सदाशिव पेठेतील सदानंद खाडिलकरांचं ‘सदानंद प्रकाशन’ हे आम्हा सर्व पुणेरी चित्रकारांचं एकमेव व्यासपीठ होतं. चार मासिकं आणि सहा दिवाळी अंक नियमितपणे चालविणाऱ्या खाडिलकरांना चित्रकारांची आवश्यकता नेहमीच असायची.
१९८५ पासून आम्ही ‘सदानंद प्रकाशन’चे काम करु लागलो. तेव्हा ‘भावना’ अंकाचे संपादन मीराताई करायच्या. मराठीमध्ये एम.ए. केलेल्या मीराताई अतिशय हुशार, मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. वर्षातून एकदा येणाऱ्या हरतालिकेच्या मूर्तीसारखाच प्रसन्न चेहरा, गोरा रंग, कपाळावर लाल रंगाची मोठी टिकली, काठपदराच्या साडीमध्ये त्या सदैव हसतमुख दिसायच्या.
काही वर्षांनंतर सदानंद खाडिलकरांनी वाढत्या वयाच्या कारणास्तव प्रकाशन थांबवले. छंद म्हणून त्यांनी वर्तमानपत्रातील फोटोंच्या कात्रणावर केलेल्या चुरचुरीत काॅमेंट्सच्या कार्डांचे पहिले प्रदर्शन नूवमि शाळेत भरविले. मीराताईंच्या ‘छंद-कलावर्धिनी’ संस्थेचे हे पहिले पाऊल! या प्रदर्शनापासून पुढे पंचवीस वर्षे आम्ही मीराताईं बरोबर प्रदर्शन सजावटीचे काम केले. छांदीष्टांच्या माहितीचे एक पुस्तकही केले.
या पंचवीस वर्षांत त्यांच्या रहाण्याची घरं अनेकदा बदलली, मात्र प्रदर्शनाच्या आखणीपासून अंमलबजावणीपर्यंत नावडकरांचे ऑफिस हे कायम राहिले. सुरुवातीला त्या तळेगाववरुन येत असत. सकाळी घरकाम आवरुन दहाची लोकल पकडून बाराच्या सुमारास हजर रहायच्या. चार वाजेपर्यंत काम आटोपून संध्याकाळी पुन्हा तळेगाव गाठायच्या. काही वर्षांनंतर त्या सिंहगड रोडवरील वडगावला रहायला आल्या. तिथे काही वर्ष काढल्यावर किरकटवाडीला राहू लागल्या. किरकटवाडी नंतर पुन्हा सिंहगड रोडला आल्या.
त्यांची प्रदर्शनं दिवाळीच्या आधी किंवा मे महिन्यात असायची. प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद फक्त बालगंधर्वांच्या कलादालनातच मिळत असे. त्यासाठी महिनाभर आधी अर्ज करावा लागे. तारीख मिळाली की, दै. सकाळ मधील ‘छोट्या जाहिराती’मध्ये जाहिरात द्यावी लागे. ती जाहिरात वाचून येणाऱ्या फोनवरील सहभागींना प्रदर्शंनाबद्दल सांगून सर्वांची संभाजी उद्यानात मिटींग घेतली जात असे. त्या मिटींगमधून प्रत्येकाच्या स्टाॅलचे स्वरुप समजून घेऊन हॅण्डबिल केले जायचे. प्रदर्शंनाच्या आदी आठ दिवस सर्व सहभागींना बोलावून प्रत्येकीला वाटण्यासाठी हॅण्डबिल दिली जायची. त्यातील काही सहभागींच्या कलाकृतींचे फोटो घेऊन वर्तमानपत्रात ‘चुकवू नये असे काही’ सदरात माहिती यावी म्हणून मीराताई सकाळ, लोकमत, सामना, इ. च्या आॅफिसमध्ये उन्हातान्हात जायच्या. प्रदर्शंनाच्या आदल्या दिवशी सर्व तयारी झाल्याची खात्री होईपर्यंत त्यांना चैन पडत नसे. प्रदर्शंनाच्या हाॅलमध्ये सेंटरला लावायचा बोर्ड, कलादालनाच्या खालील स्टॅण्डवर लावायचा बोर्ड, सहभागींच्या नावाच्या पट्या, ‘सुस्वागतम्’चा बोर्ड हे सर्व झाले की, आम्ही आदल्या दिवशी रात्री आठ वाजता कलादालन ताब्यात घ्यायचो. टेबलवाले येऊन टेबल मांडून जायचे. कलादालनात पंचवीस तीस जणींचा कलकलाट सुरु होत असे. प्रत्येकीला मीराताई हव्या असायच्या. या सर्वांना जे काही हवं नको असेल ते हिरीरीने पुरविण्यात तीन तास निघून जायचे. अकराच्या सुमारास एकेक सहभागी स्त्री काढता पाय घ्यायची. शेवटी आम्ही तिचं चौघंच उरायचो. मीराताई आऊ नावाच्या त्यांच्या मैत्रिणीकडे जायच्या. आम्ही मंगला टाॅकीजवरुन बसने घरी जायचो.
सकाळी नऊ वाजता मीराताई उत्साहात कलादालनात हजर व्हायच्या. सहभागी आपापल्या स्टाॅलवर मांडणी करीत रहायच्या. खाली रांगोळी काढली जायची. अकरा वाजता पाहुणे आले की, कलादालनाच्या रांगोळी पासून आभार प्रदर्शनापर्यंत मी फोटो काढण्याचे काम करीत असे. मीराताईंच मनोगत सगळ्या सहभागींना प्रेरणा देणारे असे. सूत्रसंचालन आमचा प्रिय मित्र धनंजय देशपांडे करीत असे. पाहुण्यांच्या शुभेच्छाने मीराताईंना कृतकृत्य वाटत असे. उद्घाटन सोहळा संपला की, मीराताईंच तीन दिवसांच ‘राज्य’ सुरु व्हायचं. त्या सर्व सहभागींशी मिळून मिसळून रहायच्या. त्यांचे रुसवे, फुगवे काढायच्या. चुकलं तर खडसावून बोलायच्या. रागात बोलून कुणाला दुखावलं असेल तर तिला प्रेमानं जवळ घ्यायच्या. कुणी सहभागी घरुन मीराताईंसाठी खाऊ आणायची.
रविवारी प्रदर्शंनाला भरपूर गर्दी व्हायची. अनेक स्टाॅलवरची विक्री अपेक्षेपेक्षा जास्त झाल्यावर सहभागींपेक्षा जास्त आनंद मीराताईंना होत असे. सोमवार हा शेवटचा दिवस असल्याने सकाळपासून मीराताईंचा चेहरा पडलेला दिसे. संध्याकाळी सात वाजता सर्वांनी आवरायला घेतल्यानंतर मीराताई सुन्न होऊन जायच्या. प्रत्येक सहभागी जाताना मीराताईंना नमस्कार करुन निघायची. मीराताईंच्या डोळ्यांत पाणी यायचं. आठ वाजता हाॅल रिकामा झाल्यावर आम्ही तिघेही जड अंतःकरणाने बाहेर पडायचो. असेच प्रसंग प्रत्येक प्रदर्शंनाच्यावेळी घडले. फरक होता तो नवीन सहभागींचा, नवीन पाहुण्यांचा व वेगळ्या स्थळांचा.
पंचवीस वर्षांत अनेक मान्यवर पाहुणे झाले. आमच्या ओळखीने सूर्यकांत पाठक, सुनीताराजे पवार तर मीराताईंनी सुहासिनी देशपांडे, प्रतिभाताई शाहू मोडक, बॅंक ऑफ महाराष्ट्रचे कुलकर्णी साहेब, असे कित्येक मान्यवरांना आमंत्रित केले.
या प्रदर्शनातून कित्येक छांदिष्टांना व्यासपीठ मिळाले. त्यांच्या मुलाखती घेऊन मीराताईनी दै. सामना मध्ये दर रविवारसाठी लेखमाला लिहिली. एक सहभागी खडूवरती कोरुन शिल्प करायचा. त्याच्या घरी आम्ही अलिबागला गेलो होतो. एक वृद्ध सहभागी वाईला रहात होते, त्यांना भेटायला वाईला गेलो होतो. एकदा प्रदर्शन कोल्हापूरला आयोजित केले होते, आमचीही कोल्हापूर सफर झाली.
पुण्यात बालगंधर्व कलादालन, कर्वेनगर, डेक्कनवरील कर्वेंचे बाल विकास शिशु मंदिर, अशा अनेक ठिकाणी प्रदर्शनं पार पडली. कित्येक सहभागी मीराताईंच्या मैत्रिणी झाल्या. त्यांनी सुखदुःखात मोलाची साथ दिली. वायंगणकर, गोडबोले, हरिश्चंद्रकर, आऊ, व्यवहारे, सुरेखा, पंचनदीकर, इ. नी मीराताईंवर अतोनात प्रेम केले.
‘छंद-कलावर्धिनी’च्या पंचविशी नंतर मीराताईंना गुडघ्यांच्या दुखण्यामुळे प्रदर्शंनाला उभे राहणे जड जाऊ लागले. त्यांनी विश्रांतीचा निर्णय घेतला. आता त्यांना काठीच्या आधाराशिवाय चालणे जमेनासे झाले. तरीही त्या मी ‘संस्कृती’मध्ये असताना जिना चढून वरती आल्या. माईंना भेटल्या. माईंनी त्यांना एक मोठं पुस्तक भेट दिलं. चहापाणी झालं. त्यानंतर त्यांची भेट कमी होऊ लागली. सणासुदीला फोन येत असे. त्या रहायला लांब गेल्याचं ऐकून होतो.
वर्ष एकापाठोपाठ जात राहिली. पाच ऑक्टोबर तारीख आली की, मीराताई आठवतात. त्यांच्याबरोबरची पंचवीस वर्षे खूप काही शिकवून गेली. आमच्या मित्रपरिवारात वाढ झाली. आज त्यांचा ‘अमृतमहोत्सव’…
जीवनामध्ये त्यांना जो जो भेटला त्याला त्यांनी ‘अमृत’च दिलं…स्वतःच्या वाट्याला आलेलं ‘विष’ मीरेसारखं आयुष्यभर पचवलं….
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
५-१०-२०.
Leave a Reply