गायनॅक आणि अमेरिकन तसेच मराठी नाट्यसृष्टीत आपला ठसा उमटवलेल्या डॉ. मीना नेरूरकर यांचा जन्म २१ जूनला मुंबईत झाला.
डॉ.मीना नेरूरकर या अमेरिकेत गेली अनेक वर्षे गायनॅकॉलॉजीस्ट म्हणून प्रसिध्द आहेत. डॉ. मीना हे नाव मराठी नाट्यसृष्टीला काही नवीन नाही. त्यांच्या नृत्यकलेमुळेही त्या रसिक प्रेक्षकांना माहीत आहेत.
डॉ.मीना नेरूरकर या मुंबईच्या. माहेरच्या त्या मीना वझे. त्यांचे वडील डॉक्टर व आई गायनॅकॉलॉजिस्ट होती. त्यांचे शालेय शिक्षण बालमोहन विद्यामंदिर व महाविद्यालयीन शिक्षण रुईया व सेठ जी.एस.( गोरधनदास सुंदरदास) मेडिकल कॉलेज येथे झाले.
शालेय जीवनात त्या हिंदु कॉलनीतील रुपायतान नृत्य शाळेत दोन वर्षे नृत्य शिकायला जात होत्या. पुढे गणेश प्रसाद हे गुरु त्यांना घरी शिकवायला येत असत. त्यांनी डॉ. मीना भरतनाटयम्, कथ्थक, मणिपुरी हे तीनही नृत्यप्रकार शिकवले. त्या पाचवीत असतांना के.इ.एम. हॉस्पीटलच्या गॅदरींगमध्ये प्रथम पब्लिक परपॉर्मन्स केला होता. महाविद्यालयात असताना ‘डॉ. मीना यांनी ‘वा-यावरची वारात, विच्छा, मैना, सख्खे शेजारी ह्या नाटकांमध्ये कामे केली आहेत. मीना यांनी मेडिकल कॉलेज मध्ये असताना तीन गुजराती नाटकात आणि अमेरिकेत एका गुजराती नाटकात काम केले. आधे अधुरे हे हिंदी नाटक पण केले होते. ‘आधे अधूरे’ या हिंदी नाटकाचे १२ प्रयोग त्यांनी अमरीश पुरी यांच्या बरोबर अमेरीकेत केले.
मीना आणि त्यांचे पती अनिल हे दोघेही डॉक्टर. लग्ना नंतर ९० च्या दशकात ते अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे गेले. तेथे अत्यंत यशस्वीपणे डॉक्टरी पेशा केला. व्यवसाय उत्तम, कौटुंबिक सुख हे सगळं त्यांच्या पदरात पडलं. या पलिकडेही माणसाच्या आयुष्यात बरंच काही उरतंच. काही वेगळं करावसं वाटतं. आपलाही कुठल्या तरी कार्यात सहभाग असावासा वाटतो. डॉ.मीना यांनाही तसं वाटलं आणि त्यासाठी त्यांनी आपला वेळ सत्कारणी लावला. कथ्थक आणि भरतनाट्यम् या दोन्ही नृत्यप्रकाराचं त्यांनी शिक्षण घेतलं असल्याने मराठीला ग्लोबल टच देण्यासाठी त्यांनी हेच माध्यम निवडलं. १९९० मध्ये त्यांनी स्वत:ची ‘कलाभवन’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाट्य-नृत्याचे कार्यक्रम अमेरिकेत केले आणि तिथल्या मराठीजनांचा त्याला मोठा प्रतिसादही मिळाला. मीना नेरुरकर यांची ही संस्था अमेरिकेत होणाऱ्या अनेक मराठी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असते. काही वर्षापूवी त्यांनी ‘ये प्यार के नगमें है’ हा कार्यक्रम सादर करून भारतातील मंदिराच्या मदतीसाठी निधी गोळा केला होता.
डॉ. मीना नेरूरकर यांची महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने ओळख झाली ती ‘सुंदरा मनामध्ये भरली’मुळे! त्यांच्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या नाटकाने लावणी नृत्याचे पुनरुज्जीवनच केले आहे.
काही वर्षांपूर्वी कविवर्य वसंत बापट काव्यवाचनाचे कार्यक्रम करण्यासाठी अमेरिकेत गेले होते. त्यावेळी डॉ. मीना नेरूरकर यांनी त्यांना, लावणीवर आधारित तमाशा वजा खेळ लिहून द्या, अशी गळ घातली. त्यांनी कविवर्यांचा पिच्छा पुरवला आणि त्यातून हा सुंदर खेळ जन्माला आला- ‘सुंदरा मनामधे भरली…
७ डिसेंबर १९९३ या दिवशी न्यू जर्सी येथे ‘सुंदरा’चा पहिला प्रयोग झाला. आणि १९९८ च्या जानेवारी महिन्यात मुंबईच्या शिवाजी मंदिरात या खेळाचा शंभरावा प्रयोग मोठ्या थाटामाटात साजरा झाला. या निमित्ताने डॉ. अनिल नेरूरकर यांनी ‘कलाभवन’ या त्यांच्या संस्थेतर्फे एक देखणी स्मरणिका काढली होती. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ हा त्यांच्यासाठी माइलस्टोन ठरला. या लावणी कार्यक्रमावर अमेरिकनच नव्हे, तर महाराष्ट्रातील मराठी मध्यमवर्गही भाळला! महाराष्ट्रात त्याचे शंभर प्रयोग झाले आणि प्रत्येक प्रयोगाला तुफान रिस्पॉन्स मिळाला. ‘सुंदरा…’ स्टेजवर आणण्यापूवीर् मीना नेरुरकरांनी लावणी या नृत्यप्रकाराचा विविध अंगाने अभ्यास केला. लावणीचा उगम उत्तर भारतातला आहे. त्यामुळे लावणीवर कथ्थकचा मोठा प्रभाव जाणवतो, हे त्यांच्या लक्षात आलं. लावणीवर लिहिलं गेलेलं प्रत्येक पुस्तक त्यांनी वाचलेलं आहे. लावणीतलं ठसका आणि भाव यांचं महत्त्व नेमकं काय? बैठकीच्या लावणीचं वैशिष्ट्य काय? हे सगळं त्यांनी अभ्यासलं. ‘सुंदरा…’चं स्क्रिप्ट ज्येष्ठ कवी वसंत बापट यांचे होते व त्यासाठी त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं.
तसेच ‘अवघा रंग एकचि झाला’ हे डॉ. मीना नेरूरकर यांनी लिहिलेले आणि नाट्यसंपदा या संस्थेने रंगभूमीवर आणलेले मराठी संगीत नाटक आहे. या नाटकाचे निर्माते अनंत पणशीकर असून दिग्दर्शन अशोक समेळ यांनी केले आहे तर रघुनंदन पणशीकर हे संगीत दिग्दर्शक आहेत. प्रसाद सावकार, जान्हवी पणशीकर आणि स्वरांगी मराठे यांच्या या नाटकात मुख्य भूमिका आहेत. या नाटकाचे २०१३ पर्यत ३०० पेक्षा अधिक प्रयोग झाले होते. डॉ. मीना नेरूरकर या जितक्या नृत्यात, लिखाणात तरबेज आहेत तितक्याच त्या अभिनयातही निपुण आहेत. ‘इंग्लिश विंग्लिश’ या हिंदी तर ‘स्लीपवॉक विथ मी’ आणि ‘मिस्टर रवी अँड मिस्टर हाईड’ या हॉलीवूडपटात अमेरिकेतील टीव्ही मालिका ‘One life to Live’ यात व इतर मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे. त्यांच्या अमेरिकेतल्या वास्तव्यात त्यांनी ‘वाऱ्यावरची वरात’, ‘विच्छा माझी पुरी करा’, ‘सख्खे शेजारी’ यांसारख्या नाटकातही त्यांनी कामे केली आहेत.
काही काळापूर्वी डॉ.मीना यांनी ‘अ डॉट कॉम मॉम’ हा मराठी चित्रपटाची निर्मिती केली असून त्यात त्यांनी अभिनयही केला आहे. या सिनेमाच्या निर्मिती व अभिनया सोबतच संवाद लेखन, गीत लेखन, कोरिओग्राफी आणि दिग्दर्शनाची धुरा डॉ. मीना नेरुरकर यांनी सांभाळली आहे. या चित्रपटात त्यांनी आई आणि मुलाच्या नात्यातील भावनिक गुंफण दाखवली आहे. डॉ.मीना यांनी लोकप्रभा व लोकसत्ता साठी खूप लेखन केले आहे. ‘धन्य ती गायनॅक कला’ आणि ‘ठसे माणसांचे’ या सारखी पुस्तकेही त्यांनी लिहिली आहेत.
बृहन्महाराष्ट्र मंडळ तसेच जागतिक मराठी परिषद अशा मराठी प्लॅटफॉर्मवर डॉ.मीना नेरूरकर यांची उपस्थिती असते. डॉ.मीना नेरूरकर यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठान, जागतिक मराठी परिषदेनेही त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
डॉ.मीना नेरूरकर यांची वेबसाईट.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply