“आपल्या दिनचर्येतल्या अनेक गोष्टींमध्ये सोशल मीडियाचा समावेश झाला आणि अल्पावधीतच त्यानी आपल्या बऱ्याचश्या वेळेवर ताबा मिळवला. कधी टाईमपाससाठी तर कधी कामासाठी म्हणून chatting करणं ही एक गरज होऊ लागली आणि आपला संबंध आला तो chatting चा अविभाज्य घटक असलेल्या ..“स्माईली” या प्रकाराशी. सुरुवातीला काही मोजक्याच स्माईली असायच्या . अनेक “मूक चेहरे” keypad च्या एका कोपऱ्यात शांत पडून असायचे पण बरेचदा आपण लिहून ज्या गोष्टी सहज सांगू शकत नाही त्या भावना या “स्माईली” वापरून परिणामकारक रीतीने समोरच्यापर्यंत पोचतात हे सगळ्यांना उमजलं …अगदी “ शब्दावाचून कळले सारे“ म्हणतात न तसं सहाजिकंच लोकांकडून या स्माईलींचा वापर वाढू लागला . मग “मागणी तसा पुरवठा” या न्यायानी सोशल मीडियातल्या सगळ्या खेळाडूंनी त्यांच्या app मधली स्माईलींची संख्या वाढवली आणि लोकांना “खेळवत” ठेवलं “स्मित हास्यापासून फिदीफिदी” पर्यंत अनेक हसरे चेहरे या स्माईलींमध्ये असतात पण आता गंमत अशी आहे की यातल्या चित्रविचित्र चेहऱ्यांना , इतकंच काय तर सगळ्या “रडक्या” चेहऱ्यांना सुद्धा “स्माईली” म्हणायचं बरं का !! … त्यामुळे या रडक्या स्माईलींची कायमच “भोगले जे दुखः त्याला सुख म्हणावे लागले” अशी अवस्था .. या व्यतिरिक्त हातवारे ,खाण्यापिण्याचे पदार्थ, विविध वस्तू , अनेक चिन्हं , झेंडे यांचाही समावेश असतो … आता त्याला “Emoji , Reactions, emoticon, symbol” वगैरे नवीन नावं आली असली तरी या सगळ्याचं “सरसकट” आणि “पारंपारिक” नाव ”स्माईली”!!!… “”कुठल्याही कंपनी””च्या चॉकलेटला कसं “कॅडबरी” म्हणतात ना … तसंच मध्यंतरी त्याचं अनेकवचन सुद्धा समजलं जेव्हा स्मार्ट फोन वापरणाऱ्या एक आज्जी म्हणाल्या “ अरे… किती रे या “स्मायल्या” ???”…
बरं इतक्या “स्माईलीज” . अहंहं… “स्माईल्या” तर आहेत पण त्या सगळ्याचे अर्थ किंवा त्यातून उत्पन्न होणारे नेमके भाव कुठले आहेत हे समजणं सुद्धा तितकंच महत्वाचं … काही स्माईली तर संभ्रमात टाकणाऱ्या असतात हसणं आणि रडणं याच्या “कुंपणावर” असतात नक्की कळतंच नाही हसतायत की रडतायत !! … रडणाऱ्यामध्ये सुद्धा म्हणे आनंदाश्रूचा एक वेगळा चेहरा असतो किती अभ्यास करायचा बुवा !! मला आठवतंय , मी अगदी पहिल्यांदा ड्रायव्हिंग लायसन्स काढलं तेव्हा त्या RTO अधिकाऱ्यांनी मला भरपूर Road signs असलेला एक मोठा तक्ता दाखवून त्यातल्या एकेकाचा अर्थ विचारला होता … मला वाटतं , सोशल मीडिया वापरायच्या आधी अशीच एक स्माईल्या ओळखून त्याचे अर्थ विचारणारी online परीक्षा घ्यावी आणि “समाज माध्यम वापराचा परवाना” देण्यात यावा आता तर काय ज्यांना अभ्यास करायचाय त्यांच्यासाठी हे सगळे अर्थ आणि माहिती काही वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे …
पण .. हे सगळं जरी केलं , सगळ्याचे अर्थ पाठ केले तर त्यामुळे Theory पक्की होईल हो sss पण practical चं काय ??? या विशाल स्माईली सागरातून योग्य वेळेस योग्य ती स्माईली शोधून ठराविक कालमर्यादेत पाठवणं हा पुढचा टास्कसुद्धा आहेच की !!! आपल्याला नेमकं किती “दात विचकून” हसायचं आहे किंवा किती “ओक्साबोक्षी” रडायचं आहे हे ठरवेपर्यंत समोरच्याचे पुढचे ३-४ मेसेज आलेले असतात … बरं , हाताच्या चिन्हांनी काही सांगूया म्हंटलं आणि हवी ती स्माईली जरी झटकन मिळाली तरी आपल्या त्वचेचा रंग शोधण्याचं आव्हान असतंच आणि शेवटी तो स्कीन कलर match करेस्तो पुन्हा “देर ना हो जाये कही, देर ना हो जाये” त्यामुळे या नादात अनेक जणांच्या हाताला कायमंच हळद लागेलेली हात नेहमी पिवळेच … मध्यंतरी एकाला पाठवण्यासाठी “नुडल्स”ची ईमोजी शोधत होतो … इतक्यात दुसरा एक मेसेज आला त्याला उत्तर देऊन पुन्हा शोधकार्य सुरु केलं… असं करत करत तीनेक मिनिटांनी मला नुडल्स सापडले त्यापेक्षा “दोन मिनिटात” खरेखुरे नुडल्स तयार करून फोटो काढून झाला असता …असो !!!
हे सगळं कमी म्हणून भरीला कधीतरी अनावधानानी “नको त्या” स्माईली पाठवल्या जातात. एकदा तर एका काकांनी एका ग्रुप मधल्या एका प्रश्नाचं “ मी आहे किंवा मला जमेल ” अशा आशयाचं उत्तर देण्यासाठी “तर्जनी” वर असलेली स्माईली टाकायच्या ऐवजी भलतंच बोट दाखवलं . आणि मग झाला ना “अर्थाचा अनर्थ” !! कधी साधं हसायची स्माईली टाकताना बोट चुकून वरखाली झालं आणि एकदम पप्पीची स्माईली गेली की मग संपलच न सगळं !!! . कधीकधी तर योग्य स्माईली टाकताना सुद्धा परिणामाचा आणि होणाऱ्या गैरसमजाचा विचार करायला लागतो एखादीच्या स्टेटसला “गोंडस बाळ” असतं म्हणून भावनेच्या भरात Cute असं लिहून पप्पीची स्माईली टाकताना लक्षात येतं की त्या फोटोत ते बाळ आईच्या कडेवर आहे त्यामुळे तुम्ही बाळाला पाठवलेला गोड पापा बाळाच्या आईला तिच्यासाठी वाटला . तर मग direct block होणार तुम्ही. काही काही app मध्ये जी स्माईली दिसत असते ती प्रत्यक्ष “पटलावर” उमटताना वेगळीच दिसते ..किंवा एका app मधल्या स्माईली दुसऱ्या app मध्ये copy केल्यावर वेगळ्याच दिसतात…असंही होतं !!. keypad वरच्या ज्या स्माईली वापरायच्या नाहीत त्या आधीच लॉक करता येण्याची सुविधा app मध्ये ठेवली तर असे बरेच गैरसमज दूर होतील . म्हणूनच वर म्हंटल्याप्रमाणे लायसन्स असेल तर हे असे भलतीच स्माईली पाठवून होणारे “संभाव्य अपघात” तरी टाळता येतील
आजची तरुण पिढी आणि बच्चे कंपनी मात्र स्माईली वापरताना अजिबात मागेपुढे बघत नाहीत आणि काटकसर तर त्याहून करत नाहीत … “संवाद थोडा आणि स्माईली फार” अशी नवीन म्हण रुजू झालीये आता किती जणांचं तर पत्त्यातल्या चॅलेंज खेळासारखं मेरे दो स्माईली, उपर तीन , उपर दो. असं चालू असतं धपाधप आमच्या पिढीतले लोकं “हार्ट” फार जपून वापरायचे … निवडक व्यक्तींसाठी राखीव वगैरे पण ही तरुणाई तर “हार्ट” ची स्माईली “गावजेवण” असल्यासारखी सगळ्यांनाच वाटत सुटतात आणि तेही कुठल्याही क्षुल्लक कारणासाठी आणि शिवाय इतक्या मुबलक स्माईली उपलब्ध असूनही “अरे यार !! अमुक स्माईली नाहीये आणि तमुक ईमोजी नाहीये !!” … हे रडगाणं असतंच ..
लिहित लिहित इथपर्यंत आल्यावर मला साक्षात्कार झाला की इतकं सगळं “स्माईली” वर लिहिलं पण त्यात एकही “स्माईली” वापरली नाही. हे म्हणजे हॉटेलमध्ये मध्ये जाऊन “ एक ओनियन उत्तप्पा ..विदाऊट कांदा “ अशी ऑर्डर दिल्यासारखं झालं . म्हणून गाण्यात/कवितेत कशी “मर्मस्थळं” असतात तशी लेखातली “स्माईली स्थळं” शोधली पण ती तर “चिक्काssर” निघाली !!! आता अभ्यास करून इतक्या स्माईल्या त्या त्या ठिकाणी घुसवेपर्यंत त्याची नवीन अपडेट यायची .म्हणून .. हे इतकंच पण आपण कितीही काही म्हणालो तरी “या मनीचे त्या मनी” आपल्या “अचूक भावनांचा” High speed data transfer करण्यासाठी या “स्माईली” खूप महत्वाच्या आहेत हे अमान्य करून चालणारंच नाही … त्यामुळे आपला आणि “स्माईलींचा खेळ” अविरत सुरु राहणारंच … काळानुरूप त्याचे रंग, आकार, भावना, रुपडं, प्रकार, नावं बदलतीलही कदाचित … पण त्याचं अस्तित्व मात्र राहील हांss … आता कधीकधी ते फसवं किंवा तोंडदेखलंही असू शकतं हे “”वास्तव”” आहेच ; पण या फसवेगिरीच्या शापातून बिचारे “शब्द” तरी कुठे सुटले आहेत ? म्हणूनच सरतेशेवटी (“काही फेरबदलांसाठी गीतकार कै.सुधीरजी मोघे यांची माफी मागून ”) म्हणावसं वाटतं .
सर्रास खेळ चाले, या मूक चेहऱ्यांचा
संपेल ना कधीही, हा खेळ स्माईल्यांचा ss हा खेळ स्माईल्यांचा
“मुख”चंद्र ना स्वयंभू, “शब्द”तेज वाहतो हा
सोबतीत मुखवट्यांचा अभिशाप भोगतो हा
तरी असतो सतत साक्षी, हा दूत “भावनांचा”
हा खेळ स्माईल्यांचा ss हा खेळ स्माईल्यांचा
आभास स्माईली ह्या, असतो खरा “सहवास”
जे सत्य भासती ते असती नितांत भास
फसतात स्माईलीला हा दोष माणसांचा
संपेल ना कधीही हा खेळ स्माईल्यांचा ss हा खेळ स्माईल्यांचा
या साजीऱ्या क्षणांना, शब्द झाकल्या मुठीत
मिटतील सर्व शंका उबदारश्या स्माईलीत
गवसेल सूर आपुल्या या धुंद जीवनाचा
हा खेळ स्माईल्यांचा ss “हा खेळ स्माईल्यांचा”
©️ क्षितिज दाते.
ठाणे.
छान माहिती