना प्रारब्ध भोग भोगणे तर सुरुच असते मात्र मन, चित्त हे ईश्वरीय विचारात, आचारात असल्यामुळे शरीराला दुखः होवून सुद्धा मन आनंदी असते. सर्वदुःखाचे मुळ कारण आहे की “मन” हे शरीरावर होणाऱ्या प्रारब्धात अडकलो असतो. म्हणून संत सांगत असतात की “मन करारे प्रसंन्न सर्व सिध्दीचे कारण.”
मन प्रसन्न आनंदी कसे राहील तर ते फक्त नाम,सेवा, सत्संग, त्याग, प्रेमभाव या प्रकारे तो प्रसन्न राहू शकतो. म्हणजेच ईश्वरा कडे घेवून जाणाऱ्या या मार्गावर साधना करित ते प्रसन्न राहू शकते. दुसऱ्या कुठल्याही प्रकारे मन प्रसन्न होवू शकत नाही. ही प्रसन्नता शाश्वत चिरंतन आहे. हेच प्राप्त करण्यासाठी प्रत्येक जण धडपडत असतो मात्र शाश्वत, चिरंतन, आनंद प्रपंचात शोधतो. त्यासाठी वाट्टेल ते अनुचित कर्म करतो यातून मान, पैसा, व इतर गोष्टी मिळवीणे मात्र या अशाश्वत आहेत त्यातुन क्षणिक सुख प्राप्त होते मात्र नंतर दुख: च भोगावी लागतात.
अशाच अज्ञानी जीवासाठी संत, महात्मे, गुरुतत्त्व हे कार्य करीत असते. प्रत्येक काळानुसार त्यावेळी मार्गदर्शन करीत असतात. जुन्या रुढी परंपरा याना मोडीत काढतात सर्वाना सहज उपासना सांगतात व स्वतः सपूर्ण जीवनभर आदर्श युक्त जीवन जगतात व त्याचे अनुकरण व्यक्तीनी करावे असे शिकवीत असतात.
हे सर्व संत, सद्गुरु अवतारी वेगवेगळे दिसत असले तरी एकच असतात. कारण त्या सर्वाचे ध्येय कार्य एकच असते बाह्य स्वरूप जरी वेगळे असले किंवा त्यानी सांगितलेली साधना वेगळी असली तरी उद्देश मात्र प्रत्येक जीवाचे – शिवाशी मिलन व्हावे हाच असल्याने प्रत्येक जीव हा “सत्व-रज-तम” या त्रिगुणांनी युक्त आहे. मात्र प्रत्येकाचे प्रमाण हे कमी जास्त आहे. त्यामूळेच एकच साधना प्रत्येकाला लागू नसते. म्हणूनच आपआपल्या प्रकृतीनुसार प्रत्येक जीव हा त्याच्या प्रकृतीला आवडेल अशा संतांच्या सद्गुरुच्या अवतारांच्या जवळ जातो व साधना करतो.
साधना जरी वेगळी असली तर उद्देश हा एकच आहे. कारण गुरुतत्त्व एकच आहे. एवाद्या व्यक्तीने हजारो वर्षा पूर्वी असणाऱ्या संतांनी अवतारांनी केलेल्या मार्गदर्शन प्रमाणे साधना करीत गेला त्याला गुरुतत्त्व त्या रुपातच येवून मार्गदर्शन करीत असतो. कारण तत्वाला कुठलेच रुप नाही तर तो सर्वरुपच आहे. तोच सर्वत्र, चराचरात व्यापून आहे. म्हणून साधना कुठलीही करा कुठल्याही रुपाची करा मात्र त्याच्याशी एकरुप व्हा, दृढश्रद्धा ठेवा जे काही जीवनात आहे व त्याचेच रुप हे प्रत्येक संतात बघा, कधीही या गुरुतत्त्वाची चर्चा करु नका तर त्याच्या तत्वाचे चिंतन करा, कारण चिंतन केल्याने विवेक जागृत होतो तर चर्चा केल्याने अहंकार निर्माण होतो या अहंकारा पोटी फक्त नाश विनाश व दुख:च प्राप्त होते अशी बरीच उदाहरणे आहे.
चिंतनाने विवेक जागृत होवून ईश्वराला, संताना, गुरुंना, सद्गुरुंना अभिप्रेत असे जीवन जगण्याचे दृढभाव निर्माण होतो. म्हणूनच प्रत्येक संत सांगत असतात. “मन लागोरे लागोरे, लागो गुरु चरणी ।।”
गुरुशिवाय तरणोपाय नाही, मात्र गुरु हा करायचा नसतो तर शिष्य म्हणून आपल्यात शिष्यत्वाचे गुण
येण्यासाठी प्रयत्न करायला हवे साधना करायला हवी, त्यासाठी नाम, सेवा, सत्संग, त्याग व प्रेमभाव हा प्रथम प्रयत्न पूर्वक करायला हवे नंतर जसी प्रात्रता वाढत जाईल तसे जीवनात मार्गदर्शन मिळत जाईल, शेवटी सुखदुख:च्या पलीकडे असणारी आनंद अवस्था म्हणजे मोक्ष या स्थितीला घेवून जातील म्हणून आधी आपल्यात शिष्यत्व येण्यासाठी गुरुतत्त्वाच्या कार्यात सहभागी व्हा, कार्य करा, तन, मन, धनाचा त्याग करा. धार्मिक, धर्मदाय, सामाजिक कार्यात सहभागी व्हा मात्र यात भाव असावयाला हवा की हे सर्व मी माझ्या स्वतःच्या प्रगतीसाठी करतो आहे. यामूळे सेवा भाव निर्माण होईल, नाहीतर अहंकार निर्माण होवून करीत असलेल्या साधनेतून दुर व्हायला सुरवात होईल.
सर्वांची अध्यात्मिक उन्नती जलद व्हावी ईश्वराला अपेक्षीत असलेली साधना प्रत्येकाकडून व्हावी हिच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे. हा अंक तिसऱ्या वर्षातील प्रथम अंक आहे. बघता बघता सद्गुरुंनी २४ अंक त्यांना अपेक्षीत असल्याप्रमाणे करुन घेतले, प्रत्येक अंकाला अनुभुती दिली. सातत्याने सोबतच आहे हे दाखवून दिले. आपण सर्वजण सुद्धा गुरुतत्त्व मासिकाच्या मागे सद्गुरु प्रमाणे उभे आहात याची सुद्धा जाणीव झाली. अशाच प्रकारे वषानुवर्षे गुरुतत्त्वाची सेवा घडत राहो हिच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे.
।। ॐ श्री गुरुतत्त्वाय नमो नमः ।।
-श्री. संतोष शामराव जोशी
सौजन्य: गुरुतत्व मासिक, वर्ष 3 रे, अंक 1ला
Leave a Reply