माझा ज्येष्ठ मित्र हिमांशू दळवी (Himanshu Dalvi) याने “ह. म. बने , तु .म .बने ” या दूरचित्रवाणीच्या मालिकेतील ७ जानेवारीच्या भागाची एक लिंक आमच्या WA ग्रुपवर टाकली आणि सोबत पुण्याच्या डॉ विदया निकाळजे यांचे या भागावरील विहंगम भाष्यही पोस्ट केले. मी लगेच लिंक उघडून तो भाग पाहिला. “गोटया “, ” गंगाधर टिपरे ” आणि “उंच माझा झोका ” यानंतर दूरचित्रवाणीवरील मालिकांकडून काहीही अपेक्षा बाळगायची नसते अशी मी मनाची ठाम समजूत घातली होती. खरे तर “ह. म. बने , तु .म .बने ” या नावामुळे माझा (गैर )समज झाल्याने मी आजवर ही मालिकाही कधी बघितली नव्हती. पण ७ जानेवारीच्या भागाने मी निःशब्द झालो. पौगंडावस्थेतील शालेय मुलगी “स्त्री ” होण्याचा उंबरठा ओलांडत असताना अजाणता बापाचा मदतीचा हात पुढे येणे अतर्क्यच ! हा विचारही कधी मनात आला नव्हता. हे obvious नाते त्या टप्प्यावर काहीसे आक्रसते. दुरावा निर्माण होत जातो याक्षणी ! त्याबद्दल कोणाची तक्रारही नसते कधी. इतकं आपण ते शारीर परिवर्तन सहज मानतो. बदललेल्या समाजात मुळात भूमिकांकडेही वेगळ्या चष्म्यातून बघायचे दिवस आता आले आहेत. हा विषय मुळात सुचणे , त्याला अंगीभूत अभिनयाने हळुवार खुलवणे हे महा कठीण !
एकच सांगतो – त्या दिवसापासून मी ही मालिका पाहू लागलो. हरवत चाललेल्या (म्हणूनच हव्याहव्याशा ) कुटुंब संस्थेतील तीन पिढ्यांचे घट्ट भावबंध मी आवडीने बघतोय. शेवट थोडासा प्रचारकी /उपदेशपर होतो कधी कधी पण वीण मस्त. खूप दिवसांनी चांगली दैनिक करमणूक ! काही नाती आणि त्यातील अदृष्य ओलावे अशा पद्धतीने काठावर येत असतील तरी चालेल. निष्पर्ण होण्यापेक्षा असं भिजणं चांगलं नाही का ? धन्यवाद हिमांशू !
हे लेखन कधीचेच मनात होते पण काही नैमित्तिक विषय मुसंडी मारून पुढे आले. पण आजच्या भागानंतर बनेंच्या मधल्या फळीने ७ जानेवारीचा उल्लेख करून प्रेक्षकांच्या आधाराबद्दल जाहीर आभार मानले आणि मी कॉम्पुटरचा की -बोर्ड हातात घेतला. कौतुकही वेळच्या वेळी करावे. धन्यवाद “बने” कुटुंबीय ! आम्ही अधिक सजग आणि डोळस झालो.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply